अर्चना एलिमिनेट होणार या भीतीने उषा ताई हळव्या झाल्या

गुरूवार, 27 फेब्रुवारी 2025 (12:46 IST)
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये वातावरण तापले आहे, कारण स्पर्धकांसमोर आता अवघड आव्हाने येत आहेत. किचनमध्ये अहमहमिकेने लढणाऱ्या या स्पर्धकांमध्ये भावनिक नाती देखील दृढ होत आहेत. असेच घट्ट नाते निर्माण झाले आहे उषा ताई आणि अर्चना यांच्यात! त्यांच्या नात्यात गोडवा आणि तणाव यांचे मिश्रण आहे. ‘तुझे माझे पटेना आणि तुझ्या वाचून करमेना’ असे काहीसे त्यांचे झाले आहे.
 
अलीकडे एका चॅलेंजमध्ये, एका अनोख्या टॅग-टीम टास्कमध्ये स्पर्धकांना सायकलिंग करून स्वयंपाकासाठी गॅस निर्माण करायचा होता. यात दरेक शिटीला दोन्ही पार्टनर्सनी आलटून पालटून सायकलिंग करणे अपेक्षित होते. अर्चनाची जोडी उषा ताईंशी जुळवलेली नसूनही तिने ताईसाठी तिच्या वतीने सायकलिंग करून मनाचा मोठेपणा आणि निःस्वार्थीपणा दाखवला. ब्लॅक अॅप्रन चॅलेंजमध्ये त्यांच्या नात्यातील दृढता पुन्हा एकदा दिसून आली. यावेळी अर्चनाला एलिमिनेट होण्याचा धोका होता. तिच्यावरील या संकटामुळे भावुक होऊन अश्रू गाळणारी एकच व्यक्ती होती, ती म्हणजे तिच्याशी नेहमी वादावादी करणारी उषा ताई! यावरून त्यांच्यात होणारी भांडणे वरवरची असून आतून मात्र त्यांचे गहिरे भावनिक नाते असल्याचे स्पष्ट होते.
ALSO READ: घटस्फोटाच्या बातमीवर गोविंदा आणि सुनीताच्या भाचीने दिली प्रतिक्रिया
उषाताईशी असलेल्या आपल्या नात्याविषयी बोलताना अर्चना म्हणाली, “उषा ताई आम्हा सर्व स्पर्धकांमध्ये वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ आहेत. मला त्यांच्याबद्दल खूप आदर वाटतो. आमच्यात सतत वादावादी सुरू असते- कुकिंग करताना किंवा इतर वेळी देखील! आम्ही एकमेकींना चिडवतो, आव्हाने देतो आणि वाद घालतो. पण या सगळ्या लुटुपुटीच्या भांडणांच्या मागे एकमेकींविषयीचा जिव्हाळा आणि आपलेपणा आहे. आमच्यात कितीही भांडणे होऊ देत पण या शो मध्ये ती एकमेव अशी व्यक्ती आहे, जिने माझ्यासाठी अश्रू गाळले आहेत. त्या क्षणी मला हे उमगले की, आमचे नाते मैत्रीपूर्ण चढाओढीच्या पलीकडे जाणारे आहे. ते अस्सल जिव्हाळ्यावर आणि परस्पर आदरावर उभे आहे. ही स्पर्धा खेळकर वादावादी आणि मैत्रीपूर्ण संघर्षाने भरलेली असली तरी हे क्षण सिद्ध करतात की मास्टरशेफच्या किचनमध्ये निर्माण झालेली नाती केवळ कुकिंगपुरती मर्यादित राहणारी नाहीत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती