पहिला पाऊस

बुधवार, 15 मे 2019 (15:11 IST)
'आंब्याच्या सालीवरून पडला म्हणून निमित्त झाले, आणि भर वैशाखाच्या उबाळत अंथरुण धरलं यानं..!' असं आई कुणाला तरी सांगत होती. मी तसा जागा झालो, तो काय? माझ्याला पायाला बँडेज बांधलेलं होतं. 'अरे-अरे थांब, उठू नकोस तू,' आई म्हणाली. 'पण आई मला का बँडेज बांधलं, मला अस्वस्थ का होतं!' 'हो, खोड्या करू नका असं सांगत होते तेव्हा नाही ऐकलं आणि आता?' आई म्हणाली, 'थोडं मोठ्या माणसांचं ऐकलं तर बिघडलं कुठं, पण नाही'... 'अगं मी पण काय केलं!'
 
'तुला सांगत होते आजोबांना त्रास देणार असाल तर सुट्टीला जायला नको, 'अगं शकू शकू'.. राघव, या आता तुम्ही,' असं आई म्हणाली. 'हा तुझा मामा! अति खोडकर एवढा मोठा झाला पण अक्कल आली नाही अजून याला', मझ्या आईचं आणि राघू मामाचं लग्न एकदम झालं म्हणजे एका मंडपात. त्यामुळे आई आणि मामा मंध्ये वयात फारसं अंतर नव्हतं. आईस मी आणि रघुमामांस चिन्मय झाला. पण... चिन्मय जास्त दिवस जगला नाही, तर तो मझ्याबरोबर खेळायला आला असता. बिचारा रघुमामा! तो जरी मोठा असला तरी, आमच्या बरोबर खेळतो! सुट्टी कशी जाते समजतच नाही. मी आणि रघुमामा शेतात धमाल करायचो, पोहायचो. एक दिवस मी आंब्याच्या झाडावर चढलो आणि आंब्याचा मालक रघ्या रघ्या ... करत आला आणि मामा म्हणाला, 'आशू तू थांब, वरच लपून बस...' पण माझ्या हातातली कोय खाली पडली व ती मोठ्या फांदीला अडकली आणि माझा पाय घसरला व मी खाली पडलो, मला पुढचं आठवत नाही...!
 
'आशू.. आशू' चिन्मय काय रे' 'अरे चल नां' बाहेर जाऊ, बघ सर्वजण आलेत', 'अरे पण आई आणि आत शैला मावशीकडे गेलेत'  मग चल ना बघ, राजू, तान्या, मोहन, वैभव, कालेकरांचा परश्या ही सर्व मंडळी सुरपाट्या खेळत होती. 'अरे तो बघ आशू' असं म्हणत सर्वचजण एकत्र जमलो! आम्ही सर्वजण सुरपाट्या खेळण्यात मग्न होतो. तेवढ्यात गावचा पोस्टमन सायकलवर आला. आम्ही त्याला पाडायचं ठरवलं आणि रस्तवरच हा खेळ चालू होता. तो घंटी वाजवत होता. पण त्याला आम्ही रस्ता देत नव्हतो! शेवटी त्याने  आमच्या रिंगणात सायकल घातली. तेव्हा तर सर्वचजण त्याच्या समोरून आडवेतिडवे पळू लागले. तो दाणकरून आदळला. आम्ही सर्वजण हसू लागलो. तो वैतागला, ' मी सर साहेबांना नाव सांगेन' असे तो रडक्या तोंडाने म्हणू लागला! 'सर साहेबांना म्हणजे तार साहेबांनाच ना? जा.. जा' असे मी म्हणालो. आपली सायकल घेऊन तो निघून गेला. 'अरे! सरसाहेब म्हणजे तार मास्तर नाही का? तर ते तुझे आजोबा' असं
तान्या पुटपुटला.
 
एकदम वार्‍याचा वेग वाढला. आजोबांचं नाव काढलं म्हणून वारा वाढला असा विनोद करून आम्ही सर्वचजण हसत हसत घराकडे निघालो. पण हळुवार मृदगंध येत होता, प्राथमिक शाळेच्या आवारातील अशोकाची पाने उंच आकाशाकडे झेप घेत होती! दूरवर दिसणारा रामलिंग डोंगराचा कडा भिजलेला पाहून आम्ही सर्वजण नाचू लागलो, ओरडू लागलो, तेवढ्यात
 
'नभात नसता ढग मेघांचे,
माती-मोती होती थेंब पावसांचे'
 
प्रमाणे टपोरे थेंब आम्हाला मारू लागले. सर्वच पाने, फुले नाचू लागली. ढगांनी ताल धरला आणि सारी तृषित वसुंधरा तृप्त झाली...!
 
पाऊस निवळला... निवळलेल्या ढगांधून थोडं ऊन, थोड्या नाजूक जलधारा बरसत होत. खड्‌ड्यांमध्ये साठलेल्या पाण्यामध्ये उड्या मारत मी घर गाठलं! वाड्यात पाऊल टाकताच 'नाललायक! मोठ्या माणसांची चेष्टा करतो, थांब तुला आता रात्रभर पावसातच उभा करतो' असा आजोबांचा आवाज ऐकून मी घाबरलो! वाड्याच्या चौकात, पोस्टमन काका पाहून मी अधिकच घाबरलो व आत जाण्याऐवजी बाहेर पडलो...!
 
तोच 'अरे आशुतोष कुठे चाललांस, अरे थांब!' अशी हाक ऐकू आली. अंगावरती पावसाचे थेंब पडताच मी दचकलो व इकडेतिकडे पाहू लागलो. तर काय मी वाड्याच्या पडसात चिंब भिजलेलो, आजोबाही भिजलेले, तान्या, वैभव, परश्या पण भिजलेले आणि माझ्या हातापायाचे बँडेजपण भिजले होते... पण चिन्मय कुठेच दिसत नव्हता... चिन्मदय कुठेही दिसत नव्हता...!
विठ्ठल जोशी 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती