कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झालेले रुग्ण 'या' औषधामुळे होताहेत वेगाने बरे - संशोधन
रविवार, 25 डिसेंबर 2022 (11:27 IST)
कोरोनाची लागण झाल्यानंतर मोलनुपिराविर औषध घेतल्यास रुग्ण वेगाने बरे होऊ शकतात, असं एका संशोधनात समोर आलं आहे. यासंदर्भात 25 हजारांहून जास्त लसीकरण झालेल्या कोव्हिड रुग्णांवर एक प्रयोग करण्यात आला. त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांचा बरे होण्याचा कालावधी हा कमी असल्याचं निरीक्षणात आढळून आलं. हे निष्कर्ष द लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत.
या चाचणीत कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झालेल्या आणि घरीच उपचार घेत असलेल्या रुग्णांवर हा प्रयोग करण्यात आला. दरम्यान, रुग्णांना प्रतिदिन दोन वेळा असे एकूण पाच दिवस मोलनुपिराविर औषध देण्यात आलं.
या प्रयोगासाठी निवडण्यात आलेल्या रुग्णांचं वय जास्त होतं. तसंच त्यांना मृत्यूचा धोकाही जास्त होता.
मात्र, मोलनुपिराविर औषधाने रुग्णांना वेगाने बरे होण्यास मदत होत असला तरी हे कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात घेणं आवश्यक आहे.
गंभीर, किंवा अतिगंभीर रुग्णांचा विचार केल्यास मृत्यूदर किंवा रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येणं, यांचं प्रमाण कमी होऊ शकलं नाही.
या प्रयोगादरम्यान सहभागी झालेले मोलनुपिराविर घेणारे रुग्ण आणि कोरोनावरचे इतर औषधोपचार घेणारे रुग्ण यांच्यात तुलनात्मक अभ्यासही करण्यात आला.
मोलनुपिराविरवरील मागील अभ्यासातही सौम्य ते मध्यम स्वरुपातील संसर्ग झालेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्यापासून रोखण्यासाठी ते प्रभावी असल्याचं समोर आलं होतं.
मात्र, त्यावेळी करण्यात आलेल्या चाचण्या या लसीकरण होण्यापूर्वीच झाल्या होत्या.
त्यानंतर, आता करण्यात आलेल्या ताज्या संशोधनानुसार, मोलनुपिराविर उपचारांमुळे बरे होण्याचा कालावधी चार दिवसांपर्यंत कमी झाला. तसंच संसर्गाची पातळीही कमी झाल्याचं दिसून आलं.
युकेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या (NHS) मते, हे औषध सरसकट सगळ्याच रुग्णांसाठी योग्य नाही. पण ते आरोग्य संस्थांवरचा दबाव कमी करण्यास फायदेशीर ठरू शकतं.
मोलनुपिराविर हे औषध मर्क, शार्प आणि डोहम (MSD) यांच्यामार्फत बनवण्यात आलं आहे.
हे औषध महागडं असून त्याच्या एका आठवड्याच्या कोर्सची किंमत 577 पाऊंडपर्यंत जाते. (तब्बल 57 हजार 584 रुपये)
कोरोनावर घरी उपचार करण्यासाठी वापरलं जाणारं पहिलं अँटीव्हायरल औषध म्हणून ते ओळखलं जातं.
नफिल्ड युनिव्हर्सिटीत प्राथमिक आरोग्य विज्ञान विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या ख्रिस बटलर यांच्या मते, “कोव्हिड-19 वर घरच्या घरी तत्काळ उपचार करण्याबाबत आमचं संशोधन सुरू आहे. त्याचा चांगला परिणाम दिसू शकतो. परंतु हे उपचार कुणावर करावेत, याबाबतचे सर्व निर्णय कठोर वैद्यकीय चाचण्यांच्या आधारांवरच घेण्यात आले पाहिजेत.”
मोलनुपिराविरच्या चाचणीत सहभागी होण्यासाठी लोकांना लक्षणे दिसू लागल्यापासून पाच दिवसांच्या आत ते उपचार सुरू करणं आवश्यक आहे. तसंच 50 वर्षांवरील इतर कोणतेही आजार नसलेले, किंवा 18 ते 50 वयोगटातील कुणीही यामध्ये सहभागी होऊ शकतं.
नॉटिंगहॅम विद्यापीठातील औषध आणि आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे प्र-कुलगुरू आणि प्राध्यापक जोनाथन व्हॅन-टॅम म्हणतात, “मोलनुपिराविर हे सुरुवातीला लसीकरण न झालेल्या लोकांवरच वापरण्यात येत होतं. नव्या संशोधनात लसीकरण झालेल्या लोकांवर हा प्रयोग करण्यात आला. लसीमुळे मिळणारं संरक्षण मजबूत आहे. पण अतिगंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्यापासून रोखणं किंवा त्यांचा मृत्यू टाळणं, यांच्यासंदर्भात औषधाचा स्पष्ट असा फायदा दिसून आला नाही."
“रुग्ण बरे होण्याचा कालावधी आणि संसर्ग पसरण्याची पातळी दोन्ही लक्षणीयरित्या कमी झाल्याचं दिसून आलं आहे. यानंतर आता दीर्घ कोव्हिडवर याचे काय परिणाम होतील, याचा अभ्यास सुरू आहे. त्याचे निष्कर्ष समोर येण्यासाठी आपल्याला काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.
"काही स्पष्ट परिणाम होतील की नाही हे जाणून घेण्यासाठी आम्हाला आणखी प्रतीक्षा करावी लागेल."