मार्गशीर्ष गुरुवार व्रत हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे. महालक्ष्मी या देवतेशी संबंधित हे व्रत महिला करतात. आपल्या कुटुंबाला धन- धान्य- समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात. अनेक महिला या महिन्यात प्रत्येक गुरूवारी व्रत करुन शेवटच्या गुरूवारी सवाष्ण महिलांसोबत हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून त्याची सांगता करतात.
मार्गशीर्ष गुरूवार 2021 व्रत तारखा
पहिला गुरूवार - 9 डिसेंबर 2021
दुसरा गुरूवार - 16 डिसेंबर 2021
तिसरा गुरूवार - 23 डिसेंबर 2021
चौथा गुरूवार - 30 डिसेंबर 2021
यंदा मार्गशीर्ष गुरूवार व्रताचे 4 दिवस आहेत. 30 डिसेंबर दिवशी या व्रतामधील शेवटचा गुरूवार असणार आहे.
पूजा पद्धत
मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी एका चौरंगावर तांदूळ पसरून त्यावर कलश ठेवावा.
त्या कलशात पाणी भरून त्यावर आंब्याची पाने लावावी, त्यावर नारळ ठेवावं.
त्या नारळाला देवी समजून त्याला सजवावे.
दागिने, फुलांची वेणी घालावी आणि या देवीची पूजा करावी.
देवीभोवती आरास मांडावी. दारात रांगोळी काढून त्यात देवीची पावले काढावे.
सकाळच्या पूजेनंतर संध्याकाळी पुन्हा पूजा आणि आरती करावी तसेच अंगणात दिवे लावावे.
या व्रताचे महत्त्व सांगणारी पुस्तिका पूजेमध्ये ठेवण्याची पद्धत आहे.
पूजा झाल्यानंतर या पुस्तिकेत दिलेले देवीचे महात्म्य आणि कथा यांचे वाचन करावे.
गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.
शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावं.
ब्राह्मणाला दान द्यावं आणि सुवासिनींना बोलावून हळदी-कुंकू करावं आणि त्याना या व्रताचे महात्म्य सांगणारी पुस्तिका भेट देण्याची पद्धत आहे.
महराष्ट्रासह देशातील इतर प्रांतात देखील महिला हे व्रत करतात. अनेक ठिकाणी गुरुवारी सकाळी सूर्योदयाला देवीला आवळा, सुकामेवा, खीर, पुरी यांचा नैवेद्य देखील दाखवण्याची पद्धत आहे.