ममता बॅनर्जी: खरंच बंगाल पोलिसांनी CRPF जवानांना मारहाण केली होती? - फॅक्ट चेक

पश्चिम बंगालच्या पोलिसांनी मतदानादरम्यान ऑन-ड्यूटी असलेल्या CRPF जवानांना मारहाण केली, असा दावा करणारा एक व्हीडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय.
 
या व्हीडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "ममता बेगमच्या पोलिसांनी जवानांनाही सोडलं नाही. या व्हीडिओला शेअर करा आणि निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवा."
 
दीड मिनिटाच्या या व्हीडिओला हजारो व्ह्यूज आहेत, शेकडो शेअर्स आहेत.
 
हा व्हीडिओ आणखी एका वेगळ्या दाव्यासह शेअर केला जातोय, की पश्चिम बंगालमधल्या रोहिंग्या शरणार्थींनी CRPF जवानांनी मारहाण केली म्हणून.
 
बीबीसीच्या पडताळणीमध्ये हे दावे खोटे असल्याचं लक्षात आलं. या व्हीडिओमध्ये संतापलेला जमाव एका सरकारी वाहनावर हल्ला करताना दिसत आहे. काचा फोडलेल्या या वाहनात निळे कपडे घातलेले काही लोक बसले आहेत, ज्यांना बरीच मारहाण झालेली दिसत आहे. रक्तबंबाळ अवस्थेत ते रडताना दिसत आहे.
 
पण या व्हीडिओमध्ये दिसत असलेले पोलीस ना जमावाला नियंत्रणात आणत आहेत, ना वाहनांवर हल्ला करताना दिसत आहेत, जसा दावा केला जात आहे.
 
व्हीडियोमागचं सत्य
या व्हीडिओचा रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर एका प्रादेशिक न्यूज चॅनलच्या रिपोर्टविषयी कळतं. 12 एप्रिल, 2019 साली प्रसिद्ध झालेल्या या रिपोर्टनुसार हा व्हीडिओ नॅशनल हायवे नंबर 31 वर झालेल्या एका अपघातानंतरचा आहे.
 
जलपायगुडीच्या राजगंज पोलीस स्टेशनच्या अखत्यारित येणाऱ्या भागात झालेल्या या अपघातात दोन लोकांचा मृत्यू झाला होता.
 
काही बातम्यांमध्ये म्हटलं होतं की राजगंज पोलीस स्टेशनची कुमक अपघातानंतर उशिरा पोहचली, ज्यामुळे लोक हिंसक झाले. त्यांनी पोलिसांच्या वाहनांवर हल्ला केला. या हिंसाचारात पोलीस कर्मचारी आणि काही कार्यकर्तेही जखमी झाले.
 
असं म्हटलं जातं की पोलिसांना जमावापासून बचाव करण्यासाठी तिथल्याच घरांमध्ये लपावं लागलं. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांची एक अतिरिक्त तुकडी पाठवावी लागली.
 
बीबीसी फॅक्ट चेक टीमने जलपायगुडीचे पोलीस अधीक्षक अमितात्र मैती यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितलं, "एक ट्रक आणि एका मोटारसायकलच्या झालेल्या अपघातात दोन लोकांचा मृत्यू झाला होता. जेव्हा आम्ही तिथे तपासासाठी पोहोचलो तेव्हा संतापलेल्या जमावाने पोलिसांच्या वाहनाचीही तोडफोड केली. जमावाने पोलिसांवर आणि काही कार्यकर्त्यांवर दगडफेकही केली. पोलिसांनी जमावाला नियत्रिंत करण्याचा आटोकाट प्रयत्न केला."
 
त्यांनी सांगितलं, "हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे की ममता बॅनर्जींच्या पोलिसांनी किंवा रोहिंग्या शरणार्थ्यांनी CRPF जवानांवर हल्ला केला."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती