न्युरोप्लास्टिसिटीने आपल्याला मेंदूची क्षमता अफाट बनवता येते का?
सोमवार, 26 फेब्रुवारी 2024 (20:30 IST)
आपलं आयुष्य आणि भवतालचं जग हे तंत्रज्ञानामुळे दिवसेंदिवस जलद होत चाललं आहे. त्यातून आपल्या आयुष्यात अनेक बदल घडताना दिसत आहेत.
आपण सध्या जी कामं करत आहोत त्यासाठी आपला मेंदू बनलाच नव्हता, असं देखील वैज्ञानिक म्हणतात. तरी देखील या नव्या जगाशी सामावून घेतलं आहे. तसेच नवीन बदलांना आपण स्वीकारत देखील आहोत.
आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींशी इतक्या लवकर आपण कसं जुळवून घेऊ शकलो? याबाबत आश्चर्य वाटतं ना? तर त्याचं रहस्य देखील आपल्याच मेंदूत दडलंय.
गोष्टींशी जुळवून घेण्याची, नव्या गोष्टी शिकण्याची आणि नवीन कौशल्यं आत्मसात करण्याची मेंदूची क्षमता ही अफाट असते.
आता प्रश्न हा आहे की आपण आपल्या या विशेष असलेल्या अवयवाला म्हणजेच मेंदूला निरोगी कसं ठेवू शकतो? आपल्या मेंदूची क्षमता वाढवून मेंदूला तल्लख कसं बनवता येऊ शकतं?
बीबीसी न्यूजच्या विज्ञान प्रतिनिधी मेलिसा होगेनबूम यांनी याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी नव्या संशोधनांचा अभ्यास केला. अनेक तज्ज्ञांशी बातचीत केली आणि त्यांना या गोष्टी सापडल्या आहेत ज्या त्यांनी आपल्याला सांगितल्या.
आपण आपल्या मेंदूची क्षमता अनेक प्रकारे वाढवू शकतो असं इंग्लंडमधील सरे युनिव्हर्सिटीतील क्लिनिकल सायकोलॉजीचे प्राध्यापक थॉर्स्टन बार्नहॉफर यांनी मेलिसा यांना सांगितलं.
बार्नहॉफर सांगतात, "काही अशा प्रक्रिया आहेत, ज्यामुळे तुमचा तणाव काही आठवड्यातच कमी होऊ शकतो आणि त्याने न्युरोप्लास्टिसिटी वाढू शकते. न्युरोप्लास्टिसिटी वाढल्याने अल्झायमरसारख्या आजारांचा धोका टळतो. इतकंच काय पण जर समजा तुम्हाला एखादा जबर मानसिक धक्का बसला असेल तर त्यातून होणाऱ्या नुकसानाची तीव्रता देखील कमी केली जाऊ शकते."
न्युरोप्लास्टिसिटी म्हणजे काय?
न्युरोप्लास्टिसिटी म्हणजे आपल्या मेंदूची अशी क्षमता, जी बाहेरून आलेल्या माहितीच्या आधारे मेंदूत बदल करुन घेत असते.
लखनौचे मानसशास्त्रज्ञ राजेश पांडे यांनी बीबीसी हिंदीच्या आदर्श राठोड यांच्याशी या विषयावर बातचीत करत आपली मतं मांडली.
"न्युरोप्लास्टिसिटी म्हणजे आपल्या मेंदूत असलेल्या न्युरॉन्स किंवा नर्व्ह सेल्समध्ये होणारे बदल. या न्युरॉन्समध्ये जे बदल घडतात किंवा जे नवीन न्युरॉन्स तयार होतात त्यांना न्युरोप्लास्टिसिटी म्हटलं जातं," असं पांडे सांगतात.
ते सांगतात की 'आपला मेंदू म्हणजे एक न्यूरल वायरिंग सिस्टम असते. आपल्या मेंदूत अब्जावधी न्यूरॉन्स असतात. आपल्या पंच ज्ञानेंद्रियातून मिळणारी माहिती ( डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा) मेंदूपर्यंत पोहचवली जाते. जेव्हा न्यूरॉन्समध्ये अंतर्गत संबंध प्रस्थापित होतो तेव्हा ही माहिती तिथेच साठवली जाते.'
"जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा या न्युरॉन्समध्ये अत्यंत कमी अंतर्गत संबंध असतो. मेंदूत रिफ्लेक्सशी संबंधित असणारं जाळं सुरुवातीपासूनच अस्तित्वात असतं.
"याचं उदाहरण म्हणजे एखादी गरम वस्तू दिसली तर लहान बाळ आपोआपच हात दूर करुन घेतं पण त्याच वेळी समजा एखादा साप किंवा विंचू असेल तर ते थेट हात लावायला त्याच्याजवळ जाऊ शकतं. याचं कारण म्हणजे अद्याप त्याच्या मेंदूत ही माहितीच साठवली गेली नाही ज्यातून असं त्या बाळाला समजेल की साप ही गोष्ट आपल्याला नुकसान पोहोचवू शकते. मग हळूहळू त्याला एक एक गोष्टी समजू लागतात आणि मेंदूत न्युरल कनेक्शन्स तयार होतात," असं पांडे सांगतात.
राजेश पांडे पुढे सांगतात की आपल्या अनुभवांनुसार आपल्या मेंदूतील जाळं बदलतं. या पूर्ण प्रक्रियेला न्युरोप्लास्टिसिटी म्हटलं जातं.
शिकण्याची, अनुभव घेण्याची आणि आपल्या आठवणी जपण्याच्या पाठीमागे हीच प्रक्रिया असते.
न्युरोप्लास्टिसिटी कशी वाढवता येऊ शकते?
प्रा. थॉर्स्टन बार्नहॉफर सांगतात की माइंड वान्डरिंग म्हणजेच मनाला भरकटवल्यामुळे आपल्या मेंदूवरील तणाव वाढतो. म्हणजेच अतिविचारांमुळे तणाव किंवा चिंता वाढते.
एकाच गोष्टीचा वारंवार विचार केल्याने चिंता वाढते आणि हे धोकादायक असतं कारण त्यातून कॉर्टिसॉल हार्मोन्सची लेव्हल वाढते.
कॉर्टिसॉल आपल्या मेंदूसाठी नुकसानदायी असतं. त्यामुळे न्युरोप्लास्टिसिटीत अडथळा निर्माण होतो. यातून वाचण्याचा एक मार्ग आहे, ते म्हणजे माइंडफुलनेस किंवा मेंदूला सचेत ठेवणं.
माइंडफुलनेसचा अर्थ आहे की आपल्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे याची आपल्या ज्ञानेंद्रियाकडून जागृतपणे माहिती घेणं. म्हणजे तुमच्या आजूबाजूला नेमके कोणते आवाज आहेत, गंध कसा आहे, हवेचा त्वचेवर काय परिणाम होतोय याकडे लक्ष ठेवणे आणि त्यावेळी आपल्याला काय वाटतं हे समजून घेणं.
मानसशास्त्रज्ञ राजेश पांडे सांगतात की "माइंडफुलनेसचा अर्थ आहे की आपल्या पंचज्ञानेंद्रियांचा वापर करुन आपल्या मेंदूला माहिती पुरवताना सचेत राहणे आणि ही माहिती कशी वापरली जात आहे याकडे लक्ष देणे."
हे काहीसं ध्यान केल्यासारखंच आहे.
ध्यानाचे उदाहरण देत राजेश पांडे सांगतात की "माइंडफुलनेस ही प्रक्रिया आपल्या पंचज्ञानेंद्रियावर लक्ष केंद्रित करण्याची क्रिया आहे. तुम्ही आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा आणि हे पाहा की तुमचे श्वास उष्ण आहेत की शीतल, आजूबाजूचे आवाज तुम्हाला कसे ऐकू येत आहेत, आजूबाजूला एखादा गंध आहे का यावर लक्ष द्या."
यातून देखील न्युरल कनेक्शन्स बनतात. जर समजा कुणी दिवसातून 15 मिनिटे आपल्या पंचज्ञानेंद्रियांवर लक्ष केंद्रित करत असेल तर त्या व्यक्तीचे हसणे, बोलणे, चालणे, फिरणे सर्वकाही बदलल्याचे लक्षात येते.
नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून असं समोर आलं आहे की न्युरोप्लास्टिसिटीच्या प्रक्रियेमुळे मेंदूच्या भौतिक रचनेत सुद्धा बदल झाले आहेत.
याबाबतचे परीक्षण करण्यासाठी मेलिसा होगेनबूम यांनी आपल्या मेंदूचे स्कॅनिंग केले. सहा आठवडे त्यांनी ध्यान केलं आणि पुन्हा एकदा मेंदू स्कॅन केला.
या दोन्ही स्कॅनची तुलना करुन बार्नहॉफर यांनी सांगितलं की सहा आठवड्यांनी मेलिसा यांच्या मेंदूची न्युरोप्लास्टिसिटी वाढली आहे.
बार्नहॉफर सांगतात की "मेलिसा यांच्या उजव्या अमिगडलाचा आकार कमी झाला आहे. जेव्हा तणाव कमी होतो तेव्हा असं होतं. ज्या लोकांना सतत तणाव आणि चिंता असते त्यांच्या अमिगडलाचा आकार मोठा असतो. माइंडफुलनेस ट्रेनिंगमुळे अमिगडलाचा आकार कमी झाल्याची अनेक उदाहरणं आम्ही याआधी पाहिली आहेत. त्याचबरोबर मेंदूच्या पाठीमागच्या भागात बदल झाल्याचे दिसत आहे. याचा अर्थ विचारांमुळे जे मेंदूचे भरकटणे चालायचे त्याचे प्रमाण कमी झाले आहे."
व्यायामामुळे देखील होतो फायदा
तज्ज्ञ सांगतात की न्युरोप्लास्टिसिटी वाढवण्यासाठी व्यायामाची देखील मदत होते.
इटलीच्या सेंट्रो न्युरोलेसी या संस्थेचे संचालक प्रा. एंजले क्वॉट्रोने सांगतात की जर तुम्ही दिवसात किमान 30 मिनिचं व्यायाम केला आणि आठवड्यातून असं किमान चार पाच दिवस केलं तर त्यामुळे मेंदूवर चांगला परिणाम होतो.
युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स येथे कंपरेटिव्ह कॉग्निशनचे प्राध्यापक गिलियन फॉरेस्टर सांगतात की मेंदूत होणाऱ्या हालचाली आणि बदल यांचा शारीरिक हालचालींशी निकटचा संबंध आहे.
त्या सांगतात की आम्ही हे पाहिलं आहे की समजा एखाद्या व्यक्तीला बोलताना अडचण निर्माण होत असेल आणि त्या व्यक्तीने हातांच्या हालचाली करुन बोलण्यास सुरुवात केली तर त्या व्यक्तीला बोलणं सोपं पडू शकतं.
खरं तर, आपल्या मेंदूचा जो भाग बोलण्यासाठी आपली मदत करतो तो भाग आपल्या हात किंवा भुजांशी जोडला गेलेला असतो. आपले हात बोलण्यासाठी आपल्याला मदत करतात, त्यामुळे बऱ्याचदा लोक बोलत असताना हातवारे करतात असं आपल्याला दिसतं. यालाच मोटर डेक्स्टेरिटी म्हणतात. भाषेचा विकास हा हातवाऱ्यांमधून किंवा इशाऱ्यातून झाला आहे त्यातूनच हे घडलं असू शकतं असा एक अंदाज व्यक्त केला जातो.
स्कूल ऑफ सायकोलॉजी बर्कबॅक, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथील डॉक्टर ओरी ऑसमी सांगतात की ध्यानाव्यतिरिक्त व्यायामाने देखील चिंता कमी होते.
ते सांगतात की "आपला मेंदू सातत्याने त्याच्यातच बदल घडवत असतो. लहान मुलांमध्ये ही प्रक्रिया तीव्र गतीने होत असते. असं दिसून आलं आहे की जे लहान बाळ हात-पाय खूप हलवतं ते लवकर बोलू लागतं. पण जी लहान मुलं असं करत नाहीत ते थोडं उशिरा बोलतात आणि सामाजिक व्यवहारांत किंवा इतर मुलांमध्ये मिसळण्यास त्यांना थोडी अडचण निर्माण होऊ शकते."
मानसशास्त्रज्ञ राजेश पांडे सांगतात की "व्यायामच नाही तर संगीत किंवा भाषा शिकल्यामुळे देखील न्युरोप्लास्टिसिटी वाढते. जेव्हाही आपण नवीन काही शिकतो, नवा विचार मनात आणतो तेव्हा मेंदूत नवीन न्यूरल कनेक्शन्स तयार होतात."
पांडे सांगतात की "मानवाचा मेंदू आयुष्यभर न्यूरल कनेक्शन्स बनवू शकतो. तुम्ही वयाच्या 80 व्या वर्षी देखील नवीन भाषा शिकू शकता. नवीन जागांना भेट देणं, नवीन काही शिकणं यामुळे खूप फायदा होऊ शकतो. फक्त आपल्याला आपल्या मेंदूला नवीन अनुभव देता यायला हवा."
मेंदूला जर नुकसान पोहचले असेल तर त्याचा उपाय
इटलीतील सेंट्रो न्युरोलेसी या संस्थेत न्युरोलॉजिकल समस्यांशी झुंज देणाऱ्या रुग्णांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उपचार केले जात आहेत.
या संस्थेचे संचालक एंजले क्वॉट्रोने सांगतात की "जे लोक चालू-फिरू शकत नाहीत त्यांच्यासाठी विशेष खेळ तयार करण्यात आले आहेत. यामुळे त्यांच्या मेंदूला संकेत मिळत राहतात. त्यातून न्युरोप्लास्टिसिटी वाढते आणि मेंदूत नवीन कनेक्शन्स तयार होतात, जे एखाद्या धक्क्यात किंवा स्ट्रोकमुळे खंडित झाले आहेत. यालाच रिवायरिंग म्हटलं जातं."
करंट स्टिमुलेटर असं उपकरण आहे की ज्यामुळे मेंदूत जे अशक्त सिग्नल्स आहेत ते पुन्हा सशक्त होतात. यामुळे मेंदूत रिवायरिंग होण्यास मदत होते.
शिकण्याची प्रक्रिया भविष्यात होईल सोपी
आतापर्यंत असं मानलं जायचं की न्युरोप्लास्टिसिटी ही लहान मुलांमध्ये अधिक प्रमाणात घडते. पण आता जगभरात वयस्कर लोकांचे मेंदू सक्रिय ठेवण्यात आणि मेंदूला झालेले नुकसान भरुन काढण्यास याचा उपयोग केला जात आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिज या ठिकाणी एक्सपेरिमेंटल सायकोलॉजी शिकवणारे प्रा. जोई कोर्तजी सांगतात की प्रत्येक व्यक्तीच्या मेंदूची गोष्टी शिकण्याची एक लय असते.
त्यांनी बीबीसीच्या विज्ञान पत्रकार मेलिसा होगेनबूम यांना सांगितलं "प्रत्येक व्यक्तीचा मेंदू आपल्या लयीत काम करतो. जर त्या व्यक्तीला त्याच्या मेंदूच्या लयीनुसार माहिती पुरवली गेली तर ती व्यक्ती लवकर गोष्टी शिकू शकते."
युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिजमध्ये करण्यात आलेल्या प्रयोगात सहभागी झालेल्या लोकांना काही प्रश्न देण्यात आले होते. मग त्यांच्या मेंदूतील हालचाली अत्याधुनिक उपकरण्यांच्या साहाय्याने मोजण्यात आल्या. यातून त्यांना हे लक्षात आलं की त्यांच्या मेंदूचं कोणत्या लयीत काम सुरू आहे. मग त्या लयीनुसार प्रश्न सोडवण्यासाठी देण्यात आले. त्यांनी हे प्रश्न उत्तमरित्या हाताळले.
हे संशोधन सध्या सुरुवातीच्याच टप्प्यात आहे. असं सांगितलं जात आहे की भविष्यात लोकांना त्यांच्या मेंदूच्या लयीच्या हिशेबाने शिकवलं जाईल. त्यानुसार त्यांच्या शिकण्यात सुधारणा होऊ शकेल.
यातून त्यांची न्युरोप्लास्टिसिटी वाढेल आणि त्यांचं आयुष्य आणखी समृद्ध होईल.