‘येरे येरे पैसा ३’ मधील ‘उडत गेला सोन्या’ हे ‘जेन झी’ ब्रेकअप साँग प्रदर्शित
सोमवार, 7 जुलै 2025 (16:24 IST)
येरे येरे पैसा ३ या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. ट्रेलरला आणि टायटल ट्रॅकला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता या चित्रपटातील दुसरे गाणे उडत गेला सोन्या प्रदर्शित झाले असून, त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. हे गाणे एका वेगळ्या आणि मनोरंजक पद्धतीने सादर करण्यात आले आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात सनी आणि बबलीचे गोड प्रेम प्रेक्षकांनी अनुभवले होते. परंतु आता येरे येरे पैसा ३ मध्ये सनीचे लग्न दुसऱ्याच मुलीशी होत असल्याने बबलीचे मन तुटले आहे. बबली तिच्या मनातील भावना या गाण्यातून व्यक्त करताना दिसतेय. या गाण्याची पार्श्वभूमी जरी भावनिक असली तरी हे गाणे जबरदस्त संगीत आणि हटके स्टाईलमध्ये सादर करण्यात आले आहे. हे जेन झी ब्रेकअप साँग प्रेक्षकांना थिरकायला लावणारे असून याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. गाण्याचे खास आकर्षण म्हणजे निर्माते अमेय खोपकर यांचे सुपुत्र ईशान अमेय खोपकरही या गाण्यात दिसत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ईशानचे मराठी चित्रसृष्टीत पदार्पण झाले आहे. तर या गाण्यात चित्रपटातील इतर कलाकारांसोबतच सोनाली खरेचीही झलक दिसत आहे.
सायली पंकज, रविंद्र खोमणे, राधा खुडे, सौरभ साळुंके, मुनव्वर अली, अपूर्वा निशाद व सावनी भट्ट यांच्या जबरदस्त आवाजातील या गाण्याला पंकज पडघन यांचे संगीत लाभले असून डॉ. विनायक पवार यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहे.
दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, “ येरे येरे पैसा ३ मध्ये सनी-बबलीच्या नात्याला एक इमोशनल तरीही फन टच द्यायचा प्रयत्न केला आहे. हे एक मजेशीर गाणे असले तरी या गाण्यात खूप काही घडत आहे. ज्याने कथा पुढे जातेय. आता ते काय आहे याचे उत्तर चित्रपटगृहातच मिळेल.''
निर्माते अमेय खोपकर म्हणतात, “ हे गाणे माझ्यासाठी खूप खास आहे. कारण या गाण्यातून माझ्या मुलाचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले असून हा आमच्यासाठी एक भावनिक क्षण आहे.मला खात्री आहे संगीतप्रेमींना हे गाणं नक्कीच आवडेल.''
निर्माते निनाद बत्तीन म्हणतात, “ हे गाणे भावनिक आणि मनोरंजक आहे. सनी-बबलीच्या नात्याचा हा टर्निंग पॉईंट असून, त्यातली मजा आणि स्टोरी पाहाणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरेल हे नक्की.”
धर्मा प्रॉडक्शन्सचे अपूर्व मेहता म्हणतात, “ ये रे ये रे पैसा ही सिरीज मजा आणि मनोरंजनासाठी ओळखली जाते आणि हे गाणे त्याला चारचाँद लावणारे आहे.”
धर्मा प्रॉडक्शन्स प्रस्तुत अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मित, न्युक्लिअर ॲरो पिक्चर्स निर्मित या चित्रपटाची सहनिर्मिती वर्डविझार्ड एंटरटेनमेंटने केली आहे. सुधीर कोलते, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन, गिरीधर गोपाळकृष्ण धुमाळ हे चित्रपटाचे निर्माते असून सौरभ लालवाणी सहनिर्माते आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले आहे. कलाकारांच्या यादीत संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर, ईशान अमेय खोपकर, ईशान खोपकर यांच्यासह आणखी काही चर्चित चेहरे दिसणार आहेत. येत्या १८ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.