KKR vs LSG:कर्णधार अजिंक्य रहाणेचे अर्धशतक आणि रिंकू सिंगच्या शानदार फलंदाजीनंतरही, कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) ला लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात चार धावांनी पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना लखनौने 20 षटकांत तीन गडी गमावून 238 धावा केल्या. प्रत्युत्तरात, केकेआरला निर्धारित षटकांत सात गडी गमावून केवळ 234 धावा करता आल्या. रहाणेने 35 चेंडूत आठ चौकार आणि दोन षटकारांसह 61 धावा केल्या, तर रिंकूने 15 चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 38 धावा केल्या.
आयपीएलमध्ये लखनौचा हा सर्वात कमी फरकाने तिसरा विजय आहे. मनोरंजक म्हणजे, लखनौने केकेआरविरुद्ध फक्त कमी फरकाने विजय मिळवला आहे. लखनौने 2023 मध्ये केकेआरविरुद्ध एका धावेने,2022 मध्ये दोन धावांनी आणि आता चार धावांनी विजय मिळवला. आयपीएलमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरचा हा चार किंवा त्यापेक्षा कमी धावांनी सातवा पराभव आहे, त्यापैकी तीन पराभव लखनौविरुद्ध झाले आहेत.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर लखनौला मार्श आणि मार्करामने चांगली सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी हर्षित राणाने मार्करामला बाद करून मोडली. मार्कराम अर्धशतक झळकावण्याच्या जवळ होता पण तीन धावांनी तो कमी पडला. यानंतर, मार्शने आपला आक्रमक डाव सुरू ठेवला आणि अर्धशतक झळकावले. मार्श बाद झाल्यानंतर, पूरनने आक्रमक फलंदाजी केली आणि फक्त 21 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
पूरन शेवटपर्यंत राहिला पण त्याचे शतक पूर्ण करू शकला नाही. लखनौकडून अब्दुल समदने सहा धावा केल्या, तर डेव्हिड मिलरने चार धावा करून नाबाद राहिला. केकेआरकडून हर्षित राणाने दोन, तर आंद्रे रसेलने एक विकेट घेतली.
केकेआरविरुद्धच्या विजयासह, लखनौ संघ पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या चारमध्ये पोहोचला आहे. लखनौचे पाच सामन्यांत तीन विजय आणि दोन पराभवांसह सहा गुण आहेत आणि ते सध्या चौथ्या स्थानावर आहे. कोलकाताचा हा पाच सामन्यांतील तिसरा पराभव आहे. केकेआरने आतापर्यंत दोन सामने जिंकले आहेत आणि चार गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.