Ajaz Patel: अनिल कुंबळेचा विक्रम होण्यासाठी श्रीनाथने जेव्हा वाईड बॉलची ओव्हर टाकली होती

शनिवार, 4 डिसेंबर 2021 (16:01 IST)
भारतीय वंशाच्या मात्र न्यूझीलंडकडून खेळणाऱ्या एझाझ पटेलने मुंबईत वानखेडे स्टेडियमवर डावात 10 विकेट्स घेण्याची किमया साधली. एझाझच्या निमित्ताने अनिल कुंबळेच्या भीमपराक्रमाच्या आठवणी जागृत झाल्या.
4 ते 7 फेब्रुवारी 1999 कालावधीत राजधानी दिल्लीतल्या गुलाबी थंडीत, धुक्याची चादर लपेटलेल्या वातावरणात कुंबळेने अनोख्या विक्रमाला गवसणी घातली होती.
पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध कुंबळेने ही किमया केली होती. अतिशय दुर्मीळ असा हा विक्रम कुंबळेच्या नावावर व्हावा यासाठी जवागल श्रीनाथने स्वैर गोलंदाजी केली होती. आपल्याला विकेट मिळाल्यामुळे कुंबळेचा विक्रम हुकणार नाही याची काळजी श्रीनाथने घेतली.
या सामन्यात स्वैर गोलंदाजी करून कुंबळेच्या विक्रमात महत्त्वाची भूमिका बजावणारे श्रीनाथ मुंबईत सुरू असलेल्या सामन्यात सामनाधिकारी आहेत. कुंबळेचा विक्रम होण्यात त्यांनी निर्णायक भूमिका बजावली होती.
एझाझचा विक्रम त्यांनी सामनाधिकारी कक्षातून याचि देही याचि डोळा अनुभवला. त्याच संघातील कुंबळेचा सहकारी राहुल द्रविड सध्या भारतीय संघाचे प्रशिक्षक आहेत. द्रविड यांनाही दोन्ही विक्रम प्रत्यक्ष मैदानात बसून अनुभवण्याची संधी मिळाली.
 
भारतीय संघाने कोटला इथे झालेल्या कसोटीत 252 धावांची मजल मारली होती. सदागोपन रमेश आणि मोहम्मद अझरुद्दीन यांनी अर्धशतकी खेळी केल्या. पाकिस्तानतर्फे साकलेन मुश्ताक यांनी 5 विकेट्स पटकावल्या होत्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकिस्तानचा डाव 172 धावातच आटोपला. कुंबळेने 4 तर हरभजन सिंगने 3 विकेट्स घेतल्या होत्या. भारतीय संघाला मोठी आघाडी मिळाली. भारतीय संघाने दुसऱ्या डावात 339 धावा करत पाकिस्तानसमोर 420 धावांचं लक्ष्य ठेवलं. रमेशचं शतक चार धावांनी हुकलं. सौरव गांगुलीने नाबाद 62 धावांची खेळी केली होती. जवागल श्रीनाथने 49 धावा केल्या होत्या. साकलेन मुश्ताकने पुन्हा एकदा 5 विकेट्स घेतल्या.
अनिल कुंबळेच्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. सईद अन्वर, शाहिद आफ्रिदी, इजाज अहमद, इंझमाम उल हक, मोहम्मद युसुफ, मोईन खान, सलीम मलिक, वासिम आक्रम, मुश्ताक अहमद, साकलेन मुश्ताक यांना अनिल कुंबळेने बाद केलं.
 
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने बिनबाद 101 अशी दमदार सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर कुंबळेच्या झंझावातासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली.
साकलेन मुश्ताक बाद झाला आणि पाकिस्तानची अवस्था 198/9 अशी झाली. कुंबळे विक्रमापासून एक विकेट दूर होता. दुसऱ्या बाजूने जवागल श्रीनाथ गोलंदाजी करत होता. श्रीनाथने ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू टाकत कुंबळेच्या विक्रमाच्या आशा पल्लवित केल्या.
 
वेस्ट इंडिजचे पंच स्टीव्ह बकनर यांनी काही चेंडू वाईड असल्याचा कौल दिला. पाकिस्तान सामना हरणार हे स्पष्ट होतं त्यामुळे वाईड दिल्याने भारतीय संघाचं नुकसान होणार नव्हतं. मित्राचा विक्रम व्हावा यासाठी श्रीनाथने वाईडची पखरण केली.
 
श्रीनाथच्या या योगदानाला जागत कुंबळेने वासिम अक्रमला बाद करत दहाव्या विकेटवरही नाव कोरलं आणि इतिहास घडवला.
झेल टिपून व्हीव्हीएस लक्ष्मण, नयन मोंगिया, सौरव गांगुली, राहुल द्रविड यांनी कुंबळेच्या विक्रमात महत्त्वाचा वाटा उचलला.
भारताने दिल्ली कसोटी 212 धावांनी जिंकली. या विजयासह भारतीय संघाने दोन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली.
कुंबळेने सामन्यात 14 विकेट्स घेत संस्मरणीय कामगिरी केली. कुंबळेच्या आधी इंग्लंडच्या जिम लेकर यांनी 1956 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध डावात 10 विकेट्स घेण्याची किमया केली होती.
43 वर्षांनंतर कुंबळेने लेकर यांच्या पंक्तीत स्थान मिळवलं. 22 वर्षांनंतर एझाझ पटेलने वानखेडे स्टेडियमवर लेकर, कुंबळे यांच्या विक्रमाची पुनरावृत्ती केली.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केवळ तीनच खेळाडूंना हा विक्रम करता आला आहे. यावरून या विक्रमाचं दुर्मीळपण सिद्ध होतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती