टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताची विजयी हॅटट्रिक, पण कोहलीच्या ओपनिंगबाबत मात्र प्रश्नचिन्ह

गुरूवार, 13 जून 2024 (09:59 IST)
टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या ग्रुप स्टेजमध्ये भारतानं अमेरिकेचा सात विकेटनं पराभव करत सुपर 8 मधलं स्थान निश्चित केलं. पण भारताला या विजयासाठी झगडावं लागलं.
 
सलामीला खेळताना तिसऱ्या सामन्यातही विराट कोहलीला अपयश आल्यानं, त्यावरही चर्चा सुरू झाली आहे.
 
रोहित शर्मानं नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी अमेरिकेला 110 धावांवर रोखलं. त्यात अर्शदीप सिंगनं 4 ओव्हरमध्ये अवघ्या 9 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट घेत मोलाचा वाटा उचलला.
 
धावांचा पाठलाग करताना भारताची सलामी जोडी पुन्हा एकदा अपयशी ठरली. पण नंतर सूर्यकुमार यादवनं डाव सावरला आणि अर्धशतक करत तो विजयाचा हिरो ठरला.
 
शिवम दुबेनं सूर्याला मोलाची साथ दिली. शिवम पहिल्यांदाच टी 20 विश्वचषक खेळत आहे.
 
भारतानं स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक केली असली, तरी भारतासाठी हा विजय तेवढा सोपा नव्हता. अमेरिकेच्या गोलंदाजांनीही भारतीय फलंदाजांसमोर आव्हान उभं केलं होतं.
 
अखेर अनुभवाच्या जोरावर भारतीय संघानं विजय मिळवला. सामन्यात भारताला पाच पेनाल्टी रनही मिळाले.
 
फलंदाजी चिंतेचा विषय
भारताला 110 धावांचा पाठलाग करताना सुरुवातीलाच दोन धक्के बसले. कोहली सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. तर तिसऱ्या ओव्हरमध्ये रोहितही अवघ्या 3 धावांवर बाद झाला.
 
कोहली आणि रोहित दोघांनाही सौरभ नेत्रावळकरनं बाद केलं.
 
रोहित विराट बाद झाल्यानंतर सूर्यकुमार आणि ऋषभ पंतनं काहीवेळ डाव सावरला. पण पंतही 20 चेंडूंमध्ये 18 धावांवर बाद झाला. त्यानंतर सूर्यानं शिवमच्या साथीनं डाव सावरला आणि दोघांनी भारताला विजयापर्यंत पोहोचवलं.
 
खेळपट्टी गोलंदाजीला साजेशी असल्यानं सूर्याच्या वेगळ्या फलंदाजीची झलक पाहायला मिळाली. त्यानं अगदी संयमी खेळी केली आणि शेवटी खास त्याच्या स्टाईलच्या काही फटक्यांनी चाहत्यांचं मनोरंजनही केल.
 
सूर्यकुमार यादव 50 आणि शिवम दुबे 31 धावा करून नाबाद राहिले.
 
अमेरिकेचे फलंदाज अर्शदीपसमोर हतबल
अमेरिकेच्या संघानं प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट गमावत 110 धावा केल्या.
 
भारतीय गोलंदाजांनी अमेरिकेच्या फलंदाजांना सुरुवातीला चांगलं बांधून ठेवलं होतं. पण नंतरच्या 10 ओव्हरमध्ये अर्शदीपशिवाय सगळे गोलंदाज महागडे ठरले.
 
अर्शदीपनं पहिल्याच चेंडूवर भारताला यश मिळवून दिलं. शायन जहांगीर पहिल्याच चेंडूवर पायचित झाला. नंतर त्याच ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर अँड्रिस गॉसलाही त्यानं बाद केलं.
 
नंतर सहाव्या ओव्हरपर्यंत अमेरिकेनं विकेट गमावली नाही, पण त्यांना धावाही करता आल्या नाही. पावरप्ले संपला तेव्हा त्यांनी 2 विकेट गमावत अवघ्या 18 धावा केल्या होत्या.
 
10 ओव्हरपर्यंत त्यांनी तीन विकेट गमावत फक्त 42 धावा केल्या होत्या. पण नंतर त्यांनी वेग वाढवला आणि 110 धावा केल्या. नसाऊच्या खेळपट्टीचा विचार करता ही धावसंख्याही चांगली होती.
 
अर्शदीप सर्व गोलंदाजांमध्ये सर्वात यशस्वी ठरला. त्यानंतर 4 ओव्हरमध्य अवघ्या 9 धावा दिल्या आणि चार फलंदाजांना बाद केलं. या कामगिरीसाठी तो सामनावीरही ठरला.
 
कोहलीच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह?
टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीला सलामीला उतरवण्याचा निर्णय व्यवस्थापनानं घेतला. पण विराटच्या कामगिरीमुळं आता याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
 
पहिल्या तीन सामन्यांत आतापर्यंत रोहितने अनुक्रमे 1,4 आणि 0 अशा धावा केल्या आहेत.
 
कोहलीनं 14 वर्षांपूर्वी 12 जूनलाच आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये पदार्पण केलं होतं. पण तो गोल्डन डक झाल्यानं या उत्साहावर पाणी फेरलं गेलं.सौरभ नेत्रावळकरनं त्याला शून्यावर बाद केलं.
 
सलग तिसऱ्या सामन्यात सलामीला फलंदाजी करताना अपयश आल्यानं कोहलीला सलामीला का उतरवलं जात आहे? असा प्रश्न क्रीडा समीक्षक उपस्थित करत आहेत.
 
विराटची टी वर्ल्डकपमधील आजवरची कामगिरी
23 अक्टूबर 2022. याच दिवशी विराटनं पाकिस्तान विरोधात भारताला अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला होता. अखेरपर्यंत फलंदाजी करत अवघ्या 53 चेंडून 82 धावा करत त्यानं भारताला विजय मिळवून दिली होता.
 
आजवरच्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये दोन वेळा सर्वाधिक धावा करणार विराट एकमेव फलंदाज आहे. 2014 मध्ये बांगलादेशात झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये रोहितनं सर्वाधिक 319 धावा केल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियात 2022 मध्ये सर्वाधिक 296 धावा केल्या होत्या.
 
नुकत्याच संपलेल्या आयपीएलमध्येही विराट सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. आयपीएलमध्येही त्यानं दोन वेळा सर्वाधिक धावांची कामगिरी केली आहे.
 
आयपीएलमधील या फॉर्ममुळंच रोहितला टी-20 वर्ल्डकपमध्ये नंबर तीनऐवजी सलामीची जबाबदारी दिली. पण अमेरिकेतील खेळपट्ट्यांवर अद्याप त्याला जम बसवता आलेला नाही.
 
आता 15 जूनला भारताचा ग्रुप स्टेजमधील अखेरचा सामना कॅनडाच्या विरोधात होणार आहे.
 
क्रम बदलल्याने नाराजी
सामन्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनं सोशल मीडियावर एक पोस्ट केली. त्यात त्यानं कोहलीनं तिसऱ्या क्रमांकावरच फलंदाजीला यायला हवं, असं मत व्यक्त केलं आहे.
 
कैफनं म्हटलं की, "तिसऱ्या क्रमांकावर यायचा फायदा असतो. बाहेरून तुम्हाला अंदाज घेता येतो. गोलंदाज काय करायचा प्रयत्न करत आहेत. पिच कसं आहे, हे समजायला हवं. कोहली यात मास्टर आहे. कारण समजून घेतल्यानंतर तो फॉर्मात येतो. इथं विकेट वाचवून खेळावं लागत आहे. तिसऱ्या क्रमांकावर आला तर तो जरा संयमानं खेळेल. विराटनं तिसऱ्या क्रमांकावर चांगली कामगिरी केली आहे. माझ्या मते त्यानं त्याच क्रमांकावर खेळावं."
 
एका यूझरनं कोहली शून्यावर बाद झाल्यानंतर असं म्हटलं की, आता यशस्वी जैस्वाल किंवा सॅमसनला रोहितबरोबर ओपनिंगला उतरवून विराटला तिसऱ्या क्रमांकावर उतरवायला हवं.
 
एका युझरनं असंही म्हटलं की, किती खराब संघ निवडला आहे. जैयस्वालऐवजी विराट का ओपन करतोय? हे अमेरिकेबरोबर पराभूत झाले तर बरं होईल.
 
दुसऱ्या एकानं लिहिलं की, "रोहितबरोबर ओपनिंगला जैस्वाल किंवा सॅमसनला आणा. भारत विराटला ओपनिंगला उतरवून त्याचं टॅलेंट वाया घालवत आहे."
 
भारतीय संघ सुपर 8 मध्ये
पॉइंट्स टेबलचा विचार करता ग्रुप ए मध्ये भारतीय संघ तीनपैकी तीन सामने जिंकून पहिल्या स्थानी आहे. तसंच सुपर 8 मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे.
 
तर अमेरिका 4 पॉइंट्ससह दुसऱ्या आणि पाकिस्तान आणि कॅनडा प्रत्येकी दोन पॉइंट्ससह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. तर आयर्लंड सर्वात खाली चौथ्या स्थानावर आहे. ते एकही सामना जिंकलेले नाहीत.
 
अमेरिकेनं पाकिस्तानचा पराभव करत स्पर्धेतील मोठा उलटफेर केला आहे. त्यामुळं आता ग्रुपमध्ये सुपर 8 साठीच्या दुसऱ्या स्थानासाठी चांगली स्पर्धा असून नेट रनरेट यात महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे.
 
Published By- Dhanashri Naik 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती