आयपीएल 2024 मध्ये कोलकाताला विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार श्रेयस अय्यर आता या हंगामात पंजाब किंग्जची जबाबदारी सांभाळेल. रविवारी टीव्ही शो बिग बॉसमध्ये पंजाब किंग्जच्या नवीन कर्णधाराची घोषणा करण्यात आली. आयपीएल मेगा लिलावात सर्वाधिक बोली लागलेल्या मोजक्या खेळाडूंमध्ये अय्यरचा समावेश होता. अय्यरला PBKS ने विक्रमी 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले, ज्यामुळे तो IPL इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला.
याआधी त्याने दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सची जबाबदारी सांभाळली आहे. दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधार असताना त्याने संघाला 2020 च्या आयपीएल फायनलमध्ये नेले. पीबीकेएस, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स या तीन वेगवेगळ्या फ्रँचायझींचे नेतृत्व करणारा तो स्पर्धेच्या इतिहासातील पहिला भारतीय कर्णधार बनला आहे. ही कामगिरी करणाऱ्या परदेशी कर्णधारांमध्ये कुमार संगकारा (डेक्कन चार्जर्स/किंग्ज इलेव्हन पंजाब/सनराईजर्स हैदराबाद), महेला जयवर्धने (दिल्ली कॅपिटल्स/कोची टस्कर्स केरळ/किंग्ज 11 पंजाब) आणि स्टीव्ह स्मिथ (पुणे वॉरियर्स इंडिया/रायझिंग पुणे सुपरजायंट/राजस्थान रॉयल) यांचा समावेश आहे.