समस्या फ्रोजन शोल्डरची

सोमवार, 14 मे 2018 (14:32 IST)
संपूर्ण दिवस एकसारख्यास्थितीत बसून राहिल्याने सांधे दुखतात, जाम होतात. फ्रोजन शोल्डरची समस्या होण्यामागे नेमके कारण काय याचा उलगडा झालेला नाही, पण ही समस्या व्यावसायिकांना त्यातही स्त्रियांना होण्याचे प्रमाण अधिक आहे. 
 
फ्रोजन शोल्डरमध्ये खाद्यांच्या हाडांची हालचाल करणे कठीण होते. वैधकीय भाषेत या वेदनांना अ‍ॅडेसिव्ह कॅप्सूलायटिस म्हटले जाते. प्रत्येक सांध्याच्या बाहेर एक कॅप्सूल असते. फ्रोजन शोल्डर समस्येमध्ये हीच कॅप्सूल कडक होते. ह्या वेदना हळूहळू सुरु होतात आणि संपूर्ण खांदे जाम होतात. बरेचदा गाडी चालवता चालवता किंवा काही घरगुती काम करता करता अचानक या वेदना सुरु होतात. एखादी व्यक्ती गाडी चालवत असेल आणि मागच्या जागेवरील सामान घेण्यासाठी मागे हात फिरवला तर खांदा हलवूच शकत नाही, असे लक्षात येते. हे फ्रोजन शोल्डरचे लक्षण असते. मानेच्या कोणत्याही दुखण्याला फ्रोजन शोल्डर समजले जाते पण तसे नाही. काहीवेळा त्याला आर्थ्ररायटिस समजण्याची चूक केली जाते. इजा किंवा धक्का लागल्याने होणार्‍या प्रत्येक वेदना म्हणजे फ्रोजन शोल्डर नाहीत. ही एक स्वतंत्र आरोग्यसमस्या आहे. ही समस्या खूप लोकांना भेडसावते. 
 
यासंदर्भात झालेल्या पाहण्यांनुसार, * फ्रोजन शोल्डरने ग्रस्त 60 टक्के लोक तीन वर्षात स्वतःच बरे होतात. * 90 टक्क लोक स्वतःच सात वर्षात बरे होतात. * पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात भेडसावते. * ही समस्या 35 ते 70 वर्षांच्या वयात अधिक जाणवते. * मधुमेह, थायरॉईड, कार्डिओ व्हॅस्क्युलर समस्या, क्षयरोग आणि पार्किन्सन्स असलेल्या व्यक्तींना हा त्रास होण्याची शक्यता असते. * 10 टक्के लोकांच्या वेदना कमी होत नाहीत, त्यावर शस्त्रक्रिया किंवा शस्त्रक्रियेविना उपचार होऊ शकतात. 
 
निदान आणि उपचार - लक्षणे आणि शारीरिक तपासणी यामुळेच डॉक्टर हा आजार ओळखू शकतात. प्राथमिक तपासणीत खांदे आणि हात यांच्या काही खास जागांवर दाब देऊन वेदनेची तीव्रता ओळखता येते. त्याशिवाय एक्स-रे किंवा एमआरआय तपासणी करण्याच्या सल्लाही दिला जातो. उपचारांची सुरुवात ही समस्या किती गंभीर आहे हे पाहून केली जाते. वेदनाशामक औषधांच्या मदतीने वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून रुग्णाला खांदे हलवता येतील. वेदना कमी झाल्यानंतर फिजिओथेरेपी सुरु केली जाते. यामध्ये हॉट आणि कोल्ड कॉम्प्रेशन्स पॅक्स दिले जाते. त्यामुळे खांद्यांची सूज आणि वेदना यामध्ये आराम पडतो. अनेकदा रुग्णांना स्टिरॉईडस देण्याची गरज भासू शकते. अर्थात अगदी अपरिहार्य स्थितीत ते दिले जातात; अन्यथा नुकसानच होते. काही परिस्थितींमध्ये लोकल अ‍ॅनेस्थेशिया देऊन खांदे हलवले जातात. त्याशिवाय शस्रक्रियेचा पर्याय वापरावा लागतो. 
 
हेही लक्षात ठेवा - 
* खांद्यांच्या वेदनांकडे दुर्लक्ष नको. सततच्या वेदना होत असतील तर डॉक्टरी सल्ला अवश्य घ्यावा. 
* वेदना खूप जास्त असतील तर हात डोक्याच्या वर अंतरावर ठेवून झोपावे. हाताच्या खाली उशी ठेवून झोपल्यास आराम वाटतो. 
* 3 ते 9 महिन्यांपर्यंतचा काळ हा फ्रिजिंग काळ मानला जातो. या दरम्यान फिजिओथेरेपी घेऊ नये. वेदना वाढल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने वेदनाशामक गोळ्या किंवा इंजेक्शन घ्यावेत. 
* सहा महिन्यांनंतर शोल्डर फ्रोजन पिरीयडमध्ये जातो. तेव्हा फिजिओथेरेपी घ्यावी. 10 टक्के रुग्णांमध्ये रुग्णाची अवस्था गंभीर होऊ शकते. त्याचा परिणाम दैनंदिनीवर होतो आणि कामावरही त्याचा परिणाम होतो. अशा वेळी शस्त्रक्रियादेखील करता येऊ शकते. 
* अनेकदा फ्रोजन शोल्डर आणि इतर वेदना यांची लक्षणे सारखीच भासतात. त्यामुळे तज्ज्ञांकडून तपासणी होणे आवश्यक असते. जेणेकरूनयोग्य कारणे ओळखता येतील. 
 
व्यायामही आहे उपचार-
* बंद असलेला घट्ट दरवाज्याचे हँडल चांगल्या असलेल्या हाताने धरावा आणि वेदना होणारा हात मागच्या बाजूला नेण्याचा प्रयत्न करावा. 
* वेदना होणारा हात हळूहळू उचलावा. दुसरा हात पाठीच्या बाजूला न्यावा आणि टॉवेलच्या साहाय्याने वर खाली हलवण्याचा प्रयत्न करावा. 
* वेदना होणारा हात दुसर्‍या खांद्याकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. दुसर्‍या हाताने कोपर्‍याला आधार द्यावा.

साभार : डॉ. मनोज शिंगाडे 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती