देशातील सर्वात महागडे शहर आहे मुंबई

बुधवार, 24 जून 2015 (10:43 IST)
देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर हे देशातील सर्वात महागडे शहर असून दिल्ली शहर महागाईत दुसर्‍या स्थानावर असल्याचे समोर आले असून ही माहिती सेवा आणि सल्ला देणारी जागतिक कंपनी मर्सरने केलेल्या सर्व्हेमधून समोर आली आहे. दैनंदिन जीवन जगण्यासाठी होणार्‍या खर्चाच्या हिशेबानुसार मुंबई हे भारतातील सर्वात महागडे शहर आहे. कंपनीच्या सर्व्हेच्या अहवालात म्हटले आहे की, मुंबई शहरात गतीने होणारा आर्थिक विकास, वस्तू आणि सेवाची चलनवाढ, डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची स्थिरता यामुळे या शहरात राहणार्‍यांच्या जीवनमानावरील खर्चामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई हे शहर महागाईमध्ये जगातील देशांच्या यादीत 74 व्या स्थानावर आहे. गेल्यावर्षी हे 140 व्या स्थानावर होते. देशाची राजधानी दिल्लीदेखील 157 व्या स्थानावरून उसळी मारून 132 व्या स्थानावर पोहोचले आहे. तर चेन्नई 185 व्या स्थानाहून 
 
28 स्थान चढून 157 व्या स्थानावर पोहोचले आहे. त्यानंतर अनुक्रमे बंगळुरू, कोलकाता या शहराची नावे आहेत. कंपनीच्या सव्र्हे अहवालात म्हटले आहे की, अंगोलाची राजधानी लुआंडा हे शहर जगातील सर्वात महागडे शहर ठरले आहे. तर दुसर्‍या स्थानावर हाँगकाँग त्यानंतर जूरिख, सिंगापूर आणि जिनिव्हा ही शहरे पहिल्या पाचमध्ये समाविष्ट आहेत. तसेच पाकिस्तानातील कराची हे शहर जगातील तिसरे सर्वात स्वस्त शहर नमूद करण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा