'अंड्या चा फंडा' सिनेमाला लाभला लता दीदींचा शुभार्शिवाद

'कुछ तो गडबड हे दया...', 'तोड दो दरवाजा...' हे सी आय डी चे डायलाॅग्ज लोकं आजही आवडीने बोलतात. सामान्य प्रेक्षकांच्या मनात गेली कित्येक वर्ष अधिराज्य गाजवलेल्या या मालिकेची भारताची गानकोकिळा 'लता मंगेशकर' देखील भरपूर मोठी फॅन आहे. विशेष म्हणजे या मालिकेचे लेखक आणि दिग्दर्शक संतोष शेट्टी यांचा आगामी मराठी सिनेमा 'अंड्या चा फंडा' देखील याच धाटणीचा असल्यामुळे, लता मंगेशकर यांनी या सिनेमाला विशेष पसंती दिली आहे. नुकतेच या सिनेमाचे 'गोष्ट आता थांबली' हे गाणे लता मंगेशकर यांच्या आशीर्वादाद्वारे सादर करण्यात आले. आदर्श शिंदेच्या अवजातले हे गाणे क्षितीज पटवर्धन यांनी लिहिले असून, याला अमित राज यांनी ताल दिला आहे. 
रहस्य आणि शोध कथा लिहिण्यास विशेष हातखंडा असणाऱ्या संतोष शेट्टी यांनीच या सिनेमाचे लेखन केले असल्यामुळे, हा सिनेमा नक्कीच रोमांचक असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, खुद्द लतादीदींना गूढ आणि शोधकथेवर आधारित असलेल्या मालिका तसेच सिनेमे बघायला भरपूर आवडतात, आणि त्यामुळेच त्यांनी 'अंड्या चा फंडा' या सिनेमातील गाण्याच्या प्रसिद्धीसाठी आपला अनमोल वेळ देऊ केला. याप्रसंगी सिनेमाचे दिग्दर्शक तसेच निर्मात्यांसोबतच अथर्व बेडेकर, शुभम परब, मृणाल जाधव हे बालकलाकार आणि दीपा परब व सुशांत शेलार या कलाकारांनी लतादीदींच्या निवासस्थानी हजेरी लावली होती. लाता दिदींनी या सर्वांना शुभार्शिवाद देत, सिनेमाच्या भरघोस यशासाठी शुभेच्छा दिल्या. बालपणाच्या मैत्रीवर आधारित असलेला हा सिनेमा अध्यास क्रिएशनचे विजय शेट्टी यांची निर्मिती असून प्रशांत पुजारी आणि इंदिरा विश्वनाथ शेट्टी यांनी त्याची सहनिर्मिती केली आहे. तसेच  पटकथा आणि संवाद अंबर हडप, गणेश पंडित आणि श्रीपाद जोशी यांनी लिहिली असून जूनच्या अखेरीस ३० तारखेला हा सिनेमा लोकांना आपल्या नजीकच्या सिनेमागृहात पाहता येणार आहे.

वेबदुनिया वर वाचा