आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू

आयुष्य खूप छोटं आहे
भांडत नका बसू 
डोक्यात राग भरल्यावर 
फुटणार कसं हसू ?
 
अहंकार बाळगू नका 
भेटा बसा बोला 
मेल्यावर रडण्यापेक्षा
जिवंतपणी बोला
 
नातं आपलं कोणतं आहे
महत्वाचे नाही
प्रश्न आहे कधीतरी
गोड बोलतो का नाही ?
 
चुका शोधत बसाल तर
सुख मिळणार नाही 
चूक काय बरोबर काय
कधीच कळणार नाही
 
काहीतरी खुसपट काढून उगीच नका रुसू
आयुष्य खूप छोटं आहे
भांडत नका बसू .....
 
चल निघ चालता हो
इथे थांबू नको
हात जोडून विनंती आहे
अशी भाषा नको
 
दारात पाय नको ठेऊ 
तोंड नाही पहाणार 
खरं सांगा असं वागून 
कोण सुखी होणार ?
 
तू तिकडे आम्ही इकडे
म्हणणं सोपं असतं
पोखरलेलं मन कधीच 
सुखी होत नसतं
 
सुखाचा अभास म्हणजे 
खरं सुख नाही 
आपलं माणूस आपलं नसणे
दुसरं दुःख नाही
 
करमत नाही घरी म्हणून गाळू नका आसु
आयुष्य खूप छोटं आहे
भांडत नका बसू ....
 
एकतर्फी प्रेम करून
उपयोग आहे का ?
समोरच्याला आपली आठवण
कधी तरी येते का ?
 
नातं टिकलं पाहिजे असं
दोघांनाही वाटावं
कधी गायीने कधी वासराने 
एकमेकाला चाटावं
 
तुमची काहीच चूक नाही 
असं कसं असेल 
पारा शांत झाल्यावरच 
सत्य काय ते दिसेल
 
बघा जरा एकांतात
डोळे मिटून आत
चूक कबूल करतांना
जोडताल दोन्ही हात
 
अंधारात अश्रू ढाळत खरंच नका बसू
आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू .....
 
दुसऱ्याला दोष देणं
खूप सोपं असतं
वेळ आल्यावर कळतं की
कुणी कुणाचं नसतं
 
भेटत नाहीत बोलत नाहीत
गुन्हा तरी काय ?
जे वाटतं ते बोलून
रड धाय धाय
 
शक्य आहे ताण जाऊन
वाटेल हलकं हलकं
गुळणी धरून बसू नका
व्हा थोडं बोलकं
 
कोण चूक कोण बरोबर
हिशोब करून टाका
प्रत्येक क्षण जगून घ्या
घालवू नका मोका
 
त्याच त्याच गोष्टींचे पत्ते नका पिसू
आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू ....
 
आपली मतं दुसऱ्यावर
मुळीच लादू नका
समोरच्या व्यक्तीचा
अंत बघू नका
 
कोणताही विषय असो
जास्त नका ताणू
मीच शहाणा बाकी मूर्ख
असे नका मानू
 
कोण म्हणतं गोड बोलून
प्रश्न सुटत नाही
अनेकदा समजूतदार
माणूस भेटत नाही
 
जिभेवर साखर ठेवा
होणार नाही वाद
आवडल्यावर मनातून
द्या की हो दाद
 
तडतड बोलून उगीच मनं नका नासु
आयुष्य खूप छोटं आहे
भांडत नका बसू ....
 
बचतच कामी येते
खर्च कमी कर
जरी मोठा झालास तरी
रहा जमिनीवर
 
विचार करून पाऊल टाका, कुठे नका फसू
आयुष्य खूप छोटं आहे
भांडत नका बसू ....
 
ठीक आहे चूक नाही 
तरीही जुळतं घ्या 
बॉडी डेड होण्या आधीच 
आलिंगन द्या
 
स्मशानभूमीत चांगलं बोलून
काय उपयोग आहे 
जिवंतपणी कसे वागलात
जास्त महत्वाचं आहे
 
माझ्या कवितेत कोणतंही
तत्वज्ञान नाही 
तुम्ही खुशाल म्हणू शकता
कवीला भान नाही
 
ठीक आहे तुमचा आरोप
मान्य आहे मला
माझं म्हणणं एवढंच आहे
वाद नको बोला
 
काय माहीत उद्या आपण असू किंवा नसू
आयुष्य खूप छोटं आहे
भांडत नका बसू ...

- सोशल मीडिया 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती