भारतीय कर्णधार रोहित शर्मा ॲडलेडमध्ये सराव करत आहे. रोहितने रविवारी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान इलेव्हनविरुद्ध तीन धावा केल्या होत्या. सराव सत्रादरम्यान, सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी रोहितच्या पायाच्या हालचालींवर लक्ष ठेवले आणि कर्णधार कसा खेळत आहे याचे निरीक्षण केले. अस्वस्थ असूनही रोहितने यश दयालला त्याच्या पूर्ण क्षमतेने गोलंदाजी करण्यास सांगितले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये गुलाबी चेंडूचा दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. गेल्या वेळी भारतीय संघ ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर डे-नाईट कसोटी खेळला होता तेव्हा 36 धावांत सर्वबाद झाला होता. यावेळी भारतीय संघ पर्थ कसोटीत विजयासह दुसऱ्या सामन्यात प्रवेश करेल. भारताने पहिल्या सामन्यात कांगारू संघाचा 295 धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
पिंक बॉल टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड चांगला आहे आणि त्याने 12 पैकी 11 मॅच जिंकल्या आहेत. कांगारू संघ घरच्या मैदानावर एकही दिवस-रात्र सामना हरलेला नाही. आकडेवारीत ऑस्ट्रेलियन संघ बलाढय़ दिसत असला तरी पहिला सामना जिंकल्यानंतर वाढलेल्या आत्मविश्वासाने भारत ॲडलेड कसोटीत उतरेल. रोहित शर्मा आणि शुभमन गिल पहिल्या सामन्यात उपलब्ध नव्हते, ते आता संघात परतले आहेत.