साध्या पाण्यापेक्षा मिनरल वॉटर चांगलं असतं? उकळल्यानंतर पाणी शुद्ध होतं?

शुक्रवार, 24 मार्च 2023 (12:37 IST)
पाण्याशिवाय आपण आपल्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. तुम्ही कितीही कोल्ड ड्रिंक्स, ज्यूस, मॉकटेल्स प्या, पण पाण्याने जशी तहान भागते तशी इतर कशानेही भागत नाही. हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू एकत्र आले की, पाण्याचा रेणू तयार होतो. पाण्याचे असे लाखो रेणू एकत्र येऊन पाण्याचा थेंब तयार होतो. पृथ्वीचा 71 टक्के भाग पाण्याने व्यापला आहे. त्यातील 96.5 टक्के पाणी समुद्राचं आहे. पृथ्वीवरील पाण्यापैकी फक्त एक टक्का पाणी पिण्यायोग्य आहे, जे मानवी गरजांसाठी वापरता येतं.
 
आपण राहतो त्या पृथ्वीवर पाण्याशिवाय जगणं अशक्य आहे. कारण मानवी शरीरात चयापचयाची क्रिया व्यवस्थित होण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. मानवी शरीरातही सत्तर टक्के पाणी आहे. या सर्व गोष्टी आपण विज्ञानाच्या पुस्तकात शिकलोय.
 
नैसर्गिक स्रोतातून मिळणारं पाणी सोडलं तर पाण्याचे अजून कोणकोणते स्त्रोत आहेत? हे पाणी कसं तयार होतं? हे पाणी आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे का?
 
पिण्याच्या पाण्यात कोणते असे विशेष गुणधर्म असतात? त्या पाण्यात काय असावं? मिनरल वॉटरमध्ये विशेष काय आहे? पिण्यासाठी योग्य आणि सुरक्षित पाणी कोणतं आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं या लेखातून पाहू.
 
पाणी किती प्रकारचं असतं?
 
ज्या पाण्याची पीएच व्हॅल्यू 6.5-7.5 दरम्यान असते त्याला ‘नॉर्मल वॉटर’ म्हणजेच साधं पाणी म्हणतात. या पाण्याला ना रंग असतो, ना चव असते. हे पाणी सहसा पिण्यासाठीच वापरलं जातं.
 
आरओ पाणी म्हणजे रिव्हर्स ऑस्मोसिस पद्धतीचा वापर करून अशुद्धता काढून टाकलेलं पाणी. हे पाणी बऱ्याच काळापासून वापरलं जातंय.
 
या आरओ पाण्यात काही घटक आणि खनिजे मिसळली किंवा कमी केली तर त्या पाण्याला प्युरिफाईड वॉटर, पॅकेज वॉटर, डिस्टिल्ड वॉटर, मिनरल वॉटर असं म्हणतात.
 
अलीकडच्या काळात ‘ब्लॅक वॉटर’चं प्रस्थ वाढलेलं आहे. या पाण्याची पीएच व्हॅल्यू 8 ते 9 दरम्यान असते. करीमनगर येथील सातवाहन विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक वोद्दिराजू नम्रता बीबीसीशी बोलताना काही गोष्टी सांगतात.
 
नद्या, तलाव, विहिरी आणि बोअरवेलमधून साधं पाणी मिळतं. ते क्लोरिनेटेड किंवा ओझोनाइज्ड करून लोकांना नळ आणि टँकरद्वारे पुरवलं जातं. या पाण्याला पिण्याचं दर्जेदार पाणी म्हणता येईल.
 
हे पाणी घरांमध्ये रिव्हर्स ऑस्मोसिस (आरओ) प्रक्रिया करून पुन्हा फिल्टर केलं जातं. या प्रोसेसमध्ये पाण्यातील अशुद्धता निघून जाते आणि पाण्याची गुणवत्ता वाढते. याला आपण आरओ वॉटर किंवा प्युरिफाईड वॉटर (शुद्ध पाणी) म्हणतो.
 
हे पाणी प्लास्टिक किंवा काचेच्या बाटल्यांमध्ये भरून विकलं जातं तेव्हा त्याला ‘पॅकेज्ड वॉटर’ म्हणतात. पाणी उकळवून त्यातील क्षार, खनिजे किंवा इतर पदार्थ काढून टाकले जातात आणि वाफेच्या स्वरूपातील पाणी साठवलं जातं त्याला ‘डिस्टिल्ड वॉटर’ म्हणतात.
 
या पाण्यात कोणतेही घटक नसतात. त्यामुळे हे पाणी प्यायल्यावर तुमची तहान तर भागते पण त्यातून तुमच्या शरीराला कोणतीही खनिजे मिळत नाहीत. असं पाणी प्रयोगशाळा आणि उद्योगांमध्ये वापरलं जात असल्याचं वोद्दिराजू नम्रता सांगतात.
 
मिनरल वॉटर म्हणजे काय?
ज्या पाण्यात मिनरल्स म्हणजेच खनिजे नसतात त्याचा मानवी शरीराला काहीच उपयोग होत नाही. मिनरल वॉटरच्या नावाखाली आपण बाटलीबंद पाणी पितो. मिनरल वॉटर म्हणजे पृथ्वीच्या गर्भातील किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील उपलब्ध पाणी.
 
या पाण्यात सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे असतात. मानवी शरीराला अत्यावश्यक असणाऱ्या प्रमाणापेक्षा त्यांचं प्रमाण कमी जास्त असू शकतं. त्यामुळे हे पाणी प्यायल्याने आरोग्याच्या समस्या देखील उद्भवू शकतात.
 
त्यामुळे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सनुसार मिनरल वॉटर प्यायल्यास शरीरातील पचन क्रिया संतुलित राहते.
 
काही कंपन्या प्लास्टिक किंवा काचेच्या बाटल्यांमध्ये मिनरल वॉटर विकतात. आपण जेव्हा प्रवासात असतो तेव्हा आपण हे बाटलीबंद पाणी विकत घेतो. पण या बाटलीवर भारतीय मानक ब्युरो (BIS) ने दिलेल्या खनिजांची यादी दिसते का? किंवा ती यादी बीआयएसच्या यादीशी मिळतीजुळती आहे का? हे आपण पाहतो का? या पाण्याचा टीडीएस 500 mg/L पेक्षा जास्त असू नये, असं प्रोफेसर वोद्दिराजू नम्रता सांगतात.
 
पण हा टीडीएस नेमका प्रकार काय आहे?
पाण्याची गुणवत्ता मोजण्यासाठी वापरला जाणारा दुसरा शब्द म्हणजे टीडीएस. दर्जेदार पाण्यात सेंद्रिय क्षार, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, बायकार्बोनेट्स, क्लोराईड्स, सल्फाइट्स आणि थोड्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असतात.
 
याशिवाय काही प्रमाणात कॅडमियम, लीड, निकेल यांसारखे धातूही विरघळलेले असतात. पाण्यात विरघळलेल्या या पदार्थांच्या एकूण प्रमाणाला टोटल डिजॉल्व्ह सॉलिड (टीडीएस) असं म्हणतात. याचं प्रमाण एक लिटर पाण्यात 500mg पेक्षा जास्त नसावं. तसेच ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने दिलेल्या मानकांप्रमाणे याचं प्रमाण 100mg पेक्षा कमीही असू नये.
 
जर त्या पाण्याचा टीडीएस 100 पेक्षा कमी असेल तर याचा अर्थ त्यात शरीराला आवश्यक खनिजे नाहीत. पाण्याचा टीडीएस 500 पेक्षा जास्त असेल तर त्या पाण्याला ‘हार्ड वॉटर’ म्हणतात. हे पाणी पिण्यायोग्य नसतं.
 
त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा टीडीएस 100 ते 500 च्या दरम्यान असावा. आपण जे पाणी पितो त्याचा टीडीएस किती आहे हे जाणून घेण्यासाठी बाजारात टीडीएस मीटर मिळतात.
 
पाण्याची गुणवत्ता कशी मोजली जाते?
 
पाण्याची गुणवत्ता मोजण्यासाठी आणि ते पिण्यासाठी योग्य आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स काही टेस्ट घेते. त्यांना इंडियन स्टँडर्ड्स ड्रिंकिंग वॉटर स्पेसिफिकेशन्स-10500 म्हणतात.
 
पाण्याच्या गुणवत्तेची मोजण्यासाठी शासन मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत मागील 25 वर्षांपासून काम करणारे ज्येष्ठ जल विश्लेषक बुद्ध रवि प्रसाद बीबीसीशी बोलताना सांगतात की, पाण्यात असलेले घटक गरजेचे आहेत की नाहीत हे कळण्यासाठी काही टेस्ट केल्या जातात.
 
पाण्याची गुणवत्ता मोजण्यासाठी जवळपास 60 टेस्ट उपलब्ध आहेत. यामध्ये रासायनिक, सूक्ष्मजीव अशा टेस्टचा समावेश होतो. याशिवाय पाण्याचा पीएच, टीडीएस, क्षारता, हार्डनेस, मेटल आदी गोष्टी मोजण्यासाठी काही रासायनिक टेस्ट केल्या जातात. पाण्यात असलेले जिवाणू, बुरशी, कीटकनाशकांचे घटक यासाठी सूक्ष्मजीव टेस्ट केल्या जातात.
 
आपण जर यातली मुख्य टेस्ट पाहिली तर त्यातील पाण्याचा पीएच 6.5 ते 7.5 असतो. तसेच एक लिटर पाण्यात बायकार्बोनेट्स 200mg, कॅल्शियम 75 mg, मॅग्नेशियम 30mg, नायट्रेट 45mg, आर्सेनिक 0.01mg, कॉपर 0.05mg, क्लोराईड्स 250mg, सल्फेट 200mg, फ्लुराईड 1mg, आयर्न 0.3mg, मर्क्युरी 0.01mg, झिंक 5mg प्रमाण असतं.
 
पण या गुणवत्तेत फरक असेल तर काय होईल?
पाणी पिण्यायोग्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी पाण्याच्या विविध टेस्ट केल्या जातात.
 
पर्यावरण विज्ञानातील निवृत्त प्राध्यापक ई यू बी रेड्डी बीबीसीशी बोलताना याविषयी माहिती देतात.
 
बीआयएस नुसार, पाण्यात फ्लोराइड 1 पेक्षा जास्त असेल तर डेंटल फ्लोरोसिस आणि सोडियम जास्त असल्यास ब्लड प्रेशरचा त्रास सुरू होतो. शेतातील खतांमध्ये असणारं नायट्रेट पिण्याच्या पाण्यातून शरीरात गेल्यास रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो, श्वास घेण्यास त्रास होतो, चक्कर येते, डोळ्यांची बुबळे निळी पडतात. याला 'ब्लू बेबी सिंड्रोम' म्हणतात.
 
पाण्यात आर्सेनिकचं प्रमाण जास्त असेल तर त्वचेवर पांढरे चट्टे पडतात. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांचा त्रास होऊ शकतो. टीडीएस कमी असलेलं पाणी प्यायल्यास मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो.
 
पाण्याच्या चवीत फरक पडला असेल किंवा पाण्याला रंग आला असेल तर पाण्यात काहीतरी गडबड असण्याची शक्यता असते आणि हे पाणी पिण्यास योग्य नसतं. त्यामुळे सरकार मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये पाण्याच्या टेस्ट करून घ्याव्यात.
 
पाणी उकळल्यास शुद्ध होतं का?
प्युरिफाईड वॉटर, डिस्टिल्ड वॉटर, मिनरल वॉटर असे पाण्याचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. पाणी पिताना कोणती काळजी घ्यायला हवी याविषयी सेवानिवृत्त प्राध्यापक युईबी रेड्डी यांनी माहिती दिली आहे.
 
जमिनीवरून काही उंचीवर असताना पावसाचं पाणी डिस्टिल्ड वॉटरप्रमाणेच असतं. पण हे पाणी जमिनीवर पडताच ते प्रदूषित होतं. हवेतील कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड इत्यादी प्रदुषकांमुळे देखील पाणी प्रदूषित होतं. अशा प्रदूषणाला एसपीएम (सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर) म्हणतात. या प्रदूषित पाण्यामुळे 250 प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते.
 
रिव्हर्स ऑस्मोसिसचा वापर करून पाणी शुद्ध करताना पाण्यातील पोषक तत्व सुद्धा काढून टाकले जातात. त्यामुळे वारंवार फिल्टर केलेलं पाणी देखील चांगलं नसतं.
 
रेफ्रिजरेटेड पाण्यातही सूक्ष्मजीवांचा शिरकाव होऊ शकतो. जर तुम्हाला पाण्याविषयी माहिती नसेल तर तुम्ही उकळून गार केलेलं पाणी पिण्यायोग्य आहे.
 
रेड्डी सांगतात, "शिवाय तुम्ही कापडातून गाळलेलं पाणी पिण्यासाठी वापरू शकता. अल्ट्रा व्हायलेट लाइट फिल्टर वापरून पाणी सहजपणे शुद्ध करता येतं."
 
ब्लॅक वॉटर कोणी प्यावं?
अलीकडच्या काळात बाजारात ब्लॅक वॉटरचा खप मोठ्या प्रमाणावर वाढलाय. बरेच सेलिब्रेटी आणि क्रिकेटपटू या पाण्याचा वापर करत असल्याचं दिसतं. चांगल्या पाण्याचा पीएच 7 च्या दरम्यान असतो. पण आहारतज्ञ असलेल्या सुनीता सांगतात की, ब्लॅक वॉटरचा पीएच 8 ते 9 च्या दरम्यान असतो.
 
आपण जे काही खातो त्यामुळे शरीरात आम्ल तयार होतं. ते संतुलित करण्यासाठी जास्त क्षार असलेलं ब्लॅक वॉटर प्यावं. यातून व्यक्ती ॲक्टिव्ह होतो.
 
सुनीता सांगतात, "पण जे लोक बैठी कामं करतात त्यांनी हे पाणी पिऊ नये कारण यातून आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. आपण ॲक्टिव्ह नसताना जर ब्लॅक वॉटर पित असू तर शरीरात अल्कधर्मी लक्षणं वाढू शकतात. या पाण्यात खनिज क्षार मिसळलेले असतात. त्यामुळे जास्त पाणी पिणं आरोग्यास हितकारक नाही."
 
जल जीवन मिशन
देशात चांगल्या जलस्त्रोतांची उपलब्धता कमी आहे. आणि जे पाणी उपलब्ध आहे ते पिण्यायोग्य नाही. म्हणूनच घरोघरी पिण्याचं शुद्ध पाणी पोहोचावं या उद्देशाने केंद्र सरकारने काही योजना/मिशन आणल्या आहेत.
 
पंतप्रधान मोदींनी 15 ऑगस्ट 2019 रोजी ‘जल जीवन मिशन’ ही योजना आणली. यावेळी पंतप्रधान म्हणाले होते की, 2024 पर्यंत या मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात पाण्याची सुविधा दिली जाईल. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात पिण्याचं शुद्ध पाणी पोहोचावं यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांनी 50:50 भागीदारी केली आहे.
 
केंद्र सरकारने 1 ऑक्टोबर 2021 रोजी 'अमृत (शहरी) 2.0' नावाने आणखीन एक योजना सुरू केली आहे. देशातील शहरी भागांना पिण्याचं स्वच्छ पाणी पुरविण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे. 2021-22 ते 2025-26 या कालावधीत ही योजना पूर्णत्वास नेण्याचं लक्ष्य आहे. केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाने म्हटल्याप्रमाणे, देशात स्वच्छ पाण्याची उपलब्धता कमी असताना देखील देशातील सर्व नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा देऊन, जलस्रोतांचे संवर्धन आणि पुनर्वापर केले जाईल.
 
केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत तेलंगणा राज्यात ‘मिशन भगीरथ’ आणि आंध्रप्रदेशमध्ये ‘वॉटर ग्रीड’ या नावाने योजना राबविल्या जात आहेत.
 
दुसरीकडे, आशियाई विकास बँकेने अंदाज व्यक्त केलाय की, 2030 पर्यंत भारतातील पाणी टंचाई 50 टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचेल.
 
Published By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती