त्यांच्या सरकारमध्ये होतो, त्यावेळी मी असा अर्थसंकल्प केला की ते माझं कौतुक करायचे: अजित पवार

मंगळवार, 27 फेब्रुवारी 2024 (19:49 IST)
अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही तरतुदी करण्यात आल्या आहे. यामध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत पाच लाख 50 हजार नवीन सौर्य कृषी पंप बसवण्यात येणार आहेत. याचबरोबर इतर अनेक योजना व तरतूदी असल्याचे सांगण्यात आले. या अर्थसंकल्पाबाबत काहींनी समाधान व्यक्त केले तर काहींनी टीका केली. 'राज्य सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडला आहे. म्हणून त्यांनी घोषणांचा पाऊस पाडला आहे," अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. याच मुद्द्यावर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना एक मजेशीर किस्सा घडला. त्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही खो-खो हसले.
 
मुख्यमंत्री पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, उद्धव ठाकरेंकडून या अर्थसंकल्पाला केवळ घोषणांचा पाऊस असे नाव ठेवण्यात आले आहे. त्यांच्या टीकेवर तुमचे उत्तर काय? या वेळी अजित पवार यांनीच प्रश्नाचा ताबा घेतला आणि म्हणाले- "मी ज्यावेळेस त्यांच्या सरकारमध्ये होतो, त्यावेळी मी असा अर्थसंकल्प केला की ते माझं कौतुक करायचे. 'फार छान आहे, फार छान आहे' असं म्हणायचे. आता मी त्यांच्यासोबत नाही म्हणून ते असं म्हणत आहेत. त्याला काहीच अर्थ नाही." अजित दादांचे हे मजेशीर उत्तर ऐकून सोबत असलेले शिंदे आणि फडणवीस यांनाही हसू अनावर झाले. तसेच मागे उभे असलेले मंत्री शंभूराज देसाई हे देखील खो-खो हसले.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती