न्यूझीलंडविरुद्ध निर्भेळ विजयासह टीम इंडिया क्रमवारीत अव्वलस्थानी

मंगळवार, 24 जानेवारी 2023 (22:00 IST)
भारतीय संघाने दिलेल्या 386 धावांच्या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवेने झंझावाती शतक झळकावलं मात्र बाकी खेळाडूंनी साथ न दिल्याने त्यांचा डाव 295 धावांतच आटोपला.
 
भारतीय संघाने 90 धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश मिळवलं. या विजयासह भारतीय संघाने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. यंदाच्या वर्षीच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतातच वर्ल्डकप होणार आहे. त्यादृष्टीने ही मालिका महत्त्वाची होती.
 
न्यूझीलंडने फिन अलनला पहिल्याच षटकात गमावलं. मोठ्या खेळीसाठी तयारी करुन आलेल्या कॉनवेने भारताच्या सगळ्याच गोलंदाजांवर जोरदार आक्रमण केलं. कॉनवे एका बाजूने फटकेबाजी करत असताना दुसरीकडे न्यूझीलंडने ठराविक अंतरात विकेट्स गमावल्या.
 
कॉनवेचा इरादा पाहता न्यूझीलंड डोंगराएवढं लक्ष्य पार करणार की का अशी चिन्हं दिसू लागली होती. न्यूझीलंडची धावगती उत्तम होती पण विकेट्स पडत गेल्याने लक्ष्य दूर गेलं. पायात गोळे आलेले असूनही कॉनवे चौकार-षटकारांची लयलूट करत राहिला. छोट्या बाऊंड्रीचा फायदा उठवत कॉनवेने वनडेतलं चौथं शतक साजरं केलं.
 
डॅरेल मिचेल आणि टॉम लॅथम या भरवशाच्या साथीदारांना शार्दूल ठाकूरने बाद केलं. तडाखेबंद फटकेबाजीसाठी प्रसिद्ध मायकेल ब्रेसवेल या लढतीत मात्र 26 धावाच करु शकला. शार्दूल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेत न्यूझीलंडला रोखलं. युझवेंद्र चहलने दोन विकेट्स घेत न्यूझीलंडचं शेपूट चमत्कार घडवणार नाही याची काळजी घेतली.
 
रोहित शर्मा आणि शुबमन गिल या धडाकेबाज सलामीवीरांच्या शतकांच्या बळावर भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत 385 धावांचा डोंगर उभारला.
 
रोहित-शुबमन जोडीने 26 ओव्हर्समध्ये 212 धावांची मजल मारली होती. त्यावेळी भारतीय संघ 500 धावा करणार अशी चर्चा सुरु झाली होती मात्र ही जोडी फुुटली आणि उर्वरित 9 जणांनी मिळून 24 ओव्हर्समध्ये 173 धावाच केल्या. भारतीय संघाची वनडेतली सर्वोत्तम धावसंख्या 418 आहे. तोही विक्रमही मोडला गेला नाही.
 
वनडे क्रिकेट सुरु झालं तेव्हा 200 धावा करणं कठीण मानलं जात असे. हळूहळू संघ तीनशेची वेस ओलांडू लागले. ट्वेन्टी20च्या आक्रमणानंतर हा वेग वाढला आणि 400 धावाही होऊ लागल्या. इंदूर इथे सुरु असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत भारतीय संघाने केलेली सुरुवात पाहता 500चा टप्पाही ओलांडला जाऊ शकतो. होळकर मैदानातील छोट्या बाऊंड्रीमुळे 500चा विक्रम प्रत्यक्षात साकारु शकतो.
 
ब्लेर टिकनरच्या गोलंदाजीवर एक धाव घेत रोहित शर्माने वनडेतील 30 शतकाला गवसणी घातली. तब्बल तीन वर्षानंतर रोहितचं वनडेत शतक साकारलं आहे. रोहितने 83 चेंडूतच शतकाचा टप्पा ओलांडला. याच षटकात चौकार खेचत गिलने वनडेतलं चौथं शतक पूर्ण केलं. गिलने 72 चेंडूतच शतक गाठण्याची किमया केली.
 
शतकानंतर लगेचच रोहित तंबूत परतला. त्याने 85 चेंडूत 9 चौकार आणि 6 षटकारांसह 101 धावांची खेळी केली. रोहित-गिल जोडीने 26 ओव्हर्समध्ये 212 धावांची सलामी दिली.
 
शतकानंतर आणखी आक्रमक खेळ करणारा गिलही माघारी परतला. गिलने 78 चेंडूत 13 चौकार आणि 5 षटकारांसह 112 धावांची वेगवान खेळी केली.
 
रोहित-गिल जोडी फुटल्यानंतर अनुभवी विराट कोहलीने सामन्याची सूत्रं हाती घेतली. इशान किशन त्याच्या साथीला आला. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात इशान बाद झाला. त्याने 17 धावा केल्या. क्षेत्ररक्षक 30 गज वर्तुळात असल्याचा फायदा घेण्याचा कोहलीचा प्रयत्न फिन अॅलनच्या हातात जाऊन विसावला. त्याने 36 धावांची खेळी केली.
 
हार्दिक पंड्याने 38 चेंडूत 54 धावांची खेळी केली. त्याला शार्दूल ठाकूरने चांगली साथ दिली. या दोघांच्या फटकेबाजीमुळे भारतीय संघाने 375चा टप्पा ओलांडला.
 
न्यूझीलंडतर्फे ब्लेर टिकनर आणि जेकब डफी यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
 
भारतीय संघाने दोन सामने जिंकत मालिका आधीच जिंकली आहे. या लढतीत न्यूझीलंडने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. हेन्री शिपलेच्या जागी न्यूझीलंडने जेकब डफीला संघात समाविष्ट केलं. भारतीय संघाने मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती देत वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि फिरकीपटू युझवेंद्र चहल यांना संधी दिली आहे. रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी 19 ओव्हरमध्येच 162 धावांची मजल मारली आहे. दोघांनाही आपापली अर्धशतकं पूर्ण केली आहेत. न्यूझीलंडचे गोलंदाज निष्प्रभ ठरताना दिसत आहेत.
 
पहिल्या वनडेत गिलचं द्विशतक
पहिल्या वनडेत युवा सलामीवीर शुबमन गिलने 208 धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. गिलने 19 चौकार आणि 9 षटकारांसह ही खेळी सजवली. दुसऱ्या बाजूने सहकारी बाद होत असतानाही गिलने आक्रमण सुरुच ठेवलं. भारतीय संघाने 349 धावांची मजल मारली.
 
प्रत्युत्तरादाखल खेळताना मायकेल ब्रेसवेलच्या 140 धावांच्या खेळीच्या बळावर न्यूझीलंडने जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण तो अपुरा ठरला. न्यूझीलंडची अवस्था 131/6 अशी असताना ब्रेसवेल खेळायला आला. त्याने 12 चौकार आणि 10 षटकारांसह ही खेळी केली.
 
भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा
भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजीसमोर रायपूर इथे न्यूझीलंडचा डाव 108 धावांतच आटोपला. ग्लेन फिलीप्सने 36 धावा केल्या. मोहम्मद शमीने 18 धावांत 3 विकेट्स घेतल्या. हार्दिक पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
 
भारतीय संघाने 2 विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य गाठलं. रोहित शर्माने 51 तर शुबमन गिलने 40 धावा केल्या. या विजयासह भारतीय संघाने मालिका जिंकली.
Published By -Smita Joshi 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती