डर्मेटोमायोसायटिस: 'दंगल गर्ल' सुहानी भटनागरला झालेला हा आजार काय आहे?
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2024 (21:55 IST)
आमिर खानच्या दंगल या चित्रपटात बबिता फोगाटची बालपणीची भूमिका साकारणारी सुहानी भटनागर हिचं वयाच्या 19 व्या वर्षी निधन झालं.
पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार तिचे वडील सुमित भटनागर यांनी सांगितलं की, सुहानी डर्मेटोमायोसायटिस नावाच्या आजाराने ग्रस्त होती.
सुहानीला 7 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं, तिथे तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र आजारपणात निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे 16 फेब्रुवारी रोजी तिचा मृत्यू झाला.
तिच्या मृत्युमुळे डर्मेटोमायोसायटिस हा आजार नेमका काय आहे याबद्दलची चर्चा सुरू झाली आहे.
डर्मेटोमायोसायटिस हा एक अत्यंत दुर्मिळ आजार आहे, ज्यामध्ये स्नायू सुजतात आणि त्वचेवर पुरळ येतात.
या आजाराची योग्य वेळी दखल घेतली आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार केले तर त्यामुळे होणाऱ्या त्रासातून आराम मिळू शकतो, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
मात्र, काही प्रकरणांमध्ये शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांवर त्याचा इतक्या वेगाने परिणाम होतो की रुग्णाला आपला जीवदेखील गमवावा लागू शकतो.
डर्मेटोमायोसायटिस म्हणजे काय?
दिल्लीतील त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. अंजू झा सांगतात की, 'हा एक ऑटो इम्यून डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या अवयवांविरुद्ध काम करू लागते.'
'शरीरात काही अँटीबॉडीज तयार होऊ लागतात जे स्नायूंवर हल्ला करतात आणि त्यांना कमकुवत करतात. त्यामुळे स्नायू कमकुवत होतात.'
'हळूहळू याचा वेगवेगळ्या अवयवांवर परिणाम व्हायला सुरूवात होते आणि त्यात अवयवांना सूज येते.'
या आजाराच्या लक्षणांबद्दल डॉ. अंजू सांगतात, "प्रत्येक रुग्णाला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असू शकतात. काही वेळा त्वचेवर पुरळ येतात. पापण्यांना सूज येते."
"कधी कधी फक्त अशक्तपणा जाणवतो. जसं की केस विंचरण्यासाठी हात वर करताना देखील त्रास होऊ शकतो. पार्श्वभागाच्या सांध्याभोवती समस्या असल्यास रूग्णाला उठण्या-बसण्याचा त्रास होऊ शकतो."
सुरुवातीला फक्त चेहऱ्यावर किंवा पापण्यांवर लाल किंवा जांभळ्या रंगाचे पुरळ येतात किंवा सांधेदुखीचा त्रास होतो. परंतु, नंतर अनेक रुग्णांना चालण्या-फिरण्याचा देखील त्रास होऊ लागतो आणि जेव्हा याचा परिणाम फुफ्फुसाच्या स्नायूंवर होतो तेव्हा त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागतो.
अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या मते, डर्मेटोमायोसायटिस होण्याची नेमकी कारणं माहित नाहीत, परंतु ही समस्या अनुवांशिक जनुकं, वयोवृद्ध लोकांमध्ये कर्करोग, इतर काही संसर्ग, औषध किंवा वातावरणातील एखाद्या गोष्टीची अॅलर्जी यामुळे उद्भवू शकते.
यामध्ये त्वचा आणि स्नायूंपर्यंत रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या (धमन्या) सुजतात. यामुळे त्वचेवर जांभळ्या किंवा लाल रंगाचे पुरळ येऊ शकतात, ज्यामुळे वेदना किंवा खाज सुटू शकते.
काही वेळा कोपर, गुडघे किंवा बोटांवरही पुरळ किंवा जांभळे डाग दिसू शकतात. नखांभोवती सूज येणे, सांध्यांमध्ये घट्टपणा, कोरडी त्वचा आणि केस पातळ होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
आजारपण वाढल्यास गिळण्यास त्रास होऊ शकतो, आवाज बदलू शकतो आणि थकवा, ताप किंवा वजन कमी होणं यांसारख्या समस्यांनाही सामोरं जावं लागतं.
आजाराची लक्षणं काय आहेत?
प्रारंभिक लक्षणं दिसू लागल्यावर रुग्णाची मेडिकल हिस्ट्री आणि शारीरिक तपासणी करून या लक्षणांची कारणं शोधता येऊ शकतात.
डॉक्टर अंजू झा सांगतात की, खात्री करणासाठी रक्त तपासणी, इलेक्ट्रोमायलोग्राम (ईएमजी) आणि बायोप्सीची मदत घेतली जाते.
सर्वांत अचूक पर्याय म्हणजे प्रभावित स्नायूंची बायोप्सी (काही भाग काढून प्रयोगशाळेत तपासणे) करणं, असं त्या सांगतात.
डॉक्टर अंजू झा सांगतात की, डर्मेटोमायोसायटिस पाच ते 14 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये किंवा 40 वर्षांवरील लोकांना होण्याचं प्रमाण जास्त आहे.
त्या म्हणतात, "काही वेळा मुलांमध्ये तो झपाट्याने वाढतो आणि जोपर्यंत त्याची माहिती होते त्याच्या आधीच खूप नुकसान झालेलं असतं."
अभिनेत्री सुहानीसोबतही असंच घडलं असावं, असं त्यांना वाटतं. अनेकवेळा असं देखील होतं की शरीराला हानी पोहोचवणारी रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रित ठेवण्यासाठी इम्युनोसप्रेसेंट्स (प्रतिकारशक्ती कमकुवत करणारी औषधे) दिली जातात, ज्यामुळे रुग्णाला इतर आजार होण्याचा धोकाही वाढतो.
योग्य उपचारांची आवश्यकता
जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या मते, लक्षणांच्या आधारावरच डर्मेटोमायोसायटिसचा उपचार केला जातो.
उदाहरणार्थ- स्नायूंमध्ये ताठरता आली असल्यास फिजिओथेरपी दिली जाते. त्वचेवर पुरळ उठू नये म्हणून औषधे दिली जातात. रोगप्रतिकारशक्ती कमी करणारी औषधंसुद्धा दिली जातात.
डॉक्टर अंजू झा म्हणतात, "जर तुम्हाला फक्त डर्मेटोमायोसायटिसच नाही तर कोणत्याही प्रकारचा ऑटो-इम्यून डिसऑर्डर असेल तर तुम्हाला सतत औषधं घ्यावी लागतील. फक्त एका औषधाने तुमच्या शरीराला लगेच आराम पडू शकत नाही."
त्या म्हणतात, “सर्वप्रथम तुमच्या लक्षणांची नीट माहिती घ्या. एकदा निदान झालं की योग्य उपचार घ्या. काही वेळा स्टेरॉइड्सही दिली जातात. स्टेरॉइड्स घेऊ नयेत, असे अनेक गैरसमज लोकांमध्ये आहेत. परंतु त्वचारोगतज्ज्ञ किंवा संधिवात तज्ज्ञांकडे जाऊन त्यांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणं गरजेचं आहे.