Ind vs Pakistan : भारताविरुद्धच्या सामन्यादरम्यान जेव्हा इंझमामने प्रेक्षकावर उगारली होती बॅट

शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (15:44 IST)
पराग फाटक
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना म्हटलं की वातावरण तयार व्हायला सुरुवात होते. पण एकदा मैदानात खेळाडू एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले असताना बाहेरच्या एका घटनेने खेळात बाधा आणली होती. काय होतं हे प्रकरण समजून घेऊया.
 
ही घटना आहे 14 सप्टेंबर 1997ची म्हणजे 24 वर्षांपूर्वीची. ठिकाण होतं- कॅनडामधील टोरंटो क्रिकेट, स्केटिंग अँड कर्लिंग क्लब.
 
अनेक भारतीय आणि पाकिस्तानच्या चाहत्यांनी मैदानात गर्दी केली होती. बाऊंड्रीजवळ पाकिस्तानचा इंझमाम उल हक क्षेत्ररक्षण करत होता.
 
प्रेक्षकांमधल्या एका चाहत्याने मेगाफोनचा वापर करून इंझमामला उद्देशून 'आलू' असं म्हटलं. त्या व्यक्तीने आणखीही काही आक्षेपार्ह शब्दांचा प्रयोग केला. इंझमामच्या शरीराला उद्देशून आलू म्हटलं गेलं होतं.
 
इंझमामने सुरुवातीला दुर्लक्ष केलं. मात्र शेरेबाजी सुरूच राहिल्याने युवा इंझमामचा पारा चढला. त्याने राखीव खेळाडू घेऊन जात असलेल्या बॅटपैकी एक घेतली आणि तो शेरेबाजी करणाऱ्या प्रेक्षकाच्या दिशेने तो सरसावला.
 
अचानक झालेल्या याप्रकाराने खळबळ उडाली. सुरक्षारक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करत इंझमामला रोखलं. शेरेबाजी करत असलेला माणूस वाचला.
या प्रकारामुळे सामना 40 मिनिटांसाठी स्थगित झाला. सुरक्षारक्षक, मॅचरेफरी आणि दोन्ही संघांच्या कर्णधारांनी प्रेक्षकांना चांगल्या पद्धतीने सामन्याचा आनंद घ्या असं आवाहन केलं. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर खेळाला सुरुवात झाली.
 
आयसीसीतर्फे त्या प्रेक्षकावर कोणतीही कारवाई झाली नाही. मात्र इंझमामवर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली. त्याला न्यायालयातही हजर करण्यात आलं
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात झालेल्या संयुक्त करारानुसार भारत-पाकिस्तान यांच्यात टोरंटो, कॅनडा इथे मालिका आयोजित करण्यात आली होती. इंटरनॅशनल मॅनेजमेंट ग्रुपने या मालिकेची निर्मिती केली होती. ईएसपीएन या क्रिकेटविश्वातल्या प्रक्षेपणकर्त्या कंपनीने या मालिकेचं प्रसारण केलं होतं.
 
कॅनडाची निवड का?
कॅनडात भारत आणि पाकिस्तानातून येऊन स्थायिक झालेल्या लोकांची संख्या खूप आहे. कॅनडात मालिका आयोजित केली तर मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक येतील याची खात्री होती.
सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, अनिल कुंबळे, मोहम्मद अझरुद्दीन या मोठ्या खेळाडूंचा खेळ याचि देही याचि डोळा पाहण्याची संधी कॅनडात स्थायिक झालेल्या भारतीयांना अनायासे मिळाली. त्यामुळे मालिकेदरम्यान टोरंटोचं मैदान हाऊसफुल्ल असल्याचं चित्र तिन्ही वर्षं पाहायला मिळालं.
 
कॅनडा आणि भारताच्या वेळांमध्ये साधारण 9 तासांचा फरक आहे. टोरंटोच्या मैदानावर दिवसा खेळवला जाणारा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी दिसत असे. त्यामुळे टीव्हीवरही अधिकाअधिक प्रेक्षक पाहू शकतील असा कयास होता. तो खरा ठरला.
 
मालिका अर्धवट का राहिली?
1999 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात कारगिल युद्ध झालं. युद्ध थांबल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले. हा तणाव लक्षात घेऊन कॅनडा इथल्या मालिकेचे प्रायोजक सहारा कंपनीने माघार घेतली. या माघारीबरोबरच मालिका आयोजनाची शक्यता धूसर झाली. भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध नंतरही दुरावलेले असल्याने टोरंटोत मालिका खेळवण्याचा प्रश्नच उद्भवला नाही.
 
फ्रेंडशिप कप
पाच सामन्यांची ही मालिका 1996 मध्ये 'फ्रेंडशिप कप' नावाने सुरू आली. 'सहारा' कंपनीने ती प्रायोजित केली होती. पाकिस्तानने ही मालिका 3-2 अशी जिंकली. 26 धावा आणि 13 विकेट्स घेत अनिल कुंबळेने मॅन ऑफ द सीरिज पुरस्कारावर नाव कोरलं. तेव्हा सचिन तेंडुलकर भारताचा कर्णधार होता.
 
(मालिकेसाठी भारतीय संघ- सचिन तेंडुलकर (कर्णधार), नयन मोंगिया, राहुल द्रविड, मोहम्मद अझरुद्दीन, विनोद कांबळी, अजय जडेजा, सौरव गांगुली, सुनील जोशी, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, वेंकटेश प्रसाद, आशिष कपूर)
1997 मध्ये झालेल्या मालिकेत भारताने 4-0 अशा दणदणीत वर्चस्वासह मालिका जिंकली. तरुण तडफदार सौरव गांगुलीने 222 धावा आणि 15 विकेट्स अशी अष्टपैलू कामगिरी करत मॅन ऑफ द सीरिज पुरस्कारावर नाव कोरलं. वर्षभरापूर्वी झालेल्या पराभवाचा वचपा काढत सचिनच्या नेतृत्वात भारताने मालिका विजय साकारला.
 
(मालिकेसाठी भारतीय संघ- सचिन तेंडुलकर (कर्णधार), सौरव गांगुली, राहुल द्रविड, मोहम्मद अझरुद्दीन, विनोद कांबळी, अजय जडेजा, रॉबिन सिंग, साबा करीम, राजेश चौहान, अॅबे कुरुविल्ला, हरविंदर सिंग, देबाशिष मोहंती, निलेश कुलकर्णी)
 
1998 मध्ये याच दोन संघांमध्ये मालिका खेळवण्यात आली. पाकिस्तानने दिमाखदार खेळ करत 4-1 फरकाने मालिका जिंकली. मालिकेत 214 धावा करणाऱ्या इंझमामला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
 
वर्षभरापूर्वी याच मैदानावर प्रेक्षकावर बॅट उगारल्याप्रकरणी इंझमामवर काही सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. मात्र त्याप्रकरणाने खचून न जाता इंझमामने त्याच मैदानावर आपल्या बॅटची कमाल दाखवली.
 
भारताच्या संघबदलाला पाकिस्तानने घेतला आक्षेप
1998 साली कॉमनवेल्थ स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. यामुळे बीसीसीआयने भारतीय संघातील प्रमुख खेळाडू दोन संघात विभागले. एक संघ कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी रवाना झाला. दुसरा संघ टोरंटो इथल्या स्पर्धेत खेळला.
 
टोरंटोत सुरुवातीच्या लढतीत पराभवाला सामोरं जावं लागल्यामुळे कॉमनवेल्थ स्पर्धा आटोपल्यानंतर काही खेळाडूंना टोरंटोला पाठवण्यात आलं.
 
सचिन तेंडुलकर आणि अजय जडेजा यांच्या समावेशामुळे भारताचं पारडं जड होणार हे माहिती असल्याने पाकिस्तानने या बदलला आक्षेप घेतला.
 
मात्र विरोध असतानाही बीसीसीआयने तेंडुलकर आणि जडेजा यांना टोरंटोला पाठवलं. परंतु यानंतरही भारतीय संघाचं नशीब पालटलं नाही. कॉमनवेल्थ स्पर्धा आणि फ्रेंडशिप कप दोन्हीकडे भारतीय संघाला पराभवालाच सामोरं जावं लागलं.
(मालिकेसाठी संघ- सौरव गांगुली, नवज्योतसिंग सिद्धू, मोहम्मद अझरुद्दीन (कर्णधार), राहुल द्रविड, हृषिकेश कानिटकर, जतीन परांजपे, नयन मोंगिया, सुनील जोशी, अजित आगरकर, जवागल श्रीनाथ, वेंकटेश प्रसाद, संजय राऊळ, अजय जडेजा, सचिन तेंडुलकर)
 
दादाची गोलंदाजी
तडाखेबंद फलंदाजीसाठी प्रसिद्ध सौरव गांगुलीने टोरंटोत गोलंदाज म्हणून ओळख प्रस्थापित केली. फलंदाजी आणि गोलंदाजीत दोन्ही आघाड्यांवर दमदार प्रदर्शन करत गांगुलीने आंतरराष्ट्रीय स्तरावर अष्टपैलू खेळाडू म्हणून छाप उमटवली.
वनडे कारकीर्दीत गांगुलीच्या नावावर 100 विकेट्स आहेत. गांगुलने सर्वाधिक विकेट्स (29) भारतात घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर टोरंटोचा क्रमांक लागतो. गांगुलीने टोरंटोच्या या मैदानावर तब्बल 22 विकेट्सची कमाई केली आहे.
 
डाव्या हातात चेंडू छातीजवळ ठेऊन छोट्याशा रनअपसह गोलंदाजी करत अव्वल फलंदाजांना तंबूत धाडणारा गांगुली हे टोरंटो इथल्या मालिकेतलं हमखास चित्र होतं.
 
टोरंटोच्या मैदानावर सर्वाधिक विकेट्स पाकिस्तानच्या साकलेन मुश्ताकच्या (31) नावावर आहेत. तज्ज्ञ गोलंदाज नसूनही गांगुली 22 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
 
नवोदितांना संधी
टोरंटो इथे झालेल्या मालिकांमध्ये भारताने नवोदितांना संधी दिली. देबाशिष मोहंती, हरविंदर सिंग तसंच संजय राऊळ यांनी टोरंटोत वनडे पदार्पण केलं.
 
डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चारशेहून अधिक विकेट्स नावावर असणारा देबाशिष भारतासाठी 2 टेस्ट आणि 45 वनडे खेळला. हरविंदरने 3 टेस्ट आणि 16 वनडेत भारताचं प्रतिनिधित्व केलं.
 
टोरंटोत संजय राऊळला भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली मात्र त्यानंतर भारतीय संघाचे दरवाजे त्याच्यासाठी किलकिले झाले नाहीत. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये संजयच्या नावावर 5000हून अधिक धावा आणि 100हून अधिक विकेट्स आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती