मावळ लोकसभा मतदारसंघ : पार्थ पवारांना पराभवाचा धक्का देणाऱ्या या मतदारसंघात यंदा काय होईल?
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024 (13:03 IST)
लोकप्रतिनिधींची दमछाक करणारा मतदारसंघ म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघाची ख्याती आहे. पश्चिम महाराष्ट्रातलं पुणे ते थेट कोकणातल्या रायगड जिल्ह्याला जोडणारा हा मतदारसंघ आहे.
मावळच्या निवडणुकीत भौगोलिक विविधतेला तर महत्त्व आहेच पण यासोबतच सह्याद्रीच्यावर दोन्ही बाजूला असणाऱ्या सांस्कृतिक विविधतेचा एक सुंदर मिलाफ या मतदारसंघात पाहायला मिळतो.
शहरी, निमशहरी, ग्रामीण तसेच आदिवासी भाग अशी वैविध्यपूर्ण रचना हे मावळचं वैशिष्ट्य आहे.
लोहगड, विसापूर, राजमाची यांसारखे किल्ले; कार्ला, भाजे या लेण्या; देहू, एकविरा देवी यांसारखी तीर्थस्थळे इ. अशा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वस्तूंचा सहवास लाभलेला हा मतदारसंघ पर्यटकांसाठी तर प्रेक्षणीय आहेच, पण राजकारणाची आवड असणाऱ्यांसाठीही मावळातलं राजकारण नेहमीच चर्चेचा विषय ठरतो.
मावळ मतदारसंघाचा असा आहे इतिहास
या मतदारसंघाचा इतिहास अगदी अलीकडचा आहे.
2009च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर मुंबई-पुणे महामार्गाच्या दुतर्फा पसरलेल्या मावळ मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली.
मावळच्या पिंपरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा चांगला प्रभाव आहे. भाजपनेही स्थानिक पातळीवरील अनेक बडे मासे गळाला लावून या भागात वर्चस्व मिळवलंय, तर रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचादेखील प्रभाव दिसून येतो.
पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ; तर रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत आणि उरण या एकूण 6 विधानसभा मतदारसंघांचा मावळ लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. हे सहाही मतदारसंघ सध्या महायुतीच्या ताब्यात आहेत.
पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर, चिंचवडमध्ये अश्विनी जगताप हे भाजपचे आमदार आहेत, तर उरणचे अपक्ष आमदार महेश बाल्दी यांनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे.
मावळ विधानसभा मतदारसंघात सुनील शेळके, तर पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार आहेत. कर्जत मतदारसंघातील आमदार महेंद्र थोरवे हे शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत.
आजपर्यंत झालेल्या तीनही निवडणुकांमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी दुहेरी लढत झाली. या तिन्ही लढतींमध्ये शिवसेनेने वर्चस्व राखलं आहे.
2009 मध्ये शिवसेनेच्या गजानन बाबर यांनी राष्ट्रवादीच्या आझम पानसरे यांचा पराभव करत विजय मिळवला. त्यानंतरच्या 2014च्या लोकसभा निवडणुकीत श्रीरंग बारणे यांनी शिवसेनेकडेच हा मतदार संघ राखण्यात यश मिळवले.
यावेळी शेतकरी कामगार पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप हे दुसऱ्या स्थानी, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या विधानसभेचे अध्यक्ष असणारे राहुल नार्वेकर हे तिसऱ्या स्थानावर होते.
2014 च्या निवडणुकीत आमदार लक्ष्मण जगताप यांनी अपक्ष उमेदवार म्हणून दिलेली लढत त्यावेळी लक्षणीय ठरली होती.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत काय झालं?
2019 मध्ये मावळ चर्चेत राहिला कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुपुत्राने या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत फूट पडल्याच्या चर्चाही त्यावेळी झाल्या होत्या. पण अखेर श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवारांचा पराभव केला आणि हा मतदारसंघ शिवसेनेकडे राखला.
या 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी मावळमध्ये 'स्थानिक विरुद्ध बाहेरचा' हा मुद्दा महत्त्वाचा ठरला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाला मावळच्या मतदारांनी खासदार म्हणून पसंती दिली नाही.
पार्थ पवारांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज असलेल्या राष्ट्रवादीच्या काही स्थानिक नेत्यांनी त्यावेळी घेतलेली भूमिका श्रीरंग बारणे यांच्या हिताची ठरली होती.
तब्बल 2 लाख 5 हजार मतांनी पार्थ पवार यांचा दणदणीत पराभव करत शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे दुसऱ्यांदा खासदार झाले होते.
मावळमध्ये सध्या काय परिस्थिती आहे?
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बंडामुळे मावळमध्ये मोठे बदल घडले आहेत.
2019ला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये लढत झालेल्या या मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातच लढत होण्याची शक्यता आहे.
तरीदेखील महायुतीकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार, असा पेच निर्माण होणे साहजिक आहे. विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे एकनाथ शिंदेंचे समर्थक आहेत. विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी ते उत्सुक असतील, यात शंका नाही.
मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांच्या वाढदिवशी ठिकठिकाणी लावलेल्या होर्डिंग्जमध्ये भावी खासदार असा त्यांचा उल्लेख केल्याने भेगडेंना मावळ लोकसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांचे समर्थक आग्रही असल्याचे दिसून येते, तर मावळमध्ये अजितदादांची आपली स्वत:ची वेगळी ताकद आहे.
विद्यमान खासदार बारणेंनाच जर उमेदवारी मिळाली तर अजित पवार गटाला माघार घ्यावी लागण्याची शक्यता आहे.
मावळचे आमदार सुनिल शेळके हे मावळमध्ये राष्ट्रवादीची ताकद मोठी असल्याचा वेळोवेळी दावा करत आहेत. मावळ लोकसभेची जागा अजित पवार गटाला मिळावी, यासाठी ते प्रचंड आग्रही आहेत. त्यामुळे महायुतीची जागा कोणाला मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे असेल.
महायुतीतील एका गटाला उमेदवारी जरी मिळाली तरी अन्य गट त्याला कितपत सहकार्य करणार, यावर सारी समीकरणं अवलंबून आहेत.
तर दुसरीकडे महाविकासआघाडीला उमेदवारासाठी शोधाशोध करावी लागत आहे.
महाविकासआघाडीचा मावळमधील संभाव्य उमेदवार कोण असणार, याबाबत जनतेमध्ये अद्यापही संभ्रम आहे. ऐनवेळी महायुतीतील नाराजांपैकी एकाला आयात करून महाविकासआघाडीकडून उमेदवारी मिळण्याचीही चिन्हे आहेत.
काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय.
महायुतीतील कोणत्या पक्षाला ही जागा मिळणार आणि महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार यावर या मतदारसंघातील लढत किती चुरशीची होईल, हे ठरेल.