व्हॅलेंटाइनच्या दिवशी रसिकांच्या भेटीला
• भारताबरोबरच अमेरिकन मराठी भाषिक देखील घेणार प्रेमागीतांचा आस्वाद
• या अल्बममध्ये तराणा, गझल, भावगीते या गीतप्रकारांचा समावेश
मराठी संगीतात विविध शैलीची रमणीय अशी अनेक गीते प्रसिद्ध झाली की ज्यांनी आपल्या आत्म्याला स्पर्श केला आहे. रंग प्रीतीचे या अल्बममध्ये विविध शैलीच्या माध्यमातून ९ गीते सादर करण्यात आली आहेत, यामध्ये तराणा, गझल, भावगीते, वेस्टर्न जॅझ तसेच व्यावसायिक चित्रपट गीते सारख्या शैलीच्या गीतांचा समावेश करण्यात आला आहे.
सत्यजित लिमये यांचे दिग्दर्शन व निर्मिती असणारा हा अल्बम येत्या १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाइनला रसिकांच्या भेटीला येत आहे. सोनाली जोशी व कामिनी फडणीस- केंभावी यांनी ही गीते लिहीली असून यासाठी आनंद कुऱ्हेकर, सत्यजित केळकर व मिलींद गुणे यांनी संगीत रचनेची जबाबदारी पार पाडली आहे. आनंद भाटे, हृषीकेश रानडे, मधुरा दातार, प्रियांका बर्वे व सचिन इंगळे यांनी ही गीते स्वरबद्ध केली आहेत.
या निमित्ताने बोलताना सत्यजित लिमये म्हणाले की, “पारंपारिक व आधुनिकतेची कास धरणारा हा अल्बम आजच्या तरुणाईला व खासकरून प्रेमीयुगूलांना नक्कीच साद घालेल असा मला विश्वास आहे. यात पाश्चिमात्य जॅझ संगीताच्या बरोबरीने ऐकल्या जाणाऱ्या चित्रपट संगीताचा समावेश या अल्बममध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक पिढीचे प्रतिनिधीत्व करणारी गीते रसिकांना अनुभवता येतील.”
या अल्बमचे सादरीकरण मेरीगोल्ड क्रिएशन्सच्या वतीने करण्यात आले असून हा अल्बम ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध असून तो सावन, युट्यूब, आयट्युन्स तसेच अमेझॉन या संकेतस्थळावर ऐकता येईल.