T20 World Cup : टीम इंडियावर या 5 कारणांसाठी होतेय टीका

मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (13:11 IST)
- पराग फाटक
खेळात हारजीत होत राहते. मात्र भारतीय संघ पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध ज्या पद्धतीने हरला त्यावरून क्रिकेटचाहत्यांमध्ये नाराजी आहे.
 
सोशल मीडियावर टीम इंडियावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. माजी खेळाडूंनीही संघाच्या कामगिरीवर, संघव्यवस्थापनाच्या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत.
 
1. विराट कोहलीचं नेतृत्व
खेळाडू म्हणून तिन्ही प्रकारात रनमशीन ठरलेल्या विराट कोहलीला संघाला आयसीसी जेतेपद मिळवून देता आलेलं नाही. एक तपाहून जास्त काळ खेळूनही कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला एकदाही जेतेपद पटकावता आलेलं नाही.
 
ट्वेन्टी20 विश्वचषकानंतर कोहलीने भारताच्या ट्वेन्टी20 संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडू म्हणून तो खेळत राहील. कर्णधार म्हणून शेवटच्या स्पर्धेत संघाला जेतेपद मिळवून देण्यासाठी कोहली प्रयत्नशील आहे. मात्र कर्णधार म्हणून त्याने घेतलेल्या निर्णयांवर टीका होते आहे.
 
अनुभवी रवीचंद्रन अश्विन संघात असतानाही त्याला पाकिस्तान आणि न्यूझीलंड दोन्ही सामन्यात खेळवण्यात आलं नाही.
 
कोहली स्वत: चौथ्या क्रमांकावर खेळायला आला. आवश्यकता भासली तर संघाकडे सहावा गोलंदाजच नाही अशा परिस्थितीत भारतीय संघ खेळायला उतरला होता.
 
विराट कोहली आणि रोहित शर्मा हे आपात्काकालीन परिस्थितीत गोलंदाजी करतात. विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत संघाकडे गोलंदाजीत पर्यायच नाही हे चक्रावून टाकणारं आहे.
 
2. इशान किशन सलामीला
पाकिस्तानविरुद्ध मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघासाठी न्यूझीलंडची लढत महत्त्वपूर्ण झाली होती. मात्र या लढतीत भारतीय संघाने प्रयोग करत युवा इशान किशनला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला.
 
पाकिस्तानविरुद्ध के. एल. राहुल आणि रोहित शर्मा सलामीला आले होते. या अनुभवी जोडीत आयत्यावेळी बदल करण्यात आला.
 
इशान किशनचा हा पहिलाच विश्वचषक आहे. इतक्या महत्त्वपूर्ण सामन्यात न्यूझीलंडच्या दर्जेदार गोलंदाजीविरुद्ध इशानला सलामीला धाडण्यात आलं. इशानला मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे त्याला सलामीला पाठवण्याचा उद्देश सफल झालाच नाही.
 
3. रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर
सलामीवीर म्हणून रोहित शर्माने कसोटी, वनडे आणि ट्वेन्टी20 प्रकारात स्वत:ला सिद्ध केलं आहे. वनडे आणि ट्वेन्टी20 प्रकारात आधुनिक काळातल्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये रोहितची गणना होते.
 
आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्ससाठीही रोहित सलामीवीराच्याच भूमिकेत असतो. सलामीवीर म्हणून त्याची आकडेवारी पुरेशी बोलकी आहे. मात्र न्यूझीलंडविरुद्ध अनुभवी रोहितला सलामीवीराच्या भूमिकेतून बाजूला करण्यात आलं.
 
रोहित या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. न्यूझीलंडतर्फे ट्रेंट बोल्ट गोलंदाजी करतो. रोहित बोल्टची स्विंग गोलंदाजी खेळू शकत नाही असं रोहितला सांगण्यात आल्याचं माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे.
 
बोल्ट आणि रोहित मुंबई इंडियन्स संघासाठी एकत्र खेळतात. दीड-दोन महिन्यांपूर्वी रोहित शर्माने इंग्लंडमध्ये ढगाळ वातावरणात, चेंडू स्विंग होत असताना कसोटीत सलामीला येत दिमाखदार शतकी खेळी साकारली होती. त्या खेळाडूला ट्वेन्टी20 प्रकारात स्विंग गोलंदाजी खेळता येणार नाही हा तर्कवाद अगम्य आहे असं माजी खेळाडूंनी म्हटलं आहे.
 
4. हार्दिक पंड्याच्या दुखापतीचं गौडबंगाल
हार्दिक पंड्याच्या फिटनेसच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. हार्दिक पंड्या पूर्ण फिट नाही मात्र तरीही त्याची संघात निवड कशी करण्यात आली यावरुन निवडसमितीवर टीका होते आहे.
 
हार्दिक पंड्या गोलंदाजी करेल, असं निवड समितीने सांगितलं होतं. त्यावेळी सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत हार्दिकने गोलंदाजी केली नाही. काही सामन्यात तर हार्दिक खेळूही शकला नाही.
 
जो खेळाडू आयपीएल स्पर्धेत पूर्ण फिट नसल्याने गोलंदाजी करत नाही तो काही दिवसात सुरू होणार असलेल्या ट्वेन्टी20 विश्वचषकात कशी गोलंदाजी करणार? असा प्रश्न विचारण्यात आला. मात्र बीसीसीआयने यासंदर्भात कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही.
 
गोलंदाजी करू शकत नसेल तर विशेषज्ञ फलंदाज म्हणून सहाव्या क्रमांकावर त्याला खेळवण्यापेक्षा त्याला संघाबाहेर ठेवावं अशी भूमिका भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने घेतली.
 
हार्दिकला गेल्या काही दिवसात लौकिकाला साजेशी फलंदाजी करता आलेली नाही. त्याच्या दुखापतीचं स्वरूप गंभीर असल्याने तो गोलंदाजीसाठी उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत त्याच्या जागी अतिरिक्त फलंदाज किंवा गोलंदाज खेळवता येऊ शकतो, असं गंभीरने म्हटलं.
 
पाकिस्तानविरुद्धच्या लढतीआधी कर्णधार कोहलीने हार्दिक गोलंदाजी करत नसल्याने काळजी नसल्याचं म्हटलं. सहाव्या क्रमांकावर फिनिशर म्हणून तो जे करतो आहे ते महत्त्वाचं आहे, असं कोहली म्हणाला होता.
 
न्यूझीलंडविरुद्ध हार्दिकने गोलंदाजी केली. मात्र गोलंदाजांकडे धावांचं पाठबळच पुरेसं नव्हतं.
 
हार्दिक पंड्या मध्यमगती गोलंदाज आहे आणि वेगवान खेळींसाठी प्रसिद्ध असा फलंदाज आहे. अतिशय चपळ क्षेत्ररक्षक अशी त्याची ओळख आहे. खेळाशी संबंधित तिन्ही आघाड्यांवर त्याने स्वत:ची उपयुक्तता सिद्ध केली आहे.
 
हार्दिक संघात असेल तर संघव्यवस्थापनाला संघात अतिरिक्त गोलंदाज किंवा फलंदाज खेळपट्टीच्या गरजेनुसार खेळवता येतो. कारण हार्दिक फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात योगदान देत असल्याने असं करता येऊ शकतं.
 
हार्दिकमुळे संघाला संतुलन मिळतं. म्हणून हार्दिकचं संघात असणं महत्त्वपूर्ण आहे. पण हार्दिक पूर्ण फिट नसल्यामुळे भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.
 
5. शिखर धवन आणि युझवेंद्र चहलची निवड का नाही?
भारतीय संघाची निवड झाली त्यावेळी माजी खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. आयसीसी स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या शिखर धवनची संघात निवड करण्यात आली नाही.
 
धवनची आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी झाली होती. धवनकडे प्रदीर्घ अनुभव आहे. धवन राहुल आणि रोहितच्या बरोबरीने सलामीला आला आहे. या दोघांशी त्याचा समन्वय चांगला आहे.
 
गेल्या चार ते पाच वर्षांत युझवेंद्र चहल वनडे आणि ट्वेन्टी20 संघात नियमितपणे खेळतो आहे. मात्र विश्वचषकासाठी त्याची संघात निवड करण्यात आली नाही. नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेतही चहलची कामगिरी चांगली झाली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती