हल्लीच्या काळात एका व्यक्तीमागे कपाट भरभरून कपडे असतात. कधी कोणी प्रेमाने घेतलेले, लग्नकार्यात मिळालेले आणि आपणच हौसेने घेतलेले कपडे अशी कपड्यांची भाऊगर्दी असते. त्यामुळे एक नूर आदमी दस नूर कपडा अशी एक म्हण आपल्याकडे सांगितली जाते. ती तंतोतंत लागू पडते. कपाटातील बरेचसे कपडे खूपदा वापरल्यामुळे त्यांचा कंटाळा येतो. पण तरीही आठवणींमुळे किंवा आवडले म्हणूनही ते टाकले जात नाहीत. ते गाठोड्यात पडून राहतात; मात्र थोडी कल्पकता दाखवून, कलाकुसर करून अशा कपड्यांचा पुनर्वापर करता येतो.
टेबल कव्हर- उत्तम कलाकुसर केलेल्या कपड्यांपासून खुर्च्यांसाठी कव्हर तयार केले तर ते देखणे दिसते. त्याशिवाय लेस किंवा फ्रिल काढून टेबलच्या कव्हरला, पडद्यांना लावता येतात. मुलांच्या कपड्यांवर काही वेळा कार्टूनचे पॅच असतात तेही टेबल कव्हर किंवा बेडच्या कव्हर लावून त्यांचा सुंदर पुनर्वापर करता येतो. काही कपड्यांवर देखणी कलाकुसर केलेली असते. काहींना लेस, फ्रिल्स लावलेल्या असतात. हे पुन्हा वापरात आणून छान काही तरी करू शकतो.
बॅग जुन्या जीन्स किंवा कार्गो पँट या खूप दिवस वापरूनही फाटत नाहीत. काही वेळा रंग उतरतो. त्याही न फेकता कपाटाच्या तळाशी ठेवलेल्या असतात. या पँटचा खिशापर्यंतचा भाग कापून वेगळा करा. वरच्या भागाच्या तळाशी व्यवस्थित टीप मारा. मग या पँटची छोटी शॉर्टस् होईल किंवा वरच्या भागाला चेन लावून घेतलीत तर चांगली बॅगही होऊ शकते. तशाच प्रकारे जीन्सच्या स्कर्टचीही बॅग तयार करता येईल.
* कपड्यांवरील मोठ्या आरेखनापासून आपण फ्रेम बनवू शकतो.
* साडीपासून पंजाबी ड्रेस किंवा कुडता किंवा मॅक्सी गाऊनही तयार करु शकतो.