गरुडाने घुबडाला विचारले माझा काय दोष

बुधवार, 7 एप्रिल 2021 (11:02 IST)
एका जंगलात सोबत राहणारे गरुड आणि घुबड यांचं आपसात मुळीच पटत नसे. एकमेकांशी वैर ठेवून कंटाळून शेवटी त्यांनी एकेदिवस मैत्री करण्याचे ठरविले. दोघांनी शपथ घेतली व एकमेकांच्या पिल्लांस खाणार नाही असे ठरविले. 
 
घुबड गरुडास म्हणाला- माझी पिल्ले कशी असतात हे तर तुला ठाऊक आहे ना? नाहीतर ती दुसऱ्या एखादया पक्ष्याची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील. त्यावर गरुड म्हणाला- खरंच, तुझी पिल्ले कशी असतात, हे मला मुळीच ठाऊक नाही.
घुबड- मी नीट ऐक. माझी पिल्ले फार सुंदर दिसतात. त्यांचे डोळे, पिसे, शरीर सर्वच सुंदर असत. यावरुन माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल.
 
पुढे एके दिवशी एका झाडाच्या ढोलीत गरुडास पिल्ले सापडली. त्यांच्याकडे गरुडाने विचार केला की ही तर घाणेरडी आणि कुरूप पिल्ले दिसत आहे म्हणजे घुबडाची नसणार कारण त्याने सांगितले होते की त्याची पिल्ले फार सुंदर असतात. असा विचार करुन त्याने त्या पिलांचा फडशा उडविला.
 
नंतर झाडावर आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाला- इतकं समजावून सुद्धा तू माझी पिल्ले मारून खाल्लीस.
गरुड म्हणाला- मी खाल्ली खरी पण त्यात माझा काय दोष. तूच आपल्या पिल्लाचे खोटे वर्णन केलेस, त्यामुळे ती पिल्ले मला ओळखता आली नसल्यामुळे मी ती मारुन खाल्ली. कारण कुरूप पिल्ले घुबडाची नसतात, अस तूच सांगितलं होतं.
 
तात्पर्य - स्वत:बद्दल खरं काय ते सांगणे भल्याचं ठरतं नाहीतर शेवटी संकट येऊ शकतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती