मासिक पाळीच्या दिवसात घेतल्या जाणाऱ्या गोळ्यांवर केंद्राने घातली बंदी
शुक्रवार, 8 डिसेंबर 2023 (20:49 IST)
बहुतेक मुलींचं मासिक पाळीत पोट दुखतं. अशावेळी किंवा लहान मुलांना ताप आल्यावर तर कधी सांधेदुखीची समस्या असल्यावर एक औषधाची गोळी घेतली जाते. या गोळीचं नाव आहे मेफथल-स्पास.
वेदनांपासून आराम मिळावा यासाठी ही गोळी घेतली जाते. मात्र, केंद्रीय आरोग्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या इंडियन फार्माकोपिया कमिशनने (आयपीसी) या औषधातील मेफेनॅमिक अॅसिडमुळे दुष्परिणाम होत असल्याचा अलर्ट जारी केला आहे.
इंडियन फार्माकोपिया कमिशनने आरोग्य अधिकारी आणि रूग्णांना वेदनाशामक अशा मेफथलमधील मेफेनामिक ऍसिडच्या दुष्परिणामांकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.
ही गोळी सामान्यतः मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी आणि संधिवातामधील वेदना शमविण्यासाठी वापरली जाते.
फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्रॅम ऑफ इंडिया (पीव्हीपीआय) ने औषधांच्या प्रतिकूल प्रतिक्रियांवर प्राथमिक तपासणी केली. तर फार्माकोपिया कमिशनने आपल्या अहवालात या औषधामुळे अंगावर पुरळ, इओसिनोफिलिया आणि सिस्टेमिक सिंड्रोम झाल्याचे नमूद केले आहे.
या गोळीमध्ये असलेल्या मेफेनामिक ऍसिडमुळे ड्रेस सिंड्रोम सारख्या गंभीर ऍलर्जीक रिॲक्शन होतात ज्याचा शरीराच्या अंतर्गत अवयवांवर गंभीर परिणाम होतो.
फार्माकोपिया कमिशनने गेल्या महिन्याच्या 30 तारखेला हे अलर्ट जारी केले आहेत.
प्रतिक्रिया कुठे नोंदवल्या पाहिजेत?
ही गोळी घेतल्यानंतर कोणतीही रिॲक्शन दिसल्यास लोकांनी www.ipc.gov.in या वेबसाइटवर प्रतिक्रिया नोंदवली पाहिजे. तसेच अहवाल अर्ज भरून पीव्हीपीआय राष्ट्रीय समन्वय केंद्राला त्वरित कळवावे.
याशिवाय लोक अँड्रॉईड मोबाइल अॅप एडीआर पीव्हीपीआय किंवा पीव्हीपीआय हेल्पलाइन क्रमांक 1800-180-3024 वर देखील माहिती देऊ शकतात.
औषध घेतल्यानंतर रुग्णांमध्ये कोणतेही दुष्परिणाम दिसले तर एडीआर फॉर्मद्वारे औषध विभागाला परिणामांची माहिती दिली जाऊ शकते. त्याचप्रमाणे इथे दुर्मिळ दुष्परिणाम, सामान्य परिणाम, औषधं, लसी आणि आयुर्वेदिक उत्पादनांचे गंभीर दुष्परिणाम नोंदवू शकता.
केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या सहाय्यक औषध निरीक्षक प्रियंका सांगतात, "आरोग्य सेवा कर्मचारी आणि रुग्ण एडीआर ऍप्लिकेशनद्वारे इंडियन फार्माकोपिया कमिशनला औषधांच्या दुष्परिणामांची माहिती देऊ शकतात. या अर्जाद्वारे माहिती देणाऱ्या व्यक्तींची नावे व माहिती गोपनीय ठेवण्यात येईल. एनसीसी पीव्हीपीआय या अहवालांचे पुनरावलोकन करत असते."
ड्रेस सिंड्रोम म्हणजे नक्की काय?
ड्रेस सिंड्रोम ही एक गंभीर एलर्जी आहे. यामुळे सुमारे 10 टक्के लोक प्रभावित होतात. तर काहींना जीवही गमवावा लागतो.
औषध घेतल्यानंतर दोन ते आठ आठवडे ही रिॲक्शन राहते.
जास्त ताप, त्वचेवर पुरळ, लिम्फॅडेनोपॅथी, हेमॅटोलॉजिकल विकृती आणि अंतर्गत अवयवांचे नुकसान हे या ड्रेस सिंड्रोमचे काही लक्षणं आहेत. ड्रेस सिंड्रोम कोणत्याही औषधामुळे होऊ शकतो.
फार्माकोपिया कमिशनने ड्रेस सिंड्रोमसारखे दुष्परिणाम कमी करण्यासाठी या औषधावर लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.
वेदनाशामक औषधांचा दीर्घकाळ वापर धोक्याचा
डॉक्टर म्हणतात की, हे दुष्परिणाम अत्यंत दुर्मिळ आहेत आणि या गोळीचे मर्यादित डोस लिहून दिले जातात.
डॉक्टरांचं म्हणणं आहे की, त्यांनी असे गंभीर परिणाम पाहिलेले नाहीत. या औषधाचे परिणाम व्यक्तीनुसार बदलतात. पण, या औषधाचा अतिरेक झाल्यास समस्या निर्माण होऊ शकतात.
किम रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ, लॅपरोस्कोपिक सर्जन आणि वंध्यत्व विशेषज्ञ म्हणून काम करणाऱ्या काव्या प्रिया म्हणतात, "मेफथलच्या वापरामुळे माझ्या कोणत्याही रुग्णाला ड्रेस सिंड्रोम झालेला नाही. पण कोणतेही वेदनाशामक औषध दीर्घकाळ वापरल्यास त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. महिन्यातून एक किंवा दोन गोळ्या घेतल्यास अशा मोठ्या समस्या उद्भवत नाहीत. मासिक पाळीच्या वेदनांसाठी बरेच लोक या गोळीचा वापर करतात. मेथॅम्फेटामाइनचा मोठा आणि नियमित डोस इतर अवयवांवर परिणाम करू शकतो."
गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या
मेफथल सारख्या औषधाचा दीर्घकाळ वापर केल्याने पोटात अल्सर, रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढू शकतो अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
तसेच हृदय आणि रक्तवाहिन्यांवर नकारात्मक प्रभाव निर्माण होतो.
काही अभ्यासांमध्ये असं सुचविण्यात आलं आहे की, हृदयारोगाशी संबंधित लोकांनी मेफेनॅमिक ऍसिडचा वापर केल्यास या समस्या वाढू शकतात.
काहींच्या मते, मेथॅम्फेटामाइनच्या वापरामुळे मूत्रपिंडाचा देखील त्रास होऊ शकतो.
डॉ. काव्या प्रिया सुचवितात की ज्या लोकांना गॅस्ट्रोइंटेस्टाइनल, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी किंवा मूत्रपिंडाच्या समस्या आहेत त्यांनी मेफथलचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावा.