मुंबईच्या रस्त्यांवर लाखो चाहत्यांनी केले जगज्जेत्या टीम इंडियाचे स्वागत

शुक्रवार, 5 जुलै 2024 (08:39 IST)
टी 20 मध्ये जगज्जेतेपद पटकावलेल्या टीम इंडियाचे गुरुवारी देशात आगमन झाले. कोट्यवधी चाहत्यांनी अत्यंत उत्साहात या वर्ल्ड चॅम्पियन्सचं स्वागत केलं. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत टी 20 विश्वचषक जिंकला. त्यानंतर गुरुवारी टीम इंडियाचं भारतात आगमन झालं.
 
भारतात परतल्यानंतर टीम इंडियानं गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर या विजयाच्या जल्लोषासाठी भारतीय संघ मुंबईला पोहोचला. मुंबईत लाखो चाहते लाडक्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरले होते. मुंबईतील रस्ते पूर्णपणे चाहत्यांच्या गर्दीनं भरलेले होते. मरीन ड्राईव्हवर तर एकिकडं अरबी समुद्र आणि दुसरीकडं चाहत्यांचा समुद्र अवतरल्याचं पाहायला मिळालं.
 
वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाच्या स्वागतासाठी बीसीसीआयने खास कार्यक्रमाचं आयोजन केलं.
मुंबईत पोहोचल्यानंतर एका बसवरून टीम इंडियाची व्हिक्टरी परेड काढण्यात आली. लाखो चाहत्यांच्या गराड्यातून ही बस वानखेडे स्टेडियमवर पोहोचली.
टीम इंडियाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं चाहते मुंबईच्या रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. रोहितच्या फॅन्सनंही त्याचं अशाप्रकारे स्वागत केलं.
टी ट्वेंटीतील विश्वविजयानंतर चाहत्यांमध्ये निर्माण झालेला उत्साह गुरुवारी मुंबईत पाहायला मिळाला. लाखो चाहते रस्त्यावर उतरले होते. हातात तिरंगा घेत त्यांनी टीम इंडियाचं स्वागत केलं.
मुंबईत गुरुवारी जोरदार पाऊसही झाल्याचं पाहायला मिळालं. पण त्या पावसानंही चाहत्यांचा उत्साह कमी झाला नाही. उलट अशा पावसामध्येही चाहते एन्जॉय करताना आणि टीम इंडियाचा उत्साह वाढवताना दिसले.
वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी चाहत्यांना मैदानात प्रवेश देण्यात आला होता. एखाद्या सामन्यासाठी गर्दी व्हावी असं भरगच्च स्टेडियम यावेळी पाहायला मिळालं.
गुरुवारी सकाळी टीम इंडिया दिल्लीत पोहोचल्यानंतर संघानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नरेंद्र मोदींनी या विजयाबद्दल टीम इंडियाचं अभिनंदन केलं.
विजेत्या संघाचं नेतृत्व करणारा कर्णधार रोहित शर्मानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना या विजेतेपदाच्या प्रवासाबाबत माहिती दिली.
वेस्ट इंडिजमध्ये दिल्लीत आगमन झाल्यानंतर वाजत गाजत टीम इंडियाचं स्वागत करण्यात आलं. त्यावेळी कर्णधार रोहित शर्मानंही भांगडा करत आनंद साजरा केला.
चाहत्यांना टी 20 विश्वचषकाची ट्रॉफी उंचावून दाखवत रोहित शर्मानं सर्वांचे आभार मानले. जवळपास 13 वर्षानंतर रोहितच्या नेतृत्वातील संघानं आयसीसी चषकाचा भारताचा दुष्काळ संपवला.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती