आचरण

मंगळवार, 19 मे 2015 (12:20 IST)
एकदा एका साधूकडे एक गृहस्थ गेले. त्यांनी साधूला विचारले, ‘मोक्षासाठी घर का सोडावे लागते?’ साधू म्हणाले, ‘कोण म्हणतो? जनकासारख्या राजांनी राजवाड्यात राहून मोक्ष साधला. मग तुला घर सोडण्याची गरजच काय?’
 
एवढ्यात एक दुसरा गृहस्थ तिथे आला. त्याने साधूला विचारले, ‘महाराज! घर सोडल्याशिवाय मोक्ष मिळेल का?’ साधू म्हणाले, ‘कोण म्हणतो? घरात राहून सुखासुखी मोक्ष मिळाला असता, तर मग शुक्रासारख्यांनी गृहत्याग का केला असता?’
 
या दोन गृहस्थांनी एकमेकात विचारविनय करण्यास सुरुवात केली. त्यांचे भांडण जुंपले. एक म्हणे, ‘मोक्षासाठी घर सोडायला हवे’ तर दुसरा म्हणे ‘घर सोडण्याची गरज नाही.’ अखेर पुन्हा दोघे त्या साधूकडे आले. त्यावर साधू म्हणाला, ‘दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. ज्याची जशी वृत्ती तसा त्याला मार्ग. ज्याचा जसा प्रश्न तसे त्याचे उत्तर.’
 
शिक्षा- जीवनात आपल्या प्रवृत्तीला जसे मानवेल, तसेच आचरण करावे.

वेबदुनिया वर वाचा