भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विराटनं ट्वीट करत ही माहिती दिली आहे.दरम्यान, विराट कोहली भारतीय टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी संघाचा कर्णधार होता. आता रोहितकडे वनडे आणि ट्वेन्टी20 संघाचं कर्णधारपद आहे.ट्वेन्टी20 विश्वचषकानंतर कर्णधार विराट कोहलीने भारताच्या ट्वेन्टी20 संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर रोहित शर्माकडे ट्वेन्टी20 संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं.त्यानंतर डिसेंबर 2021मध्ये वनडे संघाच्या कर्णधारपदीही रोहित शर्माची नियुक्ती करण्यात आली होती.कोहलीनं ट्विटमध्ये काय म्हटलं?विराट कोहलीनं ट्विटमध्ये म्हटलं की, "मी गेल्या 7 वर्षांत संघाला नेहमी योग्य दिशेनं नेण्यासाठी परिश्रम घेतले. मी माझं काम पूर्ण ईमानदारीनं केलं. प्रत्येक गोष्टीला कधी ना कधी थांबा घ्यायची वेळ येते आणि आता माझ्यासाठी कसोटी क्रिकेटचा कर्णधार म्हणून थांबायची वेळ आली आहे."इतका प्रदीर्घ काळ देशाचं नेतृत्व करण्याची संधी मला दिल्याबद्दल मी बीसीसीआयचे आभार मानतो. माझ्या प्रत्येक सहकाऱ्याचेही आभार मानतो. त्यांनीच हा प्रवास सुंदर बनवला. रवी शास्त्री आणि सपोर्ट ग्रूपचेही आभार मानतो. ते या गाडीमागचं इंजिन होते, ज्यांनी कसोटी क्रिकेटला सातत्यानं पुढे नेण्याचं काम केलं."माझ्यावर कर्णधार म्हणून विश्वास ठेवल्याबद्दल तसंच भारतीय क्रिकेटला समोर घेऊन जाण्याची क्षमता असलेली व्यक्ती म्हणून माझ्याकडे पाहिल्याबद्दल मी एम.एस. धोनीचेही मी आभार मानतो."BCCI ची प्रतिक्रियातर विराट कोहलीने कसोटी संघाचा कर्णधार म्हणून संघाला एका नव्या उंचीवर नेल्याचं बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल इंडियाने म्हटलंय.BCCI ने ट्वीटमध्ये म्हटलंय, "टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचं त्याच्या वाखाणण्याजोग्या नेतृत्त्व कौशल्यांबद्दल अभिनंदन. यामुळेच टीम एका नव्या उंचीवर गेली. 68 सामन्यांमध्ये त्याने टीमचं नेतृत्त्वं केलं आणि 40 सामने जिंकणारा तो सर्वाधिक यशस्वी कॅप्टन ठरला आहे."भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनीही प्रतिक्रिया दिलीय."विराट कोहलीनं टीम इंडियाचा कर्णधार म्हणून चांगली कारकिर्द गाजवल्याबद्दल त्याचं अभिनंदन. विराटनं भारतीय संघाला एका तंदुरुस्त युनिटमध्ये बदललं, ज्याने भारतात आणि बाहेरच्या देशातही प्रशंसनीय कामगिरी केली. यांतील ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील कसोटी विजय खास आहेत," अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी दिली आहे.