राग पळाला...

मंगळवार, 28 एप्रिल 2015 (12:53 IST)
एकदा एक मुलगा आपल्या आईवर शुल्लक कारणास्तव रागावला. राग कसला तर आईने त्याच्या आवडीची भाजी नव्हती केली. तोंडातून एक शब्दही न काढता तो घरात वावरत होता. जेवणसुद्धा त्यानं मुकाट्याने केलं. दिवस सरला तर रात्री चुपचाप झोपायच्या खोलीत गेला व दिवा न लावता अंथरुणावर आडवा झाला. किती जरी राग असला तरी तो मर्यादेनंच शोभून दिसतो. रागावण्याचं कारण तर होतं क्षुल्लक, आणि त्याकरिता यांनी दिवसभर रागावून राहावं? ते काही बरं नाही.

याच्या रागावर काहीतरी औषध शोधून काढलंच पाहिजे, असा विचार करून त्याच्या आईनं एक मेणबत्ती पेटविली आणि त्याच्या बेडरूमध्ये प्रत्येक कानाकोपरा मेणबत्तीच्या प्रकाशात धुंडाळू लागली. बराच वेळ झाला तरी आईचं धुंडाळणं संपत नाहीसे पाहून उत्कंठेपोटी तोंड उघडून अखेर त्या मुलाने विचारलं, काय गं आई? काय शोधते आहेस?

यावर आई म्हणाली, सकाळपासून माझ्या लाडक्या मुलाची वाचा कुठे गडप झाली, ती शोधत होते. तिच्या या अनपेक्षित पण चातुर्यपूर्ण उत्तरानं मुलाला एकदम हसू फुटलं व आईवरचा त्याचा राग कुठल्या कुठे निघून गेला.

वेबदुनिया वर वाचा