भारतीय स्वातंत्र्य दिन विशेष लेख सातारचे प्रतिसरकार – भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सुवर्ण पान
शनिवार, 12 ऑगस्ट 2023 (07:55 IST)
Indian Independence Day Special Article Satars Anti Government भारतीय स्वातंत्र्चा लढा हा प्रदीर्घ चाललेला संघर्ष होता. इंग्रजी सत्तेने हळूहळू आपले पाय रोवायला सुरवात केली, तेव्हापासूनच त्याला विरोध सुरू झाला होता. परंतु तो विस्कळीत स्वरूपात होता. त्यामुळे बलाढ्य ब्रिटिश सत्तेला तो मोडून काढणे सहज शक्य होत असे. १८५७ चा उठाव ब्रिटिशांनी मोडून काढला. परंतु, ब्रिटिशांविरूध्दचा असंतोष वाढतच होता. कधी सशस्त्र, कधी हिंसक, कधी निवेदने देवून तर कधी अहिंसक अशा विविध मार्गांनी स्वातंत्र्याची मागणी होत राहिली. ब्रिटिश सत्तेला विरोध करून स्वातंत्र्याच्या मागणीला धार आली. ८ ऑगस्ट १९४२ ला राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांना चले जाव असे ठणकावून सांगितले आणि देशवासियांना करो या मरो असा आदेश दिला. जनक्षोभाचा अंदाज घेत त्याच रात्री ब्रिटिशांनी तत्कालीन सर्व प्रमुख पुढाऱ्यांना अटक करून तुरूंगात टाकले. परंतु, या घटनेने देशातील सर्वसामान्य जनतेने स्वातंत्र्यलढा आपल्या हाती घेतला आणि सर्वदूर याचे लोण पसरले. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातही मोर्चापर्व सुरू झाले. जिल्ह्यातील पाटण, कराड, तासगाव, इस्लामपूर, वडूज येथील मामलेदार कचेरीवर हजारो लोकांचे मोर्चे निघाले. तासगावच्या मामलेदार कचेरीवरील मोर्चाने इतिहास घडवला. तेथील युनियन जॅक खाली उतरवून तेथे चरखाधारी तिरंगा फडकविला. मामलेदाराच्या डोक्यावरील हॅट उतरवून त्याला गांधी टोपी घातली आणि तिरंग्याला सलामी द्यायला भाग पाडले. तालुक्यातील न्यायालयातही याचीच पुनरावृत्ती केली. या मोर्चाने सातारा प्रतिसरकारची पायाभरणी केली. पुढे वडूज व इस्लामपूरच्या मोर्चावर ब्रिटिशांनी गोळीबार केला आणि ११ जणांचा प्राण घेतला. यामुळे क्रांतिकारकांनी आपले लढ्याचे तंत्र बदलले आणि ब्रिटिश सत्तेला हादरे द्यायला सुरवात केली. त्याचेच रूपांतर सातारच्या ऐतिहासिक प्रतिसरकारमध्ये झाले.
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात जी काही मोजकी प्रतिसरकारे स्थापन झाली, त्यात सर्वात प्रदीर्घ काळ चालणारे आणि ब्रिटिश पोलिसांना सळो की पळो करून सोडणारे प्रतिसरकार म्हणजे सातारचे प्रतिसरकार होते. तब्बल ४६ महिने या सरकारने ब्रिटिश सत्तेला समांतर सरकार स्थापन करून कारभार चालवला. जिल्ह्यातील (तेव्हाचा सातारा जिल्हा आताचा सांगली आणि सातारा जिल्हा) सुमारे ६५० गावात आपले सरकार स्थापन करून स्वतंत्र कारभार चालवला. या प्रतिसरकारने आपली स्वतंत्र लिखित घटना तयार केली. स्वतंत्र न्यायव्यवस्था तयार केली. प्रत्येक गावांत न्यायदान कमिट्या स्थापन केल्या होत्या. त्यामध्ये गावातील लोकांमधूनच ५-७-९ जण निवडले जात. त्यांच्याद्वारे गावचा कारभार पाहिला जाई. जर या पंचांचा निर्णय मान्य नसेल तर १५-२० गावांच्या गट न्याय कमिटीपुढे अपिल करण्याची सोय होती. त्यांचाही निर्णय अमान्य असल्यास कुंडलला प्रिव्ही कौन्सिलपुढे अपिल करण्याचीही मुभा होती. मात्र या कौन्सिलचा निर्णय अंतिम असे. १९४३ ते १९४७ या काळात विटा, तासगाव, कराड, इस्लामपूर, सातारा येथील ब्रिटिश कौन्सिलचे काम जवळपास ठप्प पडले होते. कारण प्रतिसरकारच्या न्यायालयात लवकरात लवकर आणि अत्यंत कमी खर्चात न्याय मिळत होता. झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी ताबडतोब होत होती. कायदा व सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी आणि ब्रिटिश पोलिसांशी सामना करण्यासाठी सशस्त्र दलाची स्थापना केली होती. तुफान दल असे या दलाचे नाव होते. कुंडल येथील व्यायामशाळेत या सैनिकांना प्रशिक्षण दिले जात असे. त्यांची बौध्दिके घेतली जात. जवळपास पाच हजारांवर युवक या तुफान दलात सैनिक म्हणून दाखल झाले होते.
सरकार म्हणून या भागातील गुंडगिरीचा पूर्ण बंदोबस्त केला होता. फंदफितुरी करणाऱ्यावर कडक कारवाई केली जात होती. खासगी सावकारी पूर्णपणे संपविली होती. दारू, अफू, गांजा या व्यसनांवर पूर्णपणे बंदी होती. चोर, दरोडेखोर, गुंडापुंडाचा बंदोबस्त केला होता. हुंडाबंदी होती. इथला स्त्रीवर्ग, माता भगिनी सुखी समाधानी सुरक्षित झाल्या होत्या. प्रतिसरकारने अत्यंत कमी खर्चात होणाऱ्या गांधी लग्नाची पध्दत रूढ केली. मानपान नाही. हुंडा नाही. रूखवत नाही. रूसवाफुगवा नाही. फक्त नवरानवरीला खादीचे कपडे आणि दोन हार एवढ्या कमी खर्चात लग्ने होऊ लागल्याने गरीब सर्वसामान्य वर्ग सुखावला होता. अत्यंत शिस्तबद्धपणे प्रतिसरकारचा कारभार चालविला जाई. यामध्ये अडथळा आणणाऱ्यास, विरोध करणाऱ्यास आणि ब्रिटिशांकडे फितुरी करणाऱ्यास कडक शासन केले जाई. गुन्हेगाराचे दोन्ही पाय एकत्र बांधून दोन्ही पायांच्या तळव्यावर काठीचे तडाखे दिले जात. या शिक्षेला पत्री लावणे असे म्हटले जाई. म्हणूनच या सरकारला पत्रीसरकार असे नाव पडले.
आदर्श ग्रामराज्याचा कारभार करताना इथल्या ब्रिटिश सत्तेशीही दोन हात करावे लागत होते. त्यांची सत्ता उखडून टाकण्यासाठी क्रांतिकारी कारवाया करत होते. ब्रिटिश ठाणी जाळणे, सरकारी खजिना लुटणे, त्यांचा शस्त्रसाठा हस्तगत करणे अशा अनेक कारवाया केल्या जात होत्या. जनतेच्या मनात विश्वासाने स्थान मिळवलेले आणि ब्रिटिश साम्राज्याने धसका घेतलेले सरकार या भूमीत उभा राहिले होते. या सरकारची दखल ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये घेतली गेली होती. सातारमध्ये राज्य कोणाचे? ब्रिटिशांचे की नाना पाटलांचे असा प्रश्न ब्रिटिश पार्लमेटला पडला होता आणि होय साताऱ्यात राज्य नाना पाटलांचे असे खालमानेने पार्लमेंटमध्ये अधिकाऱ्यांनी उत्तर दिले होते.
असे हे ब्रिटिशांना धडकी भरवणारे प्रतिसरकार क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावाने ओळखले जात होते. कारभार सुरळीत चालण्यासाठी याचे १८ विभाग होते. प्रत्येक विभागाला एक गट प्रमुख आणि दोन उपप्रमुख होते. सर्व विभागात समन्वय साधण्यासाठी डिक्टेटर होते. ३ ऑगस्ट १९४३ च्या पणुंब्रे येथील बैठकीत प्रतिसरकारची कार्यकारिणी जाहीर झाली. सुरवातीला यशवंतराव चव्हाण प्रतिसरकारचे डिक्टेटर होते. त्यांच्या अटकेनंतर किसनवीर आबा काही काळ डिक्टेटर झाले. त्यांच्यानंतर क्रांतीवीर नाथाजी लाड हे प्रतिसरकारचे डिक्टेटर राहिले. बर्डे मास्तर, बाबुजी पाटणकर, शेख काका, नागनाथ नायकवडी, किसन अहिर, जी. डी. बापू लाड, ईश्वरा बापू लाड, भगवानराव मोरे, गोविंदराव मिरगे, रा. तु. पाटील, किसनवीर आबा, बाबुराव चरणकर, पांडु मास्तर, धोंडिराम माळी, शाहीर शंकरराव निकम, स्वामी रामानंद भारती, आप्पा मास्तर यांचे बरोबरच धुळ्याचे डा. उत्तमराव पाटील असे अनेक क्रांतिकारक नाना पाटलांबरोबर प्रतिसरकारात लढत होते. या क्रांतिकारकांनी जीवावर उधार होवून ब्रिटिशांविराधोत लढा दिला. यातील अनेकांवर पकड वारंट निघाले. अनेकांना पकडण्यासाठी हजारो रूपयांची बक्षिसे लावली होती. पोलिसांना बघताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले. अनेकांना पकडून तुरूंगात डांबण्यात आले. या क्रांतिकारकांच्या घरच्या लोकांचा छळ करण्यात आला. घरेदारे, शेत जमिनी जप्त केल्या. पण येथील सर्वसामान्य लोकांच्या पाठिंब्याच्या जोरावर प्रतिसरकार लढत राहिले. हे प्रतिसरकार मोडून काढण्यासाठी ब्रिटिश पोलिसांनी दडपशाही, दमनशाहीचा हरप्रकारे वापर केला. क्रूरतेची परिसीमा गाठली. परंतु अखेरपर्यंत त्यांना यश मिळाले नाही. केवळ ब्रिटिशांना घालवणे एवढेच प्रतिसरकारचे उद्दिष्ट नव्हते तर आदर्श ग्रामराज्य कसे असावे याचा तो वस्तुपाठ होता. छ. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या समन्यायी स्वराज्याची ती लहान प्रदेशात साकारलेली प्रतिकृती होती. ती सातारा जिल्ह्याची क्रांतीभूमी होती.
Edited by : Ratnadeep Ranshoor