T-20 World cup : पाकिस्तानपाठोपाठ वेस्ट इंडीजवरही महिला संघाचा विजय

गुरूवार, 16 फेब्रुवारी 2023 (09:16 IST)
भारतीय महिला क्रिकेट टीमने टी 20 वर्ल्ड कपमधल्या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध 6 विकेट्सनी विजय मिळवला आहे.
 
दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्य़ात वेस्ट इंडीजने पहिल्यांदा फलंदाजी करताना सहा विकेट्सच्या बदल्यात 118 धावा केल्या.
 
भारतीय संघाची सुरूवात अडखळती झाली. भारताने पहिल्या तीन विकेट्स झटपट गमावल्या. मात्र कर्णधार हरमनप्रीत कौर आणि ऋचा घोष यांनी चौथ्या विकेट्ससाठी अर्धशतकी भागीदारी केली आणि भारताला विजय मिळवून दिला.
 
हरमनप्रीत कौरने 33 धावा केल्या, तर दुसरीकडे ऋचा घोषने 44 धावा केल्या. दोघीही नाबाद राहिल्या. चौथ्या विकेटसाठी ऋचा आणि हरमनप्रीतने 72 धावांची भागीदारी केली
 
दुखापतीतून सावरलेल्या स्मृती मंधानाने दोन चौकार मारत टीमचा स्कोअर 28 वर नेला.
 
त्यानंतर वेस्ट इंडीजची कर्णधार हेली मॅथ्यूज स्वतः गोलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरली आणि सामन्याच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये केवळ 3 धावा केल्या.
 
भारताने पहिल्या ओव्हरमध्ये शेफाली वर्माच्या तीन चौकारांच्या मदतीने 14 धावा केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये शेफालीने अजून चौकार मारला.
 
स्मृती मंधानाची जादू चालली नाही
हेलीने पुढची ओव्हर रामहरैकला दिली. तिला भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मंधानाची विकेट घेण्यात यश आलं.
 
जेमिमा रॉड्रिग्सही झाली लवकर बाद
पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरलेली जेमिमा रॉड्रिग्स मैदानावर आली. मात्र वेस्ट इंडीजची कर्णधाक हेली मॅथ्यूजत्या पुढच्या ओव्हरमध्येच ती कॉट अँड बोल्ड झाली.
 
जेमिमाने पाच चेंडूत केवळ एक रन केली.
 
13 चेंडूंनंतर शेफाली वर्मा लाँग लेगवर कॅच आउट झाली. तिलाही रामहरैकने बाद केलं. शेफालीने 23 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने 28 धावा केल्या.
 
चौथ्या ओव्हरमध्ये 32 धावा आणि एक बाद असलेला भारताचा स्कोअर आठव्या ओव्हरमध्ये 43 धावांवर 3 विकेट्स असा होता.
 
इथून भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि ऋचा घोष यांनी थोडं सांभाळून खेळायला सुरूवात केली आणि एक महत्त्वाची भागीदारी केली. त्यामुळे भारताला या सीरीजमध्ये दुसरा विजय मिळवता आला.
 
वेस्ट इंडीजचा पहिला डाव
वेस्ट इंडीजची कर्णधार हेली मॅथ्यूजने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
 
वेस्ट इंडीजची सुरुवातही काही चांगली झाली नाही.
 
सामन्याच्या दुसऱ्याच ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर कर्णधार हेली मॅथ्यूज पूजा वस्राकरच्या गोलंदाजीवर बाद झाली.
 
हेली मॅथ्यूजला केवळ दोनच धावा करता आल्या.
 
पूजाने या ओव्हरमध्ये वेस्ट इंडीजला एकही रन काढू दिली नाही.
 
त्यानंतर स्टेफनी टेलर आणि शिमेन कॅम्बलने सावकाश खेळायला सुरूवात केली आणि अर्धशतकी भागीदारी केली.
 
दोघींनी टीमचा स्कोअर 78 धावांवर नेला.
 
मॅचच्या 14 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर कॅम्बलला आउट करून दीप्ती शर्माने ही जोडी तोडली आणि वेस्ट इंडीजला मोठा धक्का दिला. कॅम्बलने 32 चेंडूंमध्ये 27 धावा केल्या.
 
या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर दीप्तीने स्टेफनी टेलरला आउट केलं. स्टेफनीने 39 चेंडूंमध्ये 42 धावा केल्या.
 
ही दीप्ती शर्माच्या टी20 क्रिकेट करिअरमधली 99 वी विकेट होती. यासोबतच दीप्ती शर्मा महिला टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज बनली.
 
पुढच्याच ओव्हरमध्ये सिनेल हेन्री रन आउट झाली. तिला केवळ दोन रन करता आल्या. हेन्री या टूर्नामेंटमध्ये इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही रन आउट झाली होती.
 
दीप्ती शर्मा 100 विकेट्स घेणारी पहिली भारतीय गोलंदाज
मॅचच्या शेवटच्या ओव्हमध्ये दीप्ती शर्माने एफी फ्लेचरची विकेट घेतली. या विकेटसोबतच ती टी20 क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेणारी पहिली भारतीय गोलंदाज ठरली.
 
दीप्तीने चार ओव्हर्समध्ये 15 धावा देत तीन विकेट्स घेतल्या आणि ती 'प्लेअर ऑफ द मॅच'ही ठरली.
 
दीप्तीचा हा 89वां अंतरराष्ट्रीय टी20 सामना होता.
 
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून 100 विकेट्स घेणारी दीप्ती पहिली क्रिकेटपटू आहे. आतापर्यंत कोणत्याही पुरूष खेळाडूलाही ही गोष्ट शक्य झाली नाही.
 
महिला क्रिकेटमध्ये याआधी पूनम यादवच्या नावावर सर्वाधिक 98 विकेट्सचा विक्रम होता. पुरूषांमध्ये यजुवेंद्र चहलने 91 आणि भुवनेश्वर कुमारने 90 विकेट्स घेतल्या आहेत.
Published By -Smita Joshi 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती