Why and how earthquake occurs भूकंप का आणि कसा येतो ?

शनिवार, 4 नोव्हेंबर 2023 (14:08 IST)
भारताला भूकंपाचा किती धोका?
पृथ्वीचं कवच एकसंध नाही तर अनेक टेक्टॉनिक प्लेट्स म्हणजे भूपट्टांनी मिळून बनलं आहे. या भूपट्टांच्या सीमा जिथे एकमेकांना भिडतात, तिथे भूगर्भीय हालचालींची तीव्रता जास्त असते.
 
या प्लेट्स एकमेकांशी घासतात, एकमेकांपासून दूर जातात किंवा कधी एक प्लेट दुसऱ्या प्लेटवर चढते.
 
वर्षाला जास्तीत जास्त 1 ते 10 सेंटीमीटर एवढ्या मंद गतीनं ही हालचाल होत असते. पण कधीकधी त्यातही अडथळा येऊन दबाव निर्माण होतो. मग अचानक तो दबाव मोकळा होतो, तेव्हा त्यातून मोठा भूकंप येऊ शकतो.
 
पृथ्वीवर असे तीन मुख्य प्रदेश आहेत जिथे मोठ्या भूपट्टांच्या हालचाली मोठ्या प्रमाणात होत आहेत. पॅसिफिक रिंग ऑफ फायर, मिड अटलांटिक रिज आणि अल्पाईड बेल्ट म्हणजे आल्प्सपासून हिमालयापर्यंतचा पट्टा.
 
अल्पाईड बेल्टच्या पूर्व भागात भारतीय भूपट्ट ही युरेशियन प्लेटखाली जाते आहे, त्यातून हिमालय पर्वत आणि उत्तर भारताचा भाग, अंदमान आणि कच्छचं रण तसंच तिबेट, पाकिस्तान, अफगाणिस्तानमध्ये भूकंप होतात.
 
युरोपचा दक्षिण भाग, तुर्की, सीरिया, इराण हे देशही याच अल्पाईड बेल्टमध्ये आहेत.
 
पण भूपट्टांच्या हालचाली कमी असलेल्या ठिकाणीही भूकंप येऊ शकतात. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात लातूर आणि कोयनानगरला झालेले भूकंप.
 
खडक आणि मातीतले बदल, ज्वालामुखी आणि लाव्हा रसाच्या हालचाली, जमिनीखालचे पाण्याचे प्रवाह अशा गोष्टींमुळे असे भूकंप निर्माण होऊ शकतात.
 
कधीकधी अणुस्फोट खाणकाम, तेलासाठी केलं जाणारं उत्खनन, मोठ्या धरणांमुळे तयार झालेले तलाव अशा मानवनिर्मिती गोष्टींमुळे भौगोलिक रचनांवर परिणाम होऊन भूकंप येऊ शकतात.
 
भारताला या दोन्ही प्रकारच्या भूकंपाचा धोका आहे. नॅशनल सेंटर फॉर सेसमॉलॉजी ही संस्था भारतात भूगर्भातील हालचाली हा नकाशाच पाहा ना. भैवैज्ञानिक सर्वेक्षणांनुसार देशाचा जवळपास 58 टक्के भाग भूकंपप्रवण क्षेत्रात येतो.
 
भूकंपाचं भाकित करता येतं का?
भूकंपाचं चक्रीवादळांसारखं अचूक भाकित करता येत नाही, पण विशिष्ठ परिस्थितीत भूकंपाची शक्यता थोड्याफार प्रमाणात वर्तवता येऊ शकते. उदा. ज्वालामुखीच्या हालचाली वाढल्यास आसपास भूकंप येऊ शकतात.
 
जपान आणि अमेरिकेतील कॅलिफोर्नियात असा भूकंपाचा अंदाज वर्तवण्यची पद्धत विकसित होते आहे.
 
भूकंपाची नोंद घेण्याचं काम सेस्मोमीटर नावाचं यंत्र करतं तर भूकंपाची महत्ता म्हणजेच मॅग्निट्यूड अर्थात ताकद रिश्टर स्केलमध्ये मांडली जाते. 1 ते 10 या परिमाणावर ही महत्ता मोजली जाते.
 
पण भूकंपामुळे किती नुकसान होणार, हे केवळ त्याच्या तीव्रतेवर नाही तर इमारतींच्या उभारणीवरही अवलंबून असतं.
 
भूकंपप्रवण क्षेत्रांत सुरक्षा ड्रिल्स आणि इमारतींची वरचेवर पाहणी करणं गरजेचं असतं. तसंच तिथल्या भौगोलिक हालचालींवरही लक्ष ठेवावं लागतं.
 
तुम्ही अशा प्रदेशात राहात असाल, तर आधीच काही गोष्टींची तयारी करणं आवश्यक आहे.
 
भूकंपप्रवण क्षेत्रात कशी काळजी घ्यावी
"जिथे खूप सारे भूकंप येतात अशा प्रदेशात तुम्ही राहात असाल, तर घरात एक इमर्जन्सी पॅक तयार ठेवणं केव्हाही चांगलं," असा सल्ला लंडनच्या इंपिरियल कॉलेजचे भूकंपशास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हिक्स सांगतात.
 
त्यांच्या मते या इमर्जन्सी पॅकमध्ये पाण्याची बाटली, टॉर्च, प्रथमोपचार म्हणजे फर्स्ट एड किट, थोडे खायचे तयार पदार्थ ठेवायला हवेत.
 
रेड क्रॉस या संस्थेचा सल्ला आहे की या किटमध्ये काही पैसे, औषधं आणि महत्त्वाच्या कागदपत्रांची प्रतही ठेवायला हवी.
 
तुमच्या घरातील टीव्ही, दिवे, कपाटं आणि बाकी मजबूत फर्निचर लवचिक बेल्टनं भिंतींना बांधून ठेवावं, म्हणजे भूकंपादरम्यान ते हालेल, पण पडणार नाही.
 
अर्थक्वेक कंट्री अलायन्सनं दिलेल्या माहितीनुसार बहुतांश दुखापती आणि मृत्यू हे अशा वस्तू आणि फर्निचर अंगावर पडल्यामुळे होतात.
 
भूकंप आला तर काय करायचं?
भूकंप सुरू झाला की तडक घराबाहेर पडा, असा सल्ला अनेकजण देतात. पण यूएस जिऑलॉजिकल सर्व्हे या अमेरिकेतील सरकारी वैज्ञानिक संस्थेचे तज्ज्ञ सांगतात, की जमिनीचं थरथरणं थांबेपर्यंत तुम्ही असाल तिथेच सुरक्षितरित्या थांबलात इजा होण्याचा धोका कमी होतो.
 
'ड्रॉप, कव्हर अँड होल्ड ऑन' असा मंत्र ते देतात. हात आणि गुडघे खाली टेकून राहा - म्हणजे तुम्ही स्वतः पडणार नाही.
 
टेबलासारख्या वस्तूंखाली आश्रय घ्या आणि टेबल वगैरे नसेल तर डोकं कव्हर करून कंपनं थांबेपर्यंत फार हालचाल न करता स्थिर राहायचा प्रयत्न करा.
 
काहीजण दरवाजात उभं राहायचा सल्ला देतात, पण सगळेच दरवाजे सुरक्षित नसतात.
 
भूकंप थांबल्यावर काय करायचं?
तुम्ही ज्या इमारतीत आहात ती मजबूत असेल तर तिथेच थांबा, पण झुंबरं, खिडक्या किंवा गॅलरीपासून दूर राहा कारण असे भाग लवकर कोसळण्याची शक्यता असते.
 
इमारत धोकादायक झाली असेल तर कंपनं थांबल्यावर लवकरात लवकर मैदानात किंवा अशा उघड्या जागी जा. कारण अनेकदा मोठ्या भूकंपानंतर आफ्टरशॉक म्हणजे छोटे भूकंप येण्याची शक्यता असते.
 
पण उंच इमारती, इलेक्ट्रिक तारा, झाडं किंवा कुठल्या पिलर्स किंवा पोल्सपासून दूर राहा. भूकंपादरम्यानही तुम्ही रस्त्यावर किंवा कुठे मोकळ्या जागी असाल, तर या गोष्टींपासून दूर राहायचं लक्षात ठेवा.
 
भूकंपानंतर गॅसपाईपलाईन फुटून गळती होण्याचा धोकाही असतो. तसंच आगीचा धोका असलेल्या जागांपासून दूर राहा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती