मेनोपॉजः 'कॅन्सरमुळे माझ्या आईच्या आधी माझी पाळी थांबली'
सोमवार, 29 जानेवारी 2024 (16:04 IST)
आइस्लिंग गॅलाघर केवळ 28 वर्षांची होती जेव्हा तिच्यावर रेक्टल कॅन्सर (गुदद्वाराचा कर्करोग) साठी रेडिओथेरपीचे उपचार सुरू करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच एक आणखी आघात झाला.
उपचारांमुळे तिच्यावर रजोनिवृत्ती लादली जाणार होती. तिने विचार केला त्याहून लवकरच हा बदल तिच्या आयुष्यात घडणार होता, ज्यासाठी ती अजून तयार देखील नव्हती.
ती सांगते, 'आईच्या रजोनिवृत्ती होण्याआधी माझी रजोनिवृत्ती येणं हा माझ्यासाठी कटू अनुभव होता, आयुष्यातील सर्वांत कठीण प्रसंगाला मी तोंड देत होते.'
अशा गोष्टींबाबत खुलेपणाने चर्चा व्हायला हवी असं आइस्लिंगचं म्हणणं आहे. आइस्लिंग ही आता 31 वर्षांची आहे आणि नॉर्दर्न आयर्लंडमधील क्रमलिन, काउंटी अॅंट्रिम या ठिकाणी ती राहते.
ती म्हणते, 'अशा विषयांबाबत नेहमीच मौन बाळगलं जातं पण आता आपण पुढे येऊन याविषयांवर चर्चा करायला हवी.'
'प्रत्येक स्त्री ही आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर या अनुभवातून जाणार असते, त्यामुळे यावर खुलेपणाने बोलणे आवश्यक आहे,' आइस्लिंग सांगते.
कॅन्सरवर उपचार करण्यासाठी रेडिओथेरपी करावी लागणार होती. त्यामुळे त्यांच्या प्रजनन क्षमेतवर देखील परिणाम होईल याची जेव्हा त्यांना डॉक्टरांनी कल्पना दिली तेव्हा एक आणखी आघात त्यांना झाला.
त्यांना स्त्रीबीजे गोठवण्यासाठी चार आठवड्यांची मुदत देण्यात आली होती, परंतु स्त्रीबीजांची अपुरी संख्या आणि संसर्गाचा धोका असल्याने त्यांनी पुढे न जाण्याचा निर्णय घेतला.
"जर माझ्या स्त्रीबीजांचे फलन झाले नसतं तर आणखी एक धक्का मला बसला असता त्यापेक्षा ती न गोठवण्याचाच मी निर्णय घेतला," असं तिने बीबीसीला सांगितलं.
नैसर्गिक पद्धतीने मूल होणार नसतानाच उपचारांमुळे त्यांच्यावर रजोनिवृत्ती लादली जाणार होती.
रजोनिवृत्ती म्हणजे काय?
स्त्रियांमधील हार्मोन्सची पातळी कमी झाल्यामुळे मासिक पाळी थांबते, त्याला रजोनिवृत्ती म्हणतात.
स्त्रीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर याचा परिणाम होऊ शकतो.
यामध्ये चिंता, नैराश्य, ब्रेन फॉग ( स्मरणशक्ती कमी होणे, एकाग्रता नाहीशी होणे) आणि हॉट फ्लशेस यांसारख्या लक्षणांचा समावेश असू शकतो.
सहसा 45 ते 55 वयोगटातील महिलांना याचा सामना करावा लागतो परंतु हे आधीही होऊ शकतं.
प्रिमॅच्युअर रजोनिवृत्ती म्हणजे जेव्हा एखाद्या महिलेची मासिक पाळी वयाच्या 45 वर्षाच्या आधीच थांबते. हे नैसर्गिकरित्या किंवा आयस्लिंगच्या प्रकरणाप्रमाणे, रेडिओथेरपीसारख्या काही उपचारांच्या दुष्परिणामामुळे घडू शकतं.
आयस्लिंगनी सांगितलं की तिची लक्षणं हॉट फ्लशेसद्वारे सुरू झाली - परंतु तिच्यावर कर्करोगावरील उपचार सुरू असल्याने हे नक्की कशाचे दुष्परिणाम आहेत हे समजणं कठीण होतं.
"हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (एचआरटी) घेण्यासाठी माझ्यावरील कर्करोगाचे उपचार पूर्ण होईपर्यंत मला थांबावं लागलं,” असं तिने सांगितलं.
रजोनिवृत्तीच्या लक्षणांवर उपचार म्हणून एचआरटीचा प्रयोग केला जातो. ते कमी झालेल्या हार्मोन्सची जागा घेतात आणि चिंता व मूड खराब होण्यासारख्या गोष्टींवर उपाय ठरतात.
तीन वर्षांनंतरही अजूनही त्या सगळ्यातून जावं लागतंय अशी परिस्थिती आहे, असं आयस्लिंग सांगते.
"रजोनिवृत्ती लवकर येणं म्हणजे मूल जन्माला घालता न येणं या वास्तवाला सामोरं जाणं आहे," असं ती सांगते.
"काही दिवस तुम्ही ते पूर्णपणे विसरता, ती गोष्ट पूर्णपणे मागे पडते, पण मग डेटिंग किंवा रिलेशनशिपचा जेव्हा मी विचार करते तेव्हा माझ्या पोटात गोळा उठतो."
"मला वाटतं की मी ज्या व्यक्तीला डेट करतेय तिला मला लगेच थेटपणे सांगावं लागेल की मला रजोनिवृत्ती येऊन गेली आहे."
रजोनिवृत्तीबाबत लोकांना अधिक जागृत करण्याचा आइस्लिंगचा मानस आहे.
परंतु, लवकर येणाऱ्या रजोनिवृत्तीबद्दल तरुणांना अधिक जागृत करणं आणि त्याची संभाव्य कारणं सांगितल्यास इतरांना त्यातून मार्गक्रमण करणं सोपं होईल, असा त्यांचा विश्वास आहे.
"सर्वसाधारण रजोनिवृत्ती, प्रजनन क्षमता, यासारख्या गोष्टी या प्रौढ होण्याच्या प्रक्रियेचाच एक भाग असतात."
"प्रत्येक स्त्री रजोनिवृत्तीतून जाणार आहे, मग ते कोणत्याही वयात का होईना. त्याबद्दल निश्चितपणे खूप काही बोलण्याची आवश्यकता आहे.
"मला वाटतं जर प्रत्येकाने याबाबत थोडीबहुत माहिती घेतली तर अधिक जागरूकता निर्माण होईल," असं आइस्लिंगला वाटतं.
जागरूकता वाढतेय
शिक्षण विभागाने सांगितलं की तरुणांना प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्ही शाळांमध्ये मासिक पाळीबद्दल शिकण्याची संधी दिली जाऊ शकते, परंतु विद्यार्थ्यांचे वय पाहता सध्या शाळांमध्ये रजोनिवृत्तीबद्दल शिकवलं जाऊ शकत नाही.
आयस्लिंगच्या भावनांशी डेझी नेटवर्क ही संस्था सहमत आहे.
इंग्लंडमधील ही अशी एकमेव संस्था आहे जी, ज्या तरूण मुलींना प्रिमॅच्युअर ओव्हेरीयन इनसफिशियन्सीचं निदान झालंय त्यांना याबाबत माहिती देते आणि मदत करते, ज्याला प्रिमॅच्युअर रजोनिवृत्ती देखील म्हटलं जातं.
या ग्रुपमधील कॉरिना बोर्डोली म्हणाल्या की, वंध्यत्व ही अशी गोष्ट आहे ज्यामुळे एखाद्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
"गेल्या काही वर्षांत प्रसारमाध्यमांमधून रजोनिवृत्तीबद्दल खूप काही बोललं जातंय परंतु त्यामध्ये तरुण मुलींबद्दल बोललं जात नाही," असं त्या म्हणाल्या.
“अतिशय तरुण वयातील मुलीसाठी तर ही खूप वेगळी गोष्ट आहे. ही गोष्ट त्यांचा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळावर मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकणारी असू शकते.
“याबाबत लोकांना जागृत करायला हवं, त्याचबरोबर यावर संशोधनही करायला हवं आणि तरुण मुलींसमोर इतर कोणते पर्याय आहेत याची माहिती त्यांना द्यायला हवी."
"तुमच्या आजूबाजूला चांगले लोक असले तरीही लहान वयात रजोनिवृत्तीतून जाणं त्रासदायक आहे. त्यातून तुमच्या मनात वेगळेपणाची भावना निर्माण होऊ शकते," असं आइस्लिंग सांगते.
अशा परिस्थितीत काय करावे असं विचारलं असता आइस्लिंग सल्ला देतात की 'आज तुमच्यासमोर जे आव्हान आले त्याला तोंड द्या आणि उद्याची चिंता सोडा'.