रात्री सतत झोपमोड होत असेल तर तुमच्या मेंदूवर काय परिणाम होतो?

सोमवार, 29 जानेवारी 2024 (09:53 IST)
जर तुम्हाला रात्री नीट झोप येत नसेल किंवा तुम्हाला ऑब्सट्रक्टिव्ह स्लीप अॅप्निया असेल तर यामुळे मेंदूच्या विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.याबदद्ल आलेला एक नवीन अहवाल म्हणतो की, भारतात 10 पैकी एका व्यक्तीला असा त्रास आहे आणि वय वाढल्यानंतर त्यांच्या विचारशक्तीवर याचा परिणाम होतो.
 
या अहवालासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत न्यूरोलॉजी विभागाचे माजी प्रमुख पद्मश्री डॉ कामेश्वर प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली संशोधन करण्यात आलं.
 
7505 प्रौढांचा यात अभ्यास केला गेला.
 
भारतातल्या अनेक आरोग्य संस्थांसह नेदरलँड्सच्या इरामस मेडिकल सेंटरच्या संसर्गजन्य रोग विभाग आणि अमेरिकेतल्या हार्वर्ड टीएच चेन स्कूलच्या पब्लिक हेल्थ आणि सोशल, बिहेव्हियरल सायन्सेसच्या डॉक्टरांनी एकत्र येत हे संशोधन केलं.
 
बीबीसीशी बोलताना डॉ कामेश्वर प्रसाद म्हणाले की, “भारतात हे अशा तऱ्हेचं पहिलं संशोधन आहे. यात जिनोमिक्स, न्यूरोइमेजिंग आणि झोपेशी संबधित अनेक पैलूंचा अभ्यास केला गेला. यात महिला आणि पुरुषांची संख्या जवळपास सारखी होती.
 
या संशोधनातून काय समोर आलं?
डॉ कामेश्वर प्रसाद म्हणतात की भारतातही इतर देशांसारखंच लोकांचं जीवनमान वाढल्याने जेष्ठांची संख्या वाढतेय. पुढे ही संख्या अजून वाढत जाणार आहे.
 
ते म्हणतात, “वय वाढल्याने जे आजार होतात त्यात प्रामुख्याने डिमेन्शिया (स्मृतिभंश), हृदय रोग किंवा स्ट्रोक असे आजार आहेत. आजवर जे संशोधन झालं ते या आजारांवर केंद्रित होतं.”
 
 
झोपेशी संबंधित केलेल्या या संशोधनात अनेक प्रश्न विचारले गेले.
 
डॉ कामेश्वर प्रसाद म्हणतात, “ज्या लोकांना नीट झोप येत नाही, सतत झोपमोड होते त्यांच्या मेंदूची कार्यक्षमता ज्यांची झोप पूर्ण होते किंवा ज्यांना शांत झोप लागते त्या लोकांच्या तुलनेत कमी होती.”
 
काय आहे ऑब्सट्रक्टिव्ह स्लीप अॅप्निया?
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये दिलेल्या माहितीनुसार ओएसए एक प्रकारचा आजार आहे ज्यात झोपलेल्या माणसाचा श्वास सारखा सारखा थांबतो.
 
डॉक्टर जेसी सुरी फोर्टस हॉस्पिटलमध्ये पल्मनरी, क्रिटिकल केअर अँड स्लीप मेडिसिन विभागाचे प्रमुख आहेत. याबद्दल आणखी माहिती देताना ते म्हणतात की एखादी व्यक्ती दिवसा आरामात श्वास घेते आणि सोडते. यात काही अडचण येत नाही. पण रात्री झोपताना आपले स्नायू शिथिल होतात.
 
ते पुढे सांगतात, “झोपेत आपली जीभ घशाच्या मागच्या भागात जाते यामुळे श्वासनलिका बंद होण्याची शक्यता निर्माण होते आणि श्वास थांबू शकतो. जर एखाद्या व्यक्तीचा श्वास थांबला तर जीभ कार्यरत होते, ती पुन्हात तोंडात येते आणि श्वासाचा रस्ता मोकळा होतो.
 
मग जीभ परत मागे जाते, पुन्हा श्वास थांबतो, पुन्हा त्या व्यक्तीला जाग येते आणि हे चक्र चालू राहातं. यालाच ऑब्सट्रक्टिव्ह स्लीप अॅप्निया असं म्हणतात.”
 
डॉक्टर म्हणतात की झोपेचे अनेक स्तर असतात. ज्यात सावध झोप, गाढ झोप, स्वप्नांची झोप आणि बिना-स्वप्नांची झोप हे प्रकार मोडतात. हे प्रकार शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना मदत करतात.
 
घोरण्याची समस्या
डॉ जेसी सुरू म्हणतात की, जेव्हा झोपेत श्वासाचा मार्ग आक्रसतो तेव्हा माणूस घोरायला लागतो. त्यावेळी त्या माणसाचा श्वास काही अंशी सुरू असतो. जर तो श्वास पूर्णच अडला तर मग त्याला स्लीप अॅप्निया असं म्हणतात.
 
जेव्हा तुमचा श्वास अडतो तेव्हा शरीरातलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि कार्बनडाय ऑक्साईडचं प्रमाण वाढतं. श्वास तेव्हाच सुरळीत होते जेव्हा झोपमोड होते.
 
अशात ज्या लोकांना स्लीप अॅप्नियाचा त्रास आहे त्यांची एका तासात 10,15,25 कधी कधी, तर 50 वेळा झोपमोड होते. कारण त्यांना श्वासाचा रस्ता मोकळा करण्यासाठी उठावं लागतं.
 
त्यामुळे त्यांना गाढ झोप लागत नाही.
 
घोरण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी डॉक्टर वजन नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला देतात कारण तुमच्या हनुवटीजवळच्या पेशींवर चरबी साठते. यामुळे तुमची श्वासनलिका अधिक अरुंद होते. जर तुम्ही वजन नियंत्रणात ठेवलं तर घोरण्याचा त्रास कमी होऊ शकतो.
 
दुसरं म्हणजे जर तुम्हाला सर्दी झालीये आणि तुमचं नाक बंद आहे तर मग तुमची घोरण्याची शक्यता जास्त आहे. अशावेळी झोपण्याआधी तुमचं नाक व्यवस्थित स्वच्छ करायला हवं.
 
जर दारू पिऊन झोपलं तर स्नायू अधिक शिथिल होतात त्यामुळे श्वासनलिक अधिक अरुंद होते. त्यामुळे असा सल्ला दिला जातो की झोपण्याआधी दारू पिऊ नये.
जर तुम्ही पाठीवर सरळ झोपलात तर तुमची जीभ, हनुवटी, हनुवटीतच्या खाली असलेली चरबी सगळ्यामुळे श्वासनलिकेत बाधा निर्माण होऊ शकते. अशात एका कुशीवर झोपल्याने घोरणं कमी होऊ शकतं.
 
झोप पूर्ण न झाल्याचा शरीरावर परिणाम
डॉक्टर म्हणतात की जर कोणत्याही व्यक्तीची झोप पूर्ण होत नसेल तर त्याचा संपूर्ण शरीरावर परिणाम होतो आणि कामावरही परिणाम होतो. जसं की -
 
एकाग्रता कमी होते
स्मरणशक्ती कमी होते
विचारशक्तीवर परिणाम
निर्णय न घेता येणं
चिडचिड होणं
दिवसा झोप येणं
नैराश्य, अस्वस्थ वाटणं
उत्साह कमी होणं
रक्तदाबावर परिणाम
हृदयरोग होण्याची शक्यता
डायबेटिज असेल तर त्यावर उपचार करणं अवघड होतं
थकवा येणं
किती झोप आवश्यक?
डॉक्टर म्हणतात की नवजात बालकांना सर्वाधिक झोपेचे गरज असते. जसंजसं वय वाढतं तशी झोप कमी होत जाते.
 
डॉ सुरी म्हणतात की, नवजात बालकांना 14-17 तास झोप हवी, किशोरवयीन मुलांना (14 ते 17) आठ ते दहा तासांची झोप हवी.
 
18-26 वर्षांच्या तरुणांना आणि 26-64 वयाच्या लोकांना साधारण सात ते नऊ तासांची झोप हवी. 65 पेक्षा जास्त वय असणाऱ्या वृद्धांना सात ते आठ तासांची झोप गरजेची आहे.
 
तज्ज्ञ म्हणतात की, आपलं आयुष्य दिवस रात्रीच्या हिशोबाने चालतं. दिवसा आपण जागे असतो, काम करतो आणि रात्री झोपतो. त्यानुसार आपल्या जेवणाच्या वेळा ठरलेल्या असतात. आपल्या मेंदूची, शरीराची सगळी कामं सुरळीत होण्यासाठी झोप अत्यावश्यक असते.
 
ज्यांना वेळेवर झोप येत नाही त्यांनी स्लीप हायजिन पाळावी, असं डॉक्टर म्हणतात.
 
म्हणजे त्यांनी दिवसा झोपू नये आणि रात्री उशिरा चहा किंवा कॉफी पिऊ नये.
 
डॉक्टर म्हणतात की श्वसनलिका जन्मापासूनच अरुंद असते. जर वजन वाढलं तर ती आणखी अरुंद होत जाते. त्यामुळे बैठी जीवनशैली टाळून सक्रिय राहावं.
 
डॉ कामेश्वर प्रसाद म्हणतात की, लोकांच्या हे लक्षात येत नाही की त्यांना झोपेचे त्रास असतील तर त्यांनी चाचण्या कराव्यात, उपचार करावेत. नाहीतर पुढे जाऊन डिमेन्शिया (स्मृतीभंश) सारखे आजार होऊ शकतात.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती