कोव्हिडमुळे वास घेण्याची क्षमता गेली असल्यास व्हिटॅमिन A ठरू शकतं परिणामकारक
शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (17:17 IST)
कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर वास घेण्याच्या आणि चव कळण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण कोव्हिड बरा झाल्यानंतरही आपली गंध आणि चवीची क्षमता पूर्ववत झाली नसल्याची अनेकांची तक्रार आहे.अशा लोकांसाठी ही आनंदाची बातमी.
युकेमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, "नाकात व्हिटॅमिन A चे काही थेंब टाकल्यास रुग्णांना फायदा होऊ शकतो.अशा प्रकारच्या उपचारांमुळे त्यांची वास घेण्याची क्षमता पुन्हा पूर्ववत होऊ शकते, असं या संशोधनात म्हटलं आहे.युकेमधील युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँग्लिआ येथे यासंदर्भात 12 आठवड्यांचं एक संशोधन सुरू आहे.
यामध्ये काही रुग्णांना काही तीव्र वासाचे पदार्थ हुंगण्यास सांगितलं जात आहे. त्यापैकी काही रुग्णांवर वरील उपचारपद्धतीची चाचणी घेतली जात आहे.
यादरम्यान रुग्णांच्या मेंदूचा स्कॅन घेतला जात असून व्हिटॅमिनमुळे वास घेण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या नाकातील ग्रंथींवर याचा कशा प्रकारे परिणाम होतो, हेसुद्धा पाहिलं जात आहे.
कोव्हिडच्या लक्षणांमध्ये चव-गंध जाणं हे एक सर्वसाधारण लक्षण आहे. याशिवाय, इतर काही विषाणूंची लागण झाल्यासही (उदा. फ्लू) वास घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.
बरे झाल्यानंतर रुग्णांची ही क्षमता काही दिवसांनी पूर्ववत होतो. पण काहींवर याचा दूरगामी परिणाम दिसून येतो.
लंडन येथे राहणाऱ्या 29 वर्षीय लिना अॅलनादी.
लिना यांना कोव्हिड होऊन गेल्यानंतर त्यांच्यात पॅरोस्मिया डिसऑर्डर दिसून आला.
म्हणजे, काही सर्वसामान्य पदार्थांचा गंध त्यांच्यासाठी कायमचाच बदलला.
उदाहरणार्थ, साधं नळातून येणारं पिण्याचं पाणी. लिना यांना पिण्याच्या पाण्याचा वास अगदी भयानक असा येतो. ड्रेनेजमधून वाहणाऱ्या सांडपाण्यासारखाच वास याला आहे, असं लिना यांना वाटतं.
कोथिंबिरीचा वासही त्यांना सहन होत नाही. पूर्वी अंड्याने बनवलेले सर्वच पदार्थ लिना यांच्यासाठी आवडती डिश होत्या. पण आता त्यांना अंड्याचा वास एखाद्या जळणाऱ्या रबरप्रमाणे येतो.
कधी कधी आपण आपल्या वास घेण्याच्या क्षमतेकडे दुर्लक्ष करतो. पण ती क्षमता गेल्यानंतर मला कळलं की हे किती भयानक असू शकतं.
मला याचा खूप त्रास झालाय. माझ्या आहारावरही याचा प्रभाव पडला आहे.
कितीतरी पदार्थ मी फक्त वास सहन होत नसल्याने खाऊ शकत नाही. हे खूप निराशाजनक आहे, असं लिना म्हणतात.
दैनंदिन कामकाजात अडचणी
कोव्हिडनंतर उद्धवलेल्या या त्रासामुळे लिना यांना दैनंदिन कामकाजाच्या गोष्टी करणंही अडचणीचं झालं.
आंघोळ करणं, दात घासणं यांसारख्या गोष्टीही त्यांच्यासाठी त्रासदायक ठरत होत्या.
पण नंतर लिना यांना या समस्येवर तोडगा मिळाला.
एखाद्या गोष्टीत लिंबू किंवा मिरचीची पूड टाकल्यानंतर ते त्यांच्यासाठी सहनीय व्हायचं, असं त्यांनी सांगितलं.
त्या म्हणतात, "त्यावेळी मी स्वतःवर वेगवेगळे प्रयोग केले. वासाने उलटी येणार नाही, अशा माझ्यासाठी सुरक्षित अन्नपदार्थांची यादी मी बनवली. निरोगी राहण्यासाठी अन्नपदार्थ योग्य त्या प्रमाणात खाणं माझ्यासाठी आवश्यक होतं."
घ्राणेंद्रियांवर परिणाम
नॉर्विच मेडिकल स्कूल आणि जेम्स पॅगेट युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्स येथील प्रा. कार्ल फिलपॉट यांनी वरील संशोधनात मुख्य भूमिका बजावली होती.
बीबीसीशी बोलताना प्रा. फिलपॉट सांगतात, "व्हिटॅमिन A चे थेंब नाकावाटे दिल्यानंतर त्यावर रुग्णांचा मेंदू काय प्रतिक्रिया देतो, हे आम्हाला पाहायचं आहे. त्यामुळे वास घेण्याच्या ग्रंथींचा आकार वाढतो किंवा नाही, हानि पोहोचलेल्या ग्रंथींवर त्याचा कशा प्रकारे प्रभाव पडतो याचं आम्ही निरीक्षण करत आहोत.
आम्ही ऑलफॅक्टरी बल्बमध्ये होणाऱ्या बदलांचाही अभ्यास करत आहोत. ऑलफॅक्टरी बल्ब म्हणजे नाकाच्या आतमध्ये वरच्या भागातील असलेला एक भाग. याठिकाणी वास घेण्यासाठीच्या ग्रंथी नाकाशी जोडलेल्या असतात. तिथून पुढे त्या मेंदूशीही जोडलेल्या असतात.या भागात काय परिणाम दिसून येतो, हे आम्हाला पाहायचं आहे.
व्हिटॅमिन A चा उपयोग काय?
व्हिटॅमिन A किंवा रेटिनॉल आपल्याला खालील प्रकारे उपयुक्त आहे.
* प्रतिकारशक्ती योग्य राखण्यासाठी उपयुक्त.
* अशक्तपणा किंवा संसर्ग यांच्याविरुद्ध प्रभावी ठरतं.
* दृष्टी, विशेषतः कमी प्रकाशात नीट पाहता येण्यासाठी याचा उपयोग होतो.
* त्वचेच्या आरोग्यासाठी गुणकाही.
* व्हिटॅमिन A कशातून मिळतं?
* दूध तसंच दुग्धजन्य पदार्थांमार्फत व्हिटॅमिन A प्राप्त होतं.
* काही प्रमाणात भाज्यांमध्येही हे आढळून येतं.
* मात्र व्हिटॅमिन A अधिक प्रमाणात घेणं लाभदायी नाही. त्यामुळे अतिप्रमाणात याचं सेवन करण्याचे दुष्परिणाम दिसू शकतात.