शिवाजी गोविंदराव सावंत ; 'मृत्युंजय'कर शिवाजी सावंत
गुरूवार, 16 सप्टेंबर 2021 (11:07 IST)
शिवाजी गोविंदराव सावंत हे मराठी कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबर्यांत मानदंड मानली जाते. शिवाजी सावंत त्यासाठीच मृत्युंजयकार सावंत म्हणून ओळखले जातात.
शिवाजी सावंत यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९४० साली सामान्य शेतकरी कुटुंबात, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गावात झाला. सावंत उत्कृष्ट कबड्डीपटू होते. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आजऱ्यात झाल्यावर त्यांनी कोल्हापुरात बी.ए.चे प्रथम वर्ष पूर्ण केले आणि मग वाणिज्य शाखेतील पदविका घेतली. टायपिंग, शॉर्टहँडचा कोर्स करून त्यांनी कोर्टात कारकुनाची नोकरी केली, आणि नंतर ते कोल्हापुरातील राजाराम प्रशालेत १९६२ ते १९७४ या काळात शिक्षक होते.
पुण्यात स्थायिक झाल्यावर १९७४ ते १९८० अशी सहा वर्षे त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या लोकशिक्षण या मासिकाचे सहसंपादक, व नंतर संपादक म्हणून काम केले. १९८३ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पुढील आयुष्यात फक्त लेखनावरच पूर्ण लक्ष केंद्रित केले.
शिवाजी सावंत हे इ.स. १९९५ पासून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे काही वर्षे उपाध्यक्ष होते. १९८३ मध्ये बडोदा येथे भरलेल्या "बडोदे मराठी साहित्य संमेलनाचे" ते संमेलनाध्यक्ष होते.
मृत्युंजय (१९६७), या पौराणिक कादंबरीच्या प्रस्तावनेत शिवाजी सावंत यांनी हिंदीतील केदारनाथ मिश्र ह्यांचे कर्ण आणि रामधारी सिंह दिनकर ह्यांचे रश्मिरथी ह्या दोन खंडकाव्यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केलेला आहे.
मृत्युंजय कादंबरीच्या लेखनासाठी शिवाजी सावंत यांना थेट कुरुक्षेत्रात मुक्काम ठोकला होता. प्रदीर्घ संशोधन, चिंतन आणि मनन यांतून रससंपन्न अशा मृत्युंजय या वास्तववादी कादंबरीचा जन्म झाला आणि शिवाजी सावंत हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत पोहोचले.
मृत्युंजयनंतर सावंतांनी छावा ही ऐतिहासिक व युगंधर ही पौराणिक विषयावरची कादंबरी लिहिली. शिवाजी सावंत यांची कादंबर्यांसहित अन्य पुस्तके इंग्रजी भाषेत अनुवादित झाली आहेत. युगंधरचा इंग्रजी अनुवाद सावंत यांची अमेरिकास्थित कन्या कादंबिनी यांनी केला आहे.
मृत्युंजय या कादंबरीवर आधारलेली काही मराठी-हिंदी नाटकेही रंगभूमीवर आली. मृत्युंजय ही कादंबरी दानशूरपणासाठी प्रख्यात असलेला महान योद्धा कर्णाच्या जीवनावर, तर युगांतर ही कादंबरी भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारलेली आहे. मराठी भाषेत कसदार लेखन करून साहित्याची सेवा केल्याबद्दल त्यांना भारतीय ज्ञानपीठाच्या मूर्तिदेवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
कर्हाड येथे भरणार्या ७६व्या 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना'च्या अध्यक्षपदाचे ते उमेदवार होते. आपल्या उमेदवारीच्या प्रचारासाठी गोव्यात गेले असताना मडगाव येथे, शिवाजी सावंत यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सप्टेंबर १८, २००२ रोजी मृत्यू झाला.