ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू यांचे निधन

सोमवार, 25 सप्टेंबर 2017 (08:19 IST)

ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू  (७६) यांचं सोमवारी पहाटे निधन झालं.  प्रकृती अस्वास्थामुळं रविवारी  सकाळी त्यांना मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

रविवारी  सकाळी १०च्या सुमारास हृदयविकाराचा त्रास जाणवल्यानं साधू यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  साधू यांचं पार्थिव वांद्रे येथील त्यांच्या राहत्या घरी नेण्यात येणार असून तिथंच अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांनी देहदान करण्याचा निर्णय घेतला असल्यानं त्यानुसार पुढील सोपस्कार पार पाडले जाणार आहेत.

८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. सुमारे ३० वर्षे पत्रकारितेत काम केल्यानंतर साधू यांनी कुठच्याही वृत्तपत्रात नोकरी न करता मुक्त लेखन आणि मुक्त पत्रकारितेलाच वाहून घेतले. १९९५ ते २००१ पर्यंत त्यांनी पुणे वृत्तपत्रविद्या विभागात विभागप्रमुख म्हणूनही काम केले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान व अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनच्या जीवनगौरव पुरस्कारानंही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.

अरुण साधू यांची साहित्यसंपदा

कादंबर्‍या - झिपर्‍या, तडजोड, त्रिशंकू, बहिष्कृत, मुखवटा, मुंबई दिनांक, विप्लवा, शापित, शुभमंगल, शोधयात्रा, सिंहासन, स्फोट

कथासंग्रह - एक माणूस उडतो त्याची गोष्ट, कथा युगभानाची (निवडक कथा - संपादिका मीना गोखले), ग्लानिर्भवति भारत, बिनपावसाचा दिवस, बेचका आणि आकाशाशी स्पर्धा करणार्‍या इमारती, मंत्रजागर, मुक्ती

नाटक - पडघम

ललित लेखन - अक्षांश-रेखांश, तिसरी क्रांती, सभापर्व, सहकारधुरीण (चरित्र)

समकालीन इतिहास - आणि ड्रॅगन जागा झाला, जेव्हा ड्रॅगन जागा होतो, फिडेल, चे आणि क्रांती, तिसरी क्रांती, 

शैक्षणिक - संज्ञापना क्रांती

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती