हा कंद जेव्हा ओला असतो तेव्हा त्याला आलं, अदरक असे म्हणतात. तोच कंद वाळला असता त्याला सूंठ म्हणतात. दोन्ही मूलतः एकच असले तरी दोघांच्या गुणधर्मात खूप फरक आहे. आलं हे कटू, उष्ण, तीक्ष्ण व रुक्ष असल्याने कफाचा नाश करणारे आहे, म्हणून पावसाळ्यात, हिवाळ्यात त्याचा वापर मुद्दाम जास्त करावा.
आलं हे अग्रिदीपक आहे. भूक लागत नसेल, अजीर्ण झाल्यास, तोंडाला चव नसेल तर आले द्यावे. जेवणापूर्वी अर्धा तास अगोदर आल्याचा तुकडा मिठासोबत खावा किंवा आल्याचा रस एक चमचा आणि थोडेसे काळे मीठ टाकून घ्यावे. यामुळे भूक लागते. पडसे, खोकला आल्यास आल्याचा रस पिंपळीपूर्ण व मधासोबत द्यावा. हा प्रयोग दिवसातून तीनवेळा करावा.
आल्याचा रस मधासोबत दिल्याने उचकीसुद्धा कमी होते. संपूर्ण अंगावर सूज येत असेल तर आले गुळासोबत खाल्ल्याने फायदा होतो. आल्यापासून आल्याचा कीस, सुपारी, पाक बनविता येतात. आल्याचा पाक करताना आल्याच्या रसात विलायची, जायफळ, लवंग, पिंपळी, काळी मिरी, हळद, साखर टाकावी. यामुळे आलेपाक गुणकारी बनतो.