मराठीची लज्जत "खाणे"... जे पोटात कधीच जात नाही

गुरूवार, 31 जुलै 2025 (15:48 IST)
मराठी भाषेत खाण्याचे काही विशेष वेगळे प्रकार आहेत.ते प्रत्यक्षात आपल्या पोटापर्यंत कधी पोचतच नाहीत. अशा प्रकारांची आज आपण माहिती घेणार आहोत.
बऱ्याच वेळा लहानपणी आपण आई-वडील आणि शिक्षकांचा मार खातो! 
पण, आपण शहाणे झालो की शब्दांचा खाल्लेला मार आपल्याला पुरतो.
काही व्यक्ती मधून मधून इतरांचा वेळ आणि डोके खातच असतात.
काही लोक इतरांवर खार खातात.
तर काही अकारण भाव खात असतात !
काही विशेष कर्तबगार (!) लोक तर पैसा पण खाऊ शकतात !
आणि त्यांचे खाणे उघडकीस आले तर लोक त्यांना, "काय माती खाल्लीस" असे म्हणतात.
आणि  शेण खाणे हा एक वेगळाच प्रकार आहे,  त्याबाबत काय लिहावे?
शिव्या तर आपण रोजच कुणाच्या ना कुणाच्या खात असतो.
पण त्यामुळे आपला जो अपमान होतो तो मात्र खाता येत नाही. तो आणि आलेला राग दोन्ही गिळावे लागतात.
कधी कधी मात्र उलटे होते. जी व्यक्ती अपमान करते, तिलाच तिचे शब्द गिळावे लागतात.
काही लोक तर राग आला की दात ओठ पण खातात.
या खाण्याच्या प्रकारात काही अभक्ष्य भक्षणाचे प्रकार पण आहेत. उदाहरणार्थ जीव खाणे, भेजा खाणे इ.
बरीच माणसं नको तिथे कच खातात.
काही लोकांच्या मृत्यूचं कारण पण खाणंच असतं, पण त्याला हाय खाणं म्हणतात.
काही लोक बोलता बोलता शब्द खातात..
तर काही लोक हवा किंवा ऊन खायला बाहेर पडतात.
विवाहीत पुरुष नियमितपणे खातो, ती म्हणजे  आपल्या बायकोची बोलणी...!
ही मराठी समजावून घेणे म्हणजे बुद्धीला एक प्रकारचे खाद्यच आहे, ज्यामुळे मराठीची लज्जत वाढते !!
आपल्याला ही मराठी आईकडून वारसाहक्काने (विनामूल्य विनासायास) मिळाली आहे , तिची गोडी चाखा.

- Social Media

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती