गश्मीर महाजनी : ‘जजमेंट पास करणं सोपं, नाण्याच्या दोन्ही बाजू समजणं कठीण’
सोमवार, 28 ऑगस्ट 2023 (17:14 IST)
gashmir mahajani Instagram
ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांचं गेल्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. त्यांचा मृतदेह दोन दिवस घरात होता मात्र कोणालाही ते कळलं नाही.अशा परिस्थितीत मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. तसंच त्यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनीवरसुद्धा वडिलांची काळजी न घेतल्याबदद्ल टीका करण्यात आली होती.
त्यावर गश्मीर महाजनीने उत्तर दिलं होतं. मात्र एन्टरटेन्मेंट टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींचा उहापोह केला. तसंच रविंद्र महाजनी आणि त्याच्या नात्याबद्दलही सांगितलं.
तो म्हणतो, “सगळ्यांना परफेक्ट व्हायचं असतं पण कोणीच तसं नसतं. माझे वडीलही तसे नव्हते आणि मीसुद्धा तसा नाही. मी त्यांना फ्लॅटमध्ये एकटं सोडलं असं म्हणतात. मी सांगू इच्छितो की गेल्या 20 वर्षांपासून ते एकटे राहत होते. कुटुंबाचे सदस्य म्हणून आम्ही फार काही करू शकलो नाही, आम्हाला ते स्वीकारावं लागलं. त्यांचं आणि आमचं नातं एकतर्फी होतं. त्यांना वाटलं तेव्हा ते आमची भेट घ्यायला यायचे. जेव्हापर्यंत इच्छा असेल तेव्हापर्यंत रहायचे आणि निघून जायचे.”
“जेव्हा माझा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा ते जास्त काळ राहिले. ते अतिशय मूडी होते आणि स्वयंभू होते. स्वयंपाकापासून त्यांना सगळी कामं स्वत:ची स्वत: करायला आवडायची. घरी नोकरचाकर ठेवले तरी एक दोन दिवसात त्यांना हाकलून द्यायचे.”
“गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी लोकांशी संपर्क कमी ठेवला होता. अगदी आमच्याशीसुद्धा. ते कोणाशीही स्वत:हून बोलायचे नाही. मॉर्निंग वॉकच्या एखाद्या ग्रुपमध्ये सुद्धा नव्हते. त्यामुळेच त्यांच्या मृत्यूचं कळलं नाही. मी हे सगळं कारणं देतोय असं वाटू शकतं पण आहे हे असं आहे. याचे लोक वेगवेगळे अर्थ काढतील पण ठीक आहे.
वडील आणि त्याच्या नात्याबद्दल बोलताना तो म्हणतो, “आमच्यात तणाव निर्माण होण्याची अनेक कारणं होती. पण शेवटी ते माझे वडील आणि माझ्या आईचे पती होते. काही गोष्टी कुटुंबात असलेल्याच बऱ्या. माझे वडील अतिशय रुबाबदार कलाकार होते. त्यांचं हास्य लागट होतं आणि मला त्यावरच फोकस करायचं आहे.”
वडिलांचं निधन झाल्यानंतर गश्मीर महाजनीने इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकली होती. त्यात तो म्हणाला, “एखाद्या अभिनेत्याला अभिनेता म्हणून राहू द्या. उगाच नको त्या गोष्टी का उकरून काढताय? आता ती व्यक्ती या जगात नाही.”.
“फ्री इंटरनेट असलं की एखाद्याबद्दल जजमेंट पास करणं अतिशय सोपं असतं मात्र नाण्याच्या दोन्ही बाजू समजणं कठीण असतं,” असंही त्याने लिहिलं होतं.
रवींद्र महाजनी यांचा प्रवास
रवींद्र महाजनी यांचा जन्म पुण्यात आला. लहानपणापासून त्यांना अभिनयाची आवड होती.
वडिलांच्या निधनानंतर रवींद्र यांच्यावरच कुटुंबाची जबाबदारी आली.
लोकमत फिल्मीनुसार, रवींद्र यांनी सुरुवातीला टॅक्सीचालक म्हणून काम केलं. त्याकाळी रवींद्र दिवसा अभिनयाचे धडे गिरवायचे आणि रात्री टॅक्सी चालवायचे.
मधुसूदन कालेलकर यांच्या 'जाणता अजाणता' या नाटकातून महाजनींना अभिनयाची संधी मिळाली.
याच नाटकाचा प्रयोग पाहून शांतारामबापूंनी रवींद्र महाजनींना 'झुंज' या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी निवडलं. 1974 साली आलेला हा चित्रपट खूप गाजला.
या मराठी चित्रपटाद्वारे ते घराघरात पोहचले.
रवींद्र महाजनी यांनी मराठी, हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला.
त्यांचे लक्ष्मीची पाऊले, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, देवता, कळत-नकळत, हे चित्रपट विशेष गाजले.
रविंद्र महाजनी यांनी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही काम केलं.