बाळ जातो दूर देशा, मन गेले वेडावून
आज सकाळपासून
हात लागेना कामाला, वृत्ती होय वेड्यावाणी
याच्या आवडीचे चार, करू सुंदर पदार्थ
काही देऊ बरोबर
त्याचे बघा ठेवीले का, नीट बांधून सामान
वाऱ्यासारखी धावते, वेळ भराभर कशी!
गाडी थांबेल दाराशी
पत्र धाड वेळोवेळी, जप आपुल्या जीवास
बाळा, तुझ्याकडे माझा, जीव तसाच लागेल
स्वप्नी तुलाच पाहील
बाळ जातो दूर देशा, देवा! येऊन ऊमाळा