सामान्यांचा नेता डॉ रेड्डी

वाएसआर आजर्यंत कोणतीही निवडणूक पराभूत झाले नाही. विजयाचा टिळा नेहमीच त्यांच्या माथी असायचा म्हणूनच त्यांचे चाहते नेहमी म्हणायचे वायएसआर पराभवाचाही पराभव करतील. परंतु यावेळी मात्र मृत्यूने त्यांचा पराभव केला. त्यांच्या विकासकामांमुळे ते सदैव स्मरणात राहतील.

रेड्डी यांचा जन्म 8 जुलै 1949 रोजी पुलेवेंदुला येथील रायलसीमा भागात आंध्र प्रदेशाच्या राजकारणात अत्यंत आक्रमक नेते समजल्या जाणाऱ्या वाय एस राजा रेड्डी यांच्या पोटी झाला. डॉ रेड्डी यांना आंध्र प्रदेशच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान आहे.YSR या टोपण नावाने त्यांना ओळखले जात होते.

विद्यार्थीदशेपासूनच डॉ राजकारणात होते. त्यांनी गुलबर्ग्यातील एम आर मेडिकल कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले. या काळात ते विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते. सुरुवातीपासूनच त्यांचा ओढा राजकारणाकडे होता.

आपले डॉक्टरी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रेड्डी यांनी जमालमदगू मिशन हॉस्पिटलामध्ये मेडिकल ऑफिसर म्हणूनही काही दिवस काम केले. 1973 साली त्यांनी एका धर्मार्थ रुग्णालयाची स्थापना केली. या हॉस्पिटलला त्यांनी वाय एस राजा रेड्डी यांचे नाव दिले आहे.

1978 साली रेड्डी यांनी आंध्र प्रदेशच्या राजकारणात आपले नशीब अजमावण्यासाठी प्रवेश केला. ते सलग पाच वेळा ते विधानसभेवर निवडून आले. चार वेळा ते विधानपरिषदेचेही सदस्य होते. 9 व्या, 10 व्या, 11 व्या आणि 12 व्या लोकसभेवरही ते कडप्पा लोकसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. डॉ रेड्डी यांनी जितक्या निवडणुका लढवल्या, तितक्या निवडणुकांमध्ये त्यांना यश आले होते.

आपल्या 25 वर्षाच्या राजकीय अनुभवामुळे कॉग्रेस पक्षाने त्यांना राज्याच्या राजकारणात आणि पक्षातही महत्त्वाचे स्थान दिले. 1983 ते 85 या वर्षात ते कॉग्रेस प्रदेशाध्यक्षही होते. आंध्र प्रदेशात त्यांनी अनेक मंत्रिपदही भूषवली. 1999 ते 2004 पर्यंत ते विधानसभेत विरोधीपक्ष नेतेही होते.

सलग दुसऱ्यांदा रेड्डी मुख्यमंत्री झाले. यानंतर आंध्र प्रदेशातील शेतकरी, दलित, गरीब आणि मागासवर्गीयांचे नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. रेड्डी यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. 2003 मध्ये तर त्यांनी राज्यात तीन महिने पदयात्राही काढली होती.

राज्यातील गरीबांचे प्रश्न सोडवण्यासाठी, जनतेची मतं आणि समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी काढलेल्या या यात्रेला जोरदार प्रतिसाद लाभला होता. त्यांच्या या अभियानामुळेच कॉंग्रेसला आलेली मरगळ दूर झाल्याचे पक्षातील नेतेही मान्य करतात. विकास आणि विश्वास असे बोधवाक्य वापरत त्यांनी 2009 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये जनतेचा विश्वास जिंकला आणि 20 मे 2009 रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या नेतृत्त्वाखाली विधानसभेवर कॉंग्रेसला बहुमत तर मिळालेच परंतु केंद्रात कॉंग्रेसचे 33 खासदार निवडून आले.

त्यांच्यातील दुरदृष्टीमुळे ते राज्यात लोकप्रिय झाले. त्यांच्या कार्यकाळात सिंचनाविषयी, विजेविषयीची अनेक कामं मार्गी लागल्याचे त्यांचे विरोधकही मान्य करतात.

वेबदुनिया वर वाचा