निळं पाखरू

ND
असीम आकाशाच्या निळाईशी
स्पर्धा करणारं
एक इवलंसं निळं पाखरू
मधून मधून
आपल्या गोड आवाजात
शीळ घालीत असतं
जीवनाच्या रटाळ चाकोरीतून
आपलं लक्ष स्वत:कडे
वेधीत असतं

त्याचं ते निळं अंग आणि शीळ
वेगळाच विरंगुळा बनतो माणसासाठी

काही काळ का होईना
जीवनाची मरगळ
झटकून टाकण्याचं बळ
असतं त्याच्या आर्त स्वरात

मग लक्षात येतं
निळ्या पाखराचं इवलंसं रूप घेऊन
आपलंच मन आपल्याला रिझवीत असतं
थकल्या भागल्या जीवाला जोजवीत असतं.

वेबदुनिया वर वाचा