मुंबईतून बडोद्याला प्रवास करणाऱ्या एका 67 वर्षीय पुरुषांमध्ये एक्स ई व्हेरियंट (XE) आढळला आहे. या रुग्णाला बडोद्यामध्ये 12 मार्च रोजी सौम्य ताप आल्याने त्याची कोविड तपासणी करण्यात आली. सध्या हा रुग्ण पूर्णपणे लक्षण विरहित आहे. या रुग्णाने कोविशील्ड लशीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. त्याच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.
विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये बदल होत राहणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून यामुळे सर्वसामान्य जनतेने घाबरून न जाता आवश्यक दक्षता घेण्याची गरज आहे. एक्स ई व्हेरियंटला घाबरण्याचे कारण नाही असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.परंतु सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. दरम्यान केंद्र सरकार ने महाराष्ट्रासह पाच राज्यांना पुन्हा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याचा इशारा दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा, केरळ आणि मिझोरम या राज्यांना पत्र लिहून परिस्थितीवर क्षणोक्षणी नजर ठेवण्याची आणि आवश्यक पावले उचलण्याची सूचना केली आहे.