हा लेख मी क्वारंटाईन सेंटरमधून लिहितोय. माझे बाबा कोविड पॉजिटिव्ह आले, ते सध्या केईएममध्ये उपचार घेत आहेत. आमचं सबंध कुटुंब क्वारंटाईन झालंय आणि अजून रिपोर्ट्स आलेले नाही. अशा परिस्थितीत मीडिया, सोशल मीडिया, राजकारण, समाजकारण या सगळ्यांपासून दोन हात लांब राहण्याचा निर्णय घेतला होता. पण महाराष्ट्राच्या राजकारणात जी काही टिंगल टावाळी सुरु आहे ती पाहुन कोणताही सुजाण नागरिक अस्वस्थ होईल. आज आषाधी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री सहपरिवार पंढरपूरला गेले. जिथे माननीय मुख्यमंत्री जातील तिथे शेपटीसारखे माननीय आदित्य ठाकरे सुद्धा जात असतात. हे मंत्रीमंडळ कमी आणि फॅमिली क्लब जास्त वाटतोय. त्यात पूजा सुरु असताना माननीय आदित्य ठाकरे तिथे थांबले नाहीत. असो. त्यांच्या बाल मनाला या सगळ्या गोष्टींची सवय नसावी. तर मुख्यमंत्र्यांनी ट्विट करुन सांगितलं की "मी माऊलीला साकडं घातलं आहे की आता आम्हाला चमत्कार बघायचा आहे, आम्हाला चमत्कार दाखव. कारण मानवाने हात टेकले आहेत. आपल्याकडे औषध नाही, काही नाही. हे तोंडाला पट्टी बांधून कसं जीवन जगायचं?"
मुळात स्वतःच्या बंगल्यातून बाहेर न निघणार्या मुख्यमंत्र्यांना जागतिक परिस्थितीची जाणीव मुळीच नाही. मातोश्री हेच त्यांचे इतक्या वर्षाचे जग आहे. त्या पलीकडे एक जग आहे हे त्यांना मान्यच नाही. बंगल्यावर बसून आदेश द्यायचे आणि इतरांना बोलवून झुकल्या गर्विष्ठ माना वगैरे म्हणत जगायची त्यांना सवय पडली आहे. त्यामुळे त्यांचाही नाईलाज आहे. कार्यक्षम व कर्तव्यदक्ष देवेंद्र फडणविसांना फसवून स्वतःच्या हट्टापाई ते मुख्यमंत्री झाले खरे पण दोन महिन्यात थकले आणि महाबळेश्वरला सुट्टीसाठी निघून गेले. त्यात कोरोनाचे संकट आल्याने त्यांनी गुडघेच टेकले. उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यानंतर सरकारचा प्रशासनावरचा वचक निघून गेला. सध्या आपल्याला जी कामे होताना किंवा बिघडताना दिसतायत ती प्रशासन करतंय आणि सरकार बंगल्यावर बसून झोपा काढतंय. आजूबाजूला घडणार्या कोणत्याही घटनांमुळे आपल्या डोक्यात तिडीक जाते. वाढलेलं विज बिल प्रकरण असो व त्यावर ऊर्जामंत्र्यांचं निर्लज्ज उत्तर असो, वारकर्यांकडून एसटी भाडे घेणे असो, अनलॉक की लॉकडाऊन यावर गोंधळ असो, कोरोनाचे रुग्ण लपवण्याचा प्रयत्न असो, पालघर प्रकरण असो, सामान्य मणसाला बंगल्यावर नेऊन मारहाणीचं प्रकरण असो, भोसले ताईंनी उचललेलं मशिदीवरील भोंग्यांचं प्रकरण असो, डेड बॉडीला लागणार्या कव्हरचा भ्रष्टाचार असो, असे कितीतरी "असो" या सरकारने निर्माण केलेले आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, सोईसुविधांपासून जनता वंचित आहे, जनतेला पुरेसं धान्य लाभलेलं नाही. जे मिळालं आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि तत्सम सामाजिक संस्थांनी दिलेलं आहे. या सामाजिक संस्था जर पुढे आल्या नसत्या तर महाराष्ट्र पूर्णपणे संकटात सापडला असता. आज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अनागोंदी माजली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते माननीय देवेंद्र फडणविस म्हणतात तसे बोल्ड निर्णय घेण्याची गरज आहे. पण उद्धव ठाकरे यांच्यामध्ये निर्णय घेण्याचीच क्षमता नाही. २५ वर्षे त्यांचे सरकार बीएमसीमध्ये आहे. पण त्यांना साधी मुतारी स्वच्छ ठेवता आली नाही ते कोरोनाचे संकट काय हाताळणार? हे सरकार स्थापन करुन उद्धव ठाकरेंनी स्वतःची हौस तर भागवली पण त्यांनी जनतेच्या सणसणीत कानाखाली लगावून दिलेली आहे. इतका वाईट कारभार असूनही जे लोक सरकार आणि उद्धवजींची स्तुती करत आहेत ते लोकांच्या प्रेतावर उभे आहेत एवढं त्यांनी लक्षात ठेवावं. केवळ सरकारच्या अनागोंदी कारभारामुळे महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यूसंख्या वाढत आहे. बहादूर शहा जफ्फरच्या दरबारी त्याने ठेवलेले काही नोकर होते जे त्याला बेस्ट बादशहा म्हणायचे आणि त्याच्या सगळ्या विचित्र गोष्टींची स्तुती करायचे. महाराष्ट्रातही तिच परिस्थिती आहे म्हणून घरबसल्या बेस्ट सीएम होता आले आहे. पण खरी परिस्थिती, म्हणजे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला आजपर्यंत लाभलेले सर्वात कमकुवत मुख्यमंत्री आहेत.
आता मुख्यमंत्र्यांच्या विधानाकडे वळूया. त्यांनी विठुरायाला साकडे घातले आहे म्हणे की मानवाने हात टेकले आहे, औषध नाही, काही नाही म्हणून तू चमत्कार दाखव. तर मला माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सांगावेसे वाटते की तुम्ही हात टेकले असले तरी आम्ही हात टेकलेले नाहीत. आम्ही कोरोनाशी आणि आर्थिक परिस्थितीशी लढत आहोत. जरा बंगल्याच्या बाहेर पडून बघा (हिंमत असेल तर) आणि राज्याची पाहणी करा, प्रशासकीय यंत्रणा झपाटल्यासारखी झटत आहे, त्यांच्याकडून चूकाही होत आहेत पण त्यांना एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे, जे नेतृत्व तुमच्यात कधीच नव्हते. पोलिस, डॉक्टर्स, स्वच्छता कर्मचारी... सगळेच लढत आहेत... जगात कोरोनाशी लढण्यासाठी डॉक्टर्स औषधे बनवण्याच्या कामाला लागले आहेत. पोलिस बांधव तर तीन चार महिने आपल्या घरी सुद्धा गेलेले नाहीत. त्यांचा सुद्धा कोनोनाने मृत्यू होत आहे. तुम्ही तुमच्या बंगल्यात सुरक्षित आहात. पण लोक जीवाच्या आकांताने काम करत आहेत. उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे असं पूर्ण नाव लावता. किमान बाळासाहेब या नावाला तरी जागा हो... पण नाही, तुम्हाला काय करायचं असतं तर तुम्ही सुरुवातीलाच केलं असतं. तुम्ही मुख्यमंत्री होऊन, जनतेला वार्यावर सोडून, बंगल्यात सुरक्षित बसून हा जो काही मौत का सौदा केलाय त्याबद्दल जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही. बाळासाहेब म्हणाले होते की "माझ्या उद्धवला सांभाळा". बाळासाहेबांच्या प्रेमाखातर तुम्हाला जनतेने खूप सांभाळलं पण मुख्यमंत्री म्हणून तुम्ही आमचे मायबाप होता आणि आम्हाला सांभाळायला तुम्ही खूप कमी पडला आहात. ज्याप्रमाणे तुम्ही जनतेला वार्यावर टाकलं, जनता सुद्धा याची परफेड केल्याशिवाय राहणार नाही. कृपया यापुढे पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा हट्ट धरु नका, लोकांच्या जीवाशी खेळू नका... बाळासाहेबांना तुम्ही वचन दिले होते, पण स्वर्गातून बाळासाहेबांचा आत्मा तळमळत असेल महाराष्ट्राची ही दूर्दशा पाहून... ज्याप्रमाणे सावरकरांनी मातृभूमीकडे जाण्यासाठी सागराला आर्त साद घातली. त्याप्रमाणे बाळासाहेब यमदेवाला साद घालत असतील की "अरे यम्या, माझा महाराष्ट्र जळतोय तिकडे, माझ्या मायभूमीला वाचवायला तरी खाली सोड मला. माझ्या आईला माझी गरज आहे" पण ही अशक्यप्राय गोष्ट आहे. असो.
उद्धवजी, विठ्ठल चमत्कार करत नाही. विठ्ठल चमत्कार करण्यासाठी माणसे नेमतो. तुम्ही मुख्यमंत्री असल्यामुळे तो चमत्कार तुम्ही करणे अपेक्षित आहे. विठ्ठल तुमच्या पाठीवर हात ठेवून लढ म्हणतच आहे. पण तुमची लढण्याची सिद्धता नाही. उलटपक्षी तुम्ही विठ्ठलालाच चमत्कार करायला सांगत आहात... म्हणजे डॉक्टर, पोलिस, कर्मचारी वगैरे वगैरे सगळे मुर्ख आहेत का, आपल्या जीवावर उदार होऊन काम करायला? रोम जळत असताना निरो फिडल वाजवत होता... आमचा महाराष्ट्र जळत असताना आमचा निरो मात्र मंदिराची घंटा वाजवत होता आणि मंदिरातला विठ्ठल पोलिस, डॉक्टर व सगळ्या कर्मचार्यांच्या रुपात काम करत होता.