'ती' सर्वसामर्थ्यवान आहे : आमदार डॉ. भारती लव्हेकर
बुधवार, 14 मार्च 2018 (11:07 IST)
'ती' हा शब्द सामर्थ्यवान आहे कारण या शब्दात समस्त स्त्रीवर्ग सामावून जातो. मग 'ती' कोणाची मुलगी, कोणाची सून, कोणाची सासू असू शकते. त्यामुळे माझ्या संस्थेसाठी 'ती फाउंडेशन' हे नाव योग्य वाटलं. २८ मी २०१७ या जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवशी 'ती फाउंडेशन' ची स्थापना अमृताताई फडणवीस यांच्या हस्ते केली. माझ्या कामाची पोचपावतीदेखील एका वर्षातच मिळाली. २० जानेवारी २०१८ ला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 'फर्स्ट लेडी' या पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आले, असे देशातील पहिली डिजिटल सॅनिटरी पॅड बँक सुरु करणा-या वर्सोव्याच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी सूत्रसंचालिका स्मिता गवाणकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या.
'मनातली जाणीव' या दिवाळी विशेषांकातर्फे जागतिक महिला दिनानानिमित्त शिवाजी नाट्यमंदिर, दादर येथे आयोजित परिसंवादात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला राज्य उत्पादन शुल्काच्या आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, जेष्ठ साहित्यिका डॉ. विजया वाड, सहाय्यक आयुक्त रुक्मिणी गलंडे, अभिनेत्री हेमांगी कवी, अभिनेत्री अनिता दाते, चित्रपट निर्माती अश्विनी दरेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
त्या म्हणाल्या, "देशातील ८५ % स्त्रिया आजही मासिक पाळीवेळी कपडा, दुपट्ट्याचा वापर करतात. झोपडपट्टी, चाळीमधील स्त्रिया मासिक पाळीवेळी वापरायचे कापड इतर कपडयांच्या खाली कोणालाही दिसणार नाही अशा पद्धतीने वाळवतात. मासिक पाळीदरम्यान स्वच्छता न घेतल्याने २७% स्त्रियांना सर्व्हीकल कॅन्सर होतो" हि विदारक आकडेवारी ऐकून सभागृहातील महिला स्तब्ध झाल्या. "प्रत्येक स्त्रीला सॅनिटरी पॅड मिळावे हाच ध्यास उरी बाळगून मी 'ती फाउंडेशन' ची स्थापना केली. महिलेचे विश्व तिच्या मुळाशी जोडलेले असते त्यामुळे विधिमंडळ महिला हक्क व कल्याण समितीची अध्यक्ष या नात्याने पहिल्याच मीटिंगमध्ये समितीच्या नावामध्ये 'बाल' ह्या शब्दाचा समावेश करावा अशी मागणी केली. अन ती मान्यदेखील झाली." अशी आठवण लव्हेकर यांनी जागवली.
दिवाळी अंकाच्या संपादिका सोनल खानोलकर या गेली १० वर्षे हज कार्यक्रम करत आहेत. कार्यक्रमाची सुरवात मृणालिनी हरचंदराय यांच्या सुरेल बासुरीवादनाने झाली. तर दर्शना खामकर व साथीदारांनी 'कहते है मुझको हवाहवाई' या गाण्यावर नृत्याविष्कार सादर करून अभिनेत्री श्रीदेवी यांना श्रद्धांजली अर्पण केली. सन्मान कर्तृत्वाचा या कार्यक्रमात प्रशासकीय महिला पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आणि कॅन्सरशी दोन हाथ करणा-या छाया नाईक, वैज्ञानिक आणि आर्टिस्ट तसेच लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये नाव कोरलेल्या टायनी पेपर आर्टस् बनवणा-या महालक्ष्मी वानखेडकर, पत्रकार नेहा पुरव, बोट रायडर प्रियांका मांगेला, सायकलिस्ट फिरोझा सुरेश, ग्रूमिंग अँड एटीकेट्स टिप्स तज्ज्ञ अस्मिता नेवे-पवार, नृत्यांगना दर्शना खामकर, सिद्धिविनायक ट्रस्टच्या वैभवी चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.
आपल्या परिचयातील व्यक्तींना त्यांच्या अस्मितेची जाणीव करून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. माझे वडील 'खतरनाक' हे पाक्षिक चालवायचे. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर ती जबादारी माझ्यावर आली. मात्र ही जबादारी पेलताना जे शहाणपण मला मिळालं तो अनुभव अनमोल आहे" असे सोनल खानोलकर म्हणाल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या डॉ. विजया वाड यांनी स्वतः वर प्रेम करणं म्हणजे स्वतःचे गुण इतरांमध्ये पाहणं. माझ्या या स्वभावामुळे मी रसिकांना दिलेले प्रेम रसिकजनांनी परतफेडीच्या रूपात मला भरभरून देतात. कार्यक्रमात खरी रंगत आणली ती डॉ. विजया वाड यांनी ऐकवलेल्या किस्स्यांनी. कार्यक्रमाचा शेवट उपस्थित सन्माननीय पाहुण्यांच्या उत्स्फूर्त उखाण्यांनी झाला.