पिण्याच्या पाण्याच्या बाटलीमध्ये कमोडच्या सीटपेक्षा जास्त जंतू असतात? संशोधक काय इशारा देतात? वाचा
शनिवार, 6 जुलै 2024 (00:03 IST)
मागील काही वर्षांमध्ये पिण्याच्या पाण्याची बाटली ही संकल्पना फक्त लोकप्रियच झालेली नाही तर ती आपल्या दैनंदिन आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग बनली आहे.
पिण्याच्या पाण्याच्या स्वच्छतेबद्दल सर्वत्र काळजी घेतली जात असताना पाण्याच्या बाटलीच्या स्वच्छतेबाबत मात्र उदासिनताच दिसून येते. पाण्याच्या बाटलीत किती सूक्ष्मजीव असतात, बाटलीची स्वच्छता कशी राखावी, त्यासंदर्भातील संशोधन इत्यादी महत्त्वाच्या मुद्द्यांच्या या लेखात उहापोह करण्यात आला आहे.
अलीकडच्या कुठेही बाहेर जायचं असल्यास बॅगेत पाण्याची बाटली सोबत नेली जाते. सगळीकडे सहज नेता येते आणि परत वापरता येते म्हणून पाण्याची बाटली हाताशी ठेवली जाते. तसंच तहान भागवण्याचं मुख्य काम ही बाटली करत असते.
मात्र पाण्याच्या बाटलीसंदर्भात तुम्ही स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून कधी विचार केला आहे का?
"आपण या बाटल्यांचा वापर फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच करतो. अनेकांना वाटतं की पिण्याचं पाणी भरण्याआधी बाटली नळाखाली फक्त सेकंद धरली, विसळली की झालं बाटली स्वच्छ झाली," असं डॉ. रॉडरिगो लिंझ यांना वाटतं. ते ब्राझिलमधील संसर्गजन्य आजारांसंदर्भातील संस्थेत (ब्राझिलयन सोसायटी ऑफ इन्फेक्शियस डिझीजेस) सल्लागार आहे.
मात्र संशोधनातून असं आढळून आलं आहे की बाब खरी नाही. जर पाण्याची बाटली व्यवस्थित स्वच्छ केली नाही तर त्यामध्ये जीवाणू आणि बुरशीसारखे सूक्ष्मजीव जमा होतात. ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
बाटली जमा होतात सूक्ष्मजीव
वॉटरफिल्टरगुरु (WaterFilterGuru) या कंपनीनं एक अभ्यास केला. ही कंपनी पाण्याच्या गुणवत्तेसंदर्भात विशेष काम करते. त्यांच्या अभ्यासानुसार पुन्हा-पुन्हा वापरात आणलेल्या (reusable) पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत जवळपास 2.8 कोटी कॉलनी फॉर्मिंग युनिट्स (CFU) असतात.
कॉलनी फॉर्मिंग युनिट्स (CFU)हे एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर किती प्रमाणमात सूक्ष्मजीव आपली संख्या वाढवू शकतात ते मोजण्याचे परिमाण आहे. म्हणजे सूक्ष्मीजीवांची संख्या किंवा प्रमाण सीएफयूद्वारे मोजले जाते.
या अभ्यासात पिण्याच्या पाण्याच्या बाटलीच्या दूषित होण्याच्या पातळीची तुलना इतर घाणेरड्या वस्तूंशी करण्यात आली होती.
उदाहरणार्थ, संशोधकांना असं आढळून आलं की टॉयलेट सीटचा (पाश्चात्य पद्धतीच्या कमोडचं सीट) पृष्ठभागावरील सरासरी सीएफयू 515 इतकं होतं. याचाच अर्थ पाण्याच्या बाटलीत टॉयलेट सीटवर असतात त्यापेक्षा 40,000 पट अधिक जीवाणू होते.
पाळीव प्राण्यांना अन्न देण्यासाठी वापरली जाणारी भांडी किंवा डिश (सरासरी 14 लाख सीएफयू), कॉम्प्युटरचा माऊस (40 लाख सीएफयू) आणि स्वयंपाकघरातील सिंक (1.1 कोटी) यामध्ये सुद्धा पाण्याच्या बाटलीच्या तुलनेत कमी जीवाणू होते.
चीनमधील हेनान विद्यापीठातील तज्ज्ञांनी प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की पाण्याच्या बाटल्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जीवाणू असतात आणि त्यामध्ये सूक्ष्मजीवांची वेगानं वाढ होऊ शकते.
विद्यापीठातील प्राध्यापकांनी असं सांगितलं की, पाण्याच्या प्रत्येक मिलीलिटरमध्ये सरासरी 75,000 जीवाणू असतात. त्यांच्या अभ्यासात असं देखील म्हटलं आहे की या सूक्ष्मजीवांच्या संख्येत 24 तासात दर मिलिलिटरमागे 20 लाखांची वाढ होऊ शकते.
अमेरिकेतील परड्यू विद्यापीठात पाण्याच्या बाटल्यांचा वापर करणाऱ्या 90 जणांवर करण्यात आलेल्या आणखी एका अभ्यासात असं आढळून आलं की 15 टक्के लोक दिवसअखेर बाटलीत शिल्लक राहिलेलं पाणी फेकून त्यात नवीन पाणी भरण्याऐवजी शिल्लक राहिलेलं पाणीच पितात.
वॉटरफिल्टरगुरुच्या सर्वेक्षणातूनसुद्धा काही आरोग्यविषयक मुद्दे समोर आले. सर्वेक्षणात सहभागी होणाऱ्या 42 टक्के लोकांनी सांगितलं की, ते दिवसातून किमान एकदा तरी पाण्याची बाटली धुतात. तर 25 टक्के लोकांनी सांगितलं की ते पाण्याची बाटली आठवड्यातून काही वेळा धुतात. तर 13 टक्के लोकांनी सांगितलं की ते महिन्यातून फक्त दोनदाच पाण्याची बाटली स्वच्छ करतात.
पाण्याच्या अस्वच्छ बाटलीचे धोके
पाण्याची अस्वच्छ बाटली वापरण्यातील धोके कोणते? पाण्याची बाटली नेहमी स्वच्छ कशी ठेवायची?
लक्षात ठेवा आपल्या अवतीभोवती सर्वत्र जीवाणू असतात. अर्थात ही काही वाईट गोष्ट नाही. (कारण ते सजीवसृष्टीचाच एक भाग आहेत आणि जगण्यासाठी आपल्याला जीवाणूंची आवश्यकता असते)
हे सूक्ष्मजीव आपल्या पाण्याच्या बाटलीमध्ये वेगवेगळ्या मार्गांनी शिरू शिकतात.
पहिला आणि सर्वात सोपा मार्ग म्हणजे जेव्हा तुम्ही पाणी पिण्यासाठी बाटली तुमच्या तोंडावर आणता तेव्हा ते बाटलीत जाऊ शकतात. स्टॅफायलोकॉक्की (staphylococci)आणि स्ट्रेप्टोकॉक्की (streptococci)या जीवाणूंसारखे काही सूक्ष्मजीव आपली त्वचा, ओठ, हिरड्या, दात आणि जीभेवर असतात. आपण बाटलीजवळ तोंड नेल्यानंतर ते बाटलीत शिरतात आणि त्या नव्या वातावरणात वेगानं वाढतात.
जेव्हा आपण बाटली उचलण्यासाठी किंवा बाटलीचं झाकण उघडण्यासाठी आपली बोटं उचलतो तेव्हा याच प्रकारची गोष्ट घडते. कारण आपण अशा ठिकाणांना किंवा वस्तूंना स्पर्श करत असतो ज्याला अनेकजणांनी हात लावलेला असतो. उदाहरणार्थ- दरवाजाचं हँडल, लिफ्टचं बटण, जिन्यांचे कठडे इत्यादी.
पाण्याची बाटली ज्या बॅगेत असते ती बॅग, शाळेतील लॉकर्स, कामाच्या ठिकाणचे डेस्क आणि स्वयंपाकघरातील सिंक इथंसुद्धा जीवाणूंना आश्रय मिळतो आणि त्यांची वाढ होते.
चिनी विद्यापीठातील अभ्यासानुसार, जर पाण्याची बाटली अधूनमधून स्वच्छ करण्यात आली नाही, तर हे जीव त्यामध्ये शिरू शकतात. तिथे ते कॉलनी म्हणजे त्यांच्या वस्त्या बनवू शकतात आणि त्यांची संख्या वेगानं वाढू शकते. त्यामुळंच ते फक्त 24 चोवीस तासात 75 हजार प्रति मिलिलिटरवरून 20 लाख प्रतिलिटरवर पोहोचू शकतात
आर्द्र, उबदार आणि काळोखं वातावरण (प्लास्टिकच्या किंवा अॅल्युमिनियमच्या बाटल्यांमध्ये) हे बुरशीच्या अनेक प्रजातींसाठी आदर्श वसतीस्थान असतं.
अत्यंत वाईट स्थितीतील किंवा स्वच्छ न ठेवलेल्या बाटल्यांमध्ये तर आपल्या डोळ्यांनीच आपल्याला या सूक्ष्मजीवांचं काम किंवा अस्तित्व दिसू शकतं.
पाण्यामध्ये काही कण दिसू शकतात. हे कण सहजा बाटलीच्या तळाशी असतात किंवा बाटलीच्या झाकणाच्या पृष्ठभागावर हिरव्या किंवा काळ्या रंगाचा थर आलेला असतो.
आपल्या शरीरावर याचा काय परिणाम होतो?
या सूक्ष्मजीवांमुळे आपल्या आरोग्याला काही धोका असतो का? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे.
तज्ज्ञांच्या मते याचं उत्तर अनेक घटकांवर अवलंबून असतं.
"आपण ही बाब लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या शरीरातील जितक्या पेशी आहेत त्यापेक्षा दहा पट जास्त जीवाणू शरीरात आहेत," असं लिंझ सांगतात. ते रिओ दी जनिरो राज्याच्या इन्फेक्शियस डिसीजेस असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.
"किती प्रमाणात आणि किती प्रकारचे सूक्ष्मजीव शरीरात जात आहेत यानुसार आपली रोगप्रतिकारक्षमता कोणत्याही मोठ्या अडचणींशिवाय त्यांची गरज किंवा मागणी हाताळू शकते," असं ते म्हणतात.
उदाहरणार्थ, काही वेळा बाटलीतील सूक्ष्मजीवांची संख्या जेव्हा खूपच जास्त असते तेव्हा त्या बाटलीचा नियमितपणे वापर करणाऱ्या व्यक्तीला मळमळ किंवा उलटी सारखी सौम्य लक्षणे जाणवू शकतात.
जर तुम्हाला बुरशीची अॅलर्जी असेल तर सूक्ष्मीजीवांनी भरलेल्या बाटलीचा वापर केल्यामुळे तुम्हाला नाक बंद होणे किंवा नाक वाहणं, मळमळ, डोकेदुखी, थकवा येणे आणि इतर त्रास होऊ शकतात.
"मोठी मुलं, वयस्कर लोक किंवा ज्या लोकांची रोगप्रतिकारक्षमता कमकुवत आहे अशांवर या सूक्ष्मजीवांचा अधिक परिणाम होतो. त्यामुळेच आपण स्वत:साठी ज्या वस्तू किंवा उत्पादने नियमितपणे वापरतो त्यांच्या स्वच्छतेकडे आपण अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असते," असं जॉर्ज टिमेनेझ्की सांगतात. ते साओ पाउलो विद्यापीठातील बायोमेडिकल सायन्सेस विभागात सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (मायक्रोबायोलॉजिस्ट) आहेत.
पाण्याच्या बाटल्या कशा स्वच्छ कराव्या?
"आपण प्रत्येक वेळेस जेव्हा पाण्याच्या बाटल्यांचा वापर करतो तेव्हाच त्यांना धुणे किवा स्वच्छ करणे हे सर्वात उत्तम," असं लिंझ सांगतात.
"दररोज जेव्हा तुम्ही घरी आल्यानंतर पाण्याची बाटली स्वच्छ करणं पुरेसं आहे," असंसुद्धा टिमेनेस्की सांगतात.
जीवाणूंच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भांडी धुण्यासाठी वापरतात त्या साबणाचा वापर पाण्याची बाटली स्वच्छ करण्यासाठी करावा. त्यानंतर साध्या नळाच्या पाण्यानं ती बाटली स्वच्छ धुवून घ्यावी.
"त्याचबरोबर बाटलीच्या आतील बाजूस असलेले सूक्ष्मजीव काढले जावेत यासाठी ब्रशचा वापर करणंसुद्धा महत्त्वाचं आहे. ब्रशचा वापर करून बाटली आतून चांगली धुवावी," असं टिमेनेझ्की सांगतात. ते म्हणतात की धुतल्यानंतर पाण्याची बाटली थोडा वेळ कोरडी होऊ देऊन नंतर त्यात पिण्याचं पाणी भरणं ही सुद्धा चांगली बाब आहे.
पाण्याच्या बाटलीच्या वापराबाबत संशोधक सूचना करतात की तुमची पिण्याच्या पाण्याची बाटली इतरांना देऊ नका. प्रत्येक व्यक्तीकडे त्याची स्वत:ची पाण्याची बाटली असली पाहिजे. त्याचबरोबर पाण्याची बाटलीत फळांचे रस, एनर्जी ड्रिंक्स, शीतपेयं यासारखी पेयं भरता कामा नयेत. कारण या पेयांमध्ये असे काही पोषक घटक असतात जे सूक्ष्मजीवांची वाढीसाठी अनुकूल असतात.
त्याशिवाय ज्या गोष्टीपासून पाण्याची बाटली बनलेली असते त्याचा प्रदूषणाच्या पातळीवर परिणाम होतो का? अॅल्युमिनियम, प्लास्टिक किंवा काचेच्या बाटल्यांचा वापर करावा का? त्याचे फायदे किंवा तोटे आहेत का?
तज्ज्ञांच्या मते, पाण्याच्या बाटली कोणती निवडावी आणि वापरावी ही प्रत्येकाच्या प्राधान्यक्रमाची बाब आहे. कारण सूक्ष्मजीवांचा विचार करता सर्वच प्रकारच्या बाटल्यांची वैशिष्ट्ये जवळपास सारखीच असतात.
मात्र आधी उल्लेख केलेल्या परड्यू विद्यापीठात झालेल्या अभ्यासात म्हटलं आहे की काचेच्या बाटल्यांमध्ये अॅल्युमिनियमच्या बाटल्यांपेक्षा तुलनात्मकरित्या कमी सूक्ष्मीजीव असतात.
"काचेची असो की अॅल्युमिनियमची, जी बाटली स्वच्छ करण्यासाठी, धुण्यासाठी सोपी आहे तीच विकत घ्या. कारण बाटलीची स्वच्छता महत्त्वाची आहे," असं लिंझ म्हणतात.