स्मृती मंधाना: सांगलीतली ही मराठी मुलगी अशी बनली जगातली नंबर वन बॅटर

गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (21:34 IST)
दिमाखदार बॅटिंगसह आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवणाऱ्या महिला क्रिकेटपटू स्मृती मन्धानाचा आज वाढदिवस. भारतीय महिला क्रिकेट संघाचा हुकूमी एक्का झालेल्या स्मृतीच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा घेतलेला आढावा.
 
फोर्ब्स इंडियाच्या 30 Under 30 2019 यादीमध्ये स्मृती मंधानानं स्थान पटकावलं आहे. याधी सुद्धा स्मृती मंधानाने ICC वनडे क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
 
टीम इंडियाचं रनमशीन झालेल्या सांगलीकर स्मृतीची आतापर्यंतची वाटचाल अनेकींसाठी प्रेरणादायी अशीच आहे.
 
गेल्या वर्षी स्मृतीची वर्षातील ICCच्या वुमन क्रिकेटर ऑफ द इअर आणि सर्वोत्कृष्ट वनडे प्लेयर ऑफ द इअर या पुरस्कारांसाठी निवड झाली. ICCच्या वनडे आणि ट्वेन्टी-20 संघातही स्मृतीची निवड झाली होती.
 
भावाबहिणीचं नातं नेहमीच खास असतं. एकमेकांच्या वस्तू वापरणं, गुपितं शेअर करणं आणि बरंच काही. स्मृती आणि श्रवण या भावाबहिणींची गोष्टही अशीच काहीशी.
 
भावापासून प्रेरणा
भाऊ क्रिकेट खेळतो म्हणून तिची या खेळाशी ओळख झाली. भाऊ करतोय ते आपणही करावं, असं तिला वाटू लागलं. ती इतकी लहान होती की तिच्या मापाचे क्रिकेटचे कपडेही उपलब्ध नव्हते.
भावाच्या क्रिकेट पोशाखातूनच तिच्या मापाचे कपडे आईने तयार केले. हा कस्टमाइज्ड युनिफॉर्म परिधान करून तिने बॅट हातात घेतली.
 
भावाची प्रॅक्टिस झाली की तिला बॅटिंग मिळत असे. दोघांचाही बॅटिंग स्टान्स एकसारखाच. जन्मगावी मुंबईत सुरू झालेलं हे वेड मंधाना कुटुंब सांगलीत स्थायिक झालं, तेव्हाही कायम राहिलं.
 
आधी टीममधली लिंबूटिंबू खेळाडू म्हणून तिची गणना व्हायची. पण ही क्रिकेटची आवड अवखळ नाही, हे आईबाबांच्या लक्षात आलं होतं. मग इतर मुलींबरोबर क्रिकेट खेळणं सुरू झालं.
 
अव्वल दर्जाच्या क्रिकेटची झलक दाखवण्यासाठी म्हणून वडिलांनी मेरठमध्ये झालेल्या U19 स्पर्धेला स्मृतीला नेलं. मोठ्या वयाच्या मुलींचं क्रिकेट आणि त्यातील धोके पाहून ती क्रिकेट सोडेल, असा पालकांचा होरा होता.
 
पण झालं उलटंच. तिचं क्रिकेटचं वेड आणखी पक्कं झालं. आणि अभ्यासाच्या बरोबरीने सुरू झाला व्यावसायिक क्रिकेटपटू होण्याचा प्रवास.
 
वयाच्या अकराव्या वर्षीच महाराष्ट्राच्या U19 संघात तिची निवड झाली. मात्र अंतिम अकरात खेळायला मिळेल, या प्रतीक्षेतच दोन वर्ष गेली.
 
खेळायला मिळालं. मात्र त्याचवेळी तिच्यासमोर दोन पर्याय होते. सायन्समध्ये करिअर किंवा क्रिकेट. सायन्सकडे वळलं तर क्रिकेटला वेळ मिळणार नाही याची जाणीव आईला होती. स्मृतीने क्रिकेटची निवड केली आणि भारतीय महिला क्रिकेट संघाला युवा तारा मिळाला.
 
त्याच वर्षी बडोदा इथं महिला आंतरराज्य U19 क्रिकेट स्पर्धेत स्मृतीने गुजरात संघाविरुद्ध 224 धावांची मॅरेथॉन खेळी साकारली.
 
या खेळीने स्मृतीचं नाव क्रिकेटवर्तुळात चमकलं. हाच सूर अन्य दोन स्पर्धांमध्ये कायम राखत स्मृतीने चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेसाठी संघात स्थान पटकावलं.
 
मोठ्या शहरातील समकालीन खेळाडू चांगल्या मैदानांवर, उत्तम सोयीसुविधांसह सराव करत असताना स्मृती सांगलीत काँक्रीट पिचवर अनंत तांबवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत होती.
 
सकाळी सराव, मग शाळा आणि संध्याकाळी पुन्हा सराव, हे शिस्तबद्ध आयुष्य स्मृती शालेय वर्षांमध्ये जगली.
 
या सगळ्या प्रयत्नांची फलश्रुती म्हणजे 2013 मध्ये भारतीय संघात तिची पहिल्यांदा निवड झाली.
 
2014 मध्ये ICC महिला T20 म्हणजेच महिला क्रिकेटच्या ट्वेन्टी-20 वर्ल्डकपसाठी स्मृतीची भारतीय संघात निवड झाली. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्मृतीला बारावीची परीक्षा सोडावी लागली.
 
वर्ल्डकपनंतर इंग्लंडच्या दौऱ्यावर जायचं असल्याने स्मृतीचं अभ्यासाचं अख्खं वर्ष जाणार होतं. हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम तिला खुणावत होता, मात्र इंग्लंड दौऱ्यात तिला करिअरची रेसिपी गवसली.
 
भारतीय महिला संघाने इंग्लंड दौऱ्यात टेस्ट मॅच जिंकली. आठ वर्षांनंतर भारतीय महिला संघाने हा पराक्रम केला होता. या टेस्टमध्ये स्मृतीने अर्धशतक झळकावत नैपुण्याची झलक सादर केली.
 
दोन वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्मृतीने होबार्ट इथं खणखणीत शतक झळकावलं. 2017 मध्ये झालेल्या वर्ल्डकपपूर्वी स्मृती गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे पाच महिने क्रिकेटपासून दूर होती. ती वर्ल्डकप खेळू शकणार का, याविषयी साशंकता होती.
 
मात्र फिजिओंच्या मार्गदर्शनाखाली तिने पुनरागमनसाठी कठोर मेहनत घेतली. मात्र तरीही तिला वर्ल्ड कप क्वॉलिफायर आणि चौरंगी मालिकेत खेळता आलं नाही.
 
वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धेत, दमदार संघाविरुद्ध थेट उतरण्याचं धाडस स्मृतीने दाखवलं. पहिल्याच मॅचमध्ये यजमान इंग्लंडविरुद्ध स्मृतीने 90 धावांची दिमाखदार खेळी साकारली.
 
पाच दिवसांनंतर स्मृतीने वेस्ट इंडिजच्या दर्जेदार माऱ्यासमोर खेळताना 106 धावांची सुरेख खेळी साकारली. भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली, मात्र जेतेपदाने त्यांना हुलकावणी दिली. या स्पर्धेतील प्रदर्शनाने स्मृतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठामपणे स्वत:चं स्थान निर्माण केलं.
 
भारतात परतल्यानंतर स्मृतीसह भारतीय महिला संघाच्या खेळाचं यथोचित कौतुक झालं. या स्पर्धेच्या निमित्ताने महिला क्रिकेटचे सामने टीव्हीवर पाहण्यासाठी उत्साह पाहायला मिळाला.
 
गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात स्मृतीने अर्धशतक आणि शतकी खेळी साकारत स्वत:ला सिद्ध केलं. दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्ट्यांवर चेंडूला प्रचंड वेग आणि उसळी मिळते.
 
मायदेशात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या मातब्बर संघांविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत स्मृतीने धावांची टांकसाळच उघडली.
 
सातत्यपूर्ण खेळासह टेस्ट आणि वनडे संघात स्थिरावलेली स्मृती हळूहळू ट्वेन्टी-20 संघाचा अविभाज्य भाग झाली.
 
क्रिकेट समजायला लागलं, तेव्हा स्मृतीला ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनसारखं खेळायचं होतं.
 
क्रिकेटमध्ये मोठं होत असताना तिच्या स्वप्नातल्या हेडनची जागा श्रीलंकेच्या कुमार संगकाराने घेतली. कदाचित म्हणूनच संगकाराच्या खेळात असलेला आक्रमकता आणि नजाकत यांचा सुरेख मिलाफ स्मृतीच्या बॅटिंगमध्ये अनुभवायला मिळतो.
आंतरराष्ट्रीय दौऱ्यादरम्यान स्मृतीला संगकाराला भेटण्याची संधी मिळाली. संगकाराबरोबरचा फोटो स्मृतीने ट्विटरवर शेअर केला.
 
डावखुऱ्या फलंदाजांच्या खेळात असणारं देखणेपण, पल्लेदार फटके मारतानाची सहजता आणि त्याचवेळी एकेरी-दुहेरी धावा चोरण्यातलं कौशल्य स्मृतीच्या खेळाची गुणवैशिष्ट्यं.
 
मिताली राज आणि झुलन गोस्वामी या भारतीय महिला क्रिकेटच्या शिलेदार. बॅटिंगला जाण्याआधी शांतपणे पुस्तक वाचत बसणारी मिताली महिला क्रिकेटमधील अग्रणी फलंदाजापैकी एक.
 
दुसरीकडे उंचपुऱ्या झुलनने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भल्याभल्या फलंदाजांना नाकीनऊ आणलं. गेल्या तीन वर्षात मिताली-झुलनने दिलेली मशाल हरमनप्रीत सिंग आणि स्मृती मंधाना यांनी समर्थपणे पेलली आहे. यंदा स्मृतीला प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं.
 
स्मृतीच्या खेळातलं सातत्य टिपत ऑस्ट्रेलियातल्या बिग बॅश लीग स्पर्धेतल्या ब्रिस्बेन हिट संघाने तिला ताफ्यात समाविष्ट केलं.
 
इंग्लंडमध्ये IPLच्या धर्तीवर आयोजित किया सुपर लीग स्पर्धेतल्या वेस्टर्न स्टॉर्म संघासाठी खेळताना स्मृतीने वादळी खेळी केल्या आहेत. यावर्षी स्मृती होबार्ट हरिकेन्स संघाकडून खेळत आहे.
स्पर्धांच्या निमित्ताने देशविदेशात संचार करणाऱ्या 22 वर्षीय स्मृतीची सांगलीशी नाळ तुटलेली नाही.
 
सांगलीतली प्रसिद्ध संभा भेळ तिला प्रचंड आवडते. चीज गार्लिक ब्रेड आणि वडापाव हेही तिला खुणावतात, मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचं असल्याने डायटची कठोर बंधनं तिला पाळावी लागतात. मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया कार्यक्रम ती आवर्जून पाहते.
 
तंत्रशुद्ध फलंदाजीचा आधारस्तंभ आणि खेळाडू म्हणून कारकीर्दीनंतर प्रशिक्षक या नात्याने युवा खेळाडूंची फौज घडवणाऱ्या राहुल द्रविड यांनी स्वाक्षरी केलेली बॅट स्मृतीच्या किटचा भाग बनली.
 
स्मृतीच्या भावाला द्रविड यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांनी आठवणीने बहिणीसाठी द्रविड यांच्याकडून बॅटवर स्वाक्षरी घेतली. स्मृतीने याच बॅटने द्विशतक झळकावलं. पुढची अनेक वर्ष स्मृती याच बॅटने खेळत होती. चारवेळा दुरुस्ती झालेली ही बॅट आता स्मृतीच्या घरी दिमाखात विराजमान आहे.
 
2018 वर्षाच्या शेवटच्या सरत्या संध्याकाळी तिची म्हणजेच स्मृती मन्धानाची आयसीच्या वुमन्स क्रिकेटर ऑफ द इअर पुरस्कारासाठी निवड झाली.
 
वर्षभरातल्या सातत्यपूर्ण प्रदर्शनासाठी तिला वनडे क्रिकेटर ऑफ द इअर सन्मानानेही गौरवण्यात आलं. आयसीसीतर्फे निवडण्यात आलेल्या वनडे आणि ट्वेन्टी-20 संघातही स्मृतीचा समावेश करण्यात आला.
भाऊ क्रिकेट खेळतो, त्याचे फोटो पेपरमध्ये येतात अशी तक्रार स्मृती करायची असं तिचे आईबाबा सांगतात. गेल्या काही वर्षात स्मृतीच्या बातम्यांनी पेपरचे रकाने भरून गेले आहेत.
 
स्मृतीला आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्यपूर्ण प्रदर्शनासह ठसा उमटवायचा आहे असं तिचे वडील श्रीनिवास यांनी बीबीसीला सांगितलं. आयसीसी पुरस्कारासाठी स्मृतीची निवड झाली तो अत्यंत अभिमानाचा क्षण होता. स्मृतीने असंच खेळत राहावं आणि देशाला वर्ल्डकप जिंकून द्यावा असं स्मृतीच्या आईने सांगितलं.
 
भाऊ म्हणून तिचा अभिमान वाटतो असं स्मृतीचे भाऊ श्रवण यांनी सांगितलं.
 
भावाला बघून क्रिकेटची सुरुवात केलेल्या स्मृतीचा प्रवास सुसाट वेगाने सुरू आहे. तिचं वय आहे फक्त 23. चिरंतन स्मृतीमध्ये राहील अशी कारकीर्द घडवण्यासाठी स्मृतीला सुवर्णसंधी आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती